निळवंडे प्रकल्पग्रस्तांबाबत शुक्रवारी बैठक

0
अकोले (प्रतिनिधी) – निळवंडे प्रकल्पग्रस्त वसाहत अकोले नगरपंचायतीकडे हस्तांतरण प्रक्रियेसंदर्भात नुकतीच आढावा बैठक पार पडली. मात्र काही तांत्रिक बाबींच्या अडचणी उदभवल्यामुळे ही बैठक पुन्हा शुक्रवार 24 नोव्हेंबरला तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार मुकेश कांबळे यांनी दिली.
निळवंडे धरणासाठी संपादित झालेल्या धरणग्रस्तांची अकोले शहरात पुनर्वसन वसाहत गेल्या 25 वर्षापासून वसलेली आहे. त्यावेळी याठिकाणी पुनर्वसन खात्याच्या वतीने नागरी सुविधा या नागरिकांना उपलब्ध करुन दिल्या होत्या. या सुविधा आता मोडकळीस आल्या असून येथील नागरिक दुरुस्तीसाठी नगरपंचायतीकडे मागणी करत आहे.
मात्र नगरपंचायत येथील नागरिकांना हा प्रभाग पुनर्वसन विभाग व संगमनेर इरिगेशन खात्याच्या अधिपत्याखाली येत असल्याने व संबंधित खात्याने तो अकोले नगरपंचायतकडे हस्तांतरण केलेले नाही. या नागरी सुविधा आता अकोले नगरपंचायतीकडे हस्तांतरण करण्यासाठीचे महसूल, इरिगेशन, पुनर्वसनचे संयुक्त प्रयत्न सरू आहेत. यासाठी नुकतीच तहसील कार्यालयात पुनर्वसन अधिकारी ज्योती कावरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
यावेळी अकोलेचे आ. वैभवराव पिचड, तहसीलदार मुकेश कांबळे, पुनर्वसन तहसीलदार श्री. थोटे, नगराध्यक्ष वकील के.डी. धुमाळ, प्रकल्पग्रस्तांचे नेते यशवंतराव आभाळे, राजेंद्र डावरे, जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता हारून तांबोळी, श्री. थोटे, माजी सरपंच संपतराव नाईकवाडी, रमाकांत आभाळे, शांताराम आवारी, राजेंद्र आभाळे आदी उपस्थित होते.
त्यामुळे याठिकाणी कोणताही पध्दतीचे विकास झाल्याचे चित्र दिसत नाही. सर्वत्र डास, उघड्या गटारी, रस्त्याची झालेली दुर्दशा अशी अवस्था या ठिकाणची झालेली आहे. येथील नागरिक या सर्व प्रकाराला त्रस्त झाले आहे. तसेच पुनर्वसन कॉलनीतील प्रकल्पग्रस्तांच्या समस्या तातडीने सोडविता याव्यात यासाठी पुनर्वसन अधिकारी ज्योती कावरे यांनी विशेष सूचना केल्या.
या कॉलनीतील नागरिकांची समस्येपासून सुटका व्हावी यासाठी तातडीने प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी पुनर्वसन अधिकार्‍यांनी नगराध्यक्ष वकील धुमाळ यांच्याकडे केले. या कॉलनीला सर्व सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू अशी ग्वाही नगराध्यक्ष वकील धुमाळ यांनी यावेळी बोलताना दिली.

LEAVE A REPLY

*