निळवंडे-भंडारदरा धरणात मुबलक पाणी : पुढील वर्षासाठी 7 ते 8 टीएमसी पाणी राखून ठेवावे

0

अकोलेतील शेतकर्‍यांची मागणी

अकोले (प्रतिनिधी) – निळवंडे-भंडारदरा धरणांत उपलब्ध असणारे सर्व 19 टीएमसी पाण्याचा यावर्षी वापर न करता त्यातील किमान 7 ते 8 टीएमसी पाणी पुढील वर्षासाठी राखून ठेवावे, पाण्याची उधळपट्टी न करता त्याचा योग्य व नियोजनपूर्वक व आवश्यक तेवढाच वापर करण्याची मागणी तालुक्यातील शेतकर्‍यांकडून करण्यात येत आहे.
अकोले तालुक्यात 11 हजार 39 दलघफू क्षमतेचे भंडारदरा आणि आठ हजार 320 दलघफू क्षमतेचे निळवंडे अशी दोन मोठी धरणे आहेत. या धरणांच्या पाण्यावरच उत्तर नगर जिल्ह्याचे भवितव्य अवलंबून आहे. यावर्षी ही दोन्ही धरणे जुलै महिन्यातच भरली. त्यानंतर दोन ते अडीच महिने या धरणांमधून ओव्हरफ्लोचे पाणी कमी अधिक प्रमाणात सुरू होते.
निळवंडे धरणात गत वर्षीपासून पूर्ण क्षमतेने पाणी साठविण्यास सुरुवात झाली. हे धरण पूर्ण झाले असले तरी धरणाच्या कालव्यांची कामे अद्याप अपूर्ण आहेत. त्यामुळे निळवंडे धरणाचे पाणी सध्या चार ते पाच वर्षांपासून भंडारदर्‍याच्या लाभक्षेत्रातच वापरले जाते. मध्यंतरी तीन वर्ष जायकवाडीसाठी निळवंडे, भंडारदरा धरणातून पाणी सोडावे लागले. त्याकाळात लाभक्षेत्रातही पावसाचे प्रमाण खूपच कमी होते.
त्यामुळे दोन्ही धरणांच्या पाण्याची गरज भंडारदर्‍याच्या लाभक्षेत्राला होती. 1926 पासून भंडारदरा धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत आहे. 11 टीएमसी पाण्यातच लाभक्षेत्राचे सर्वच सिंचन तेव्हा पासून होत आलेले आहे. मात्र निळवंडे धरणात पाणी साठविण्यास सुरुवात केल्यानंतर भंडारदर्‍याच्या लाभक्षेत्रासाठी अतिरिक्त पाणी मिळू लागले. वस्तूतः निळवंडेच्या या पाण्यावर भंडारदर्‍याच्या या लाभक्षेत्राचा हक्क नाही. आणि भंडारदर्‍याचे 11 टीएमसी पाणी लाभक्षेत्रासाठी पाण्याची उधळपट्टी न झाल्यास पुरेसे आहे. त्यामुळे निळवंडे भंडारदरा धरणातील सात ते आठ टीएमसी पाणी यावर्षी न वापरता पुढील वर्षासाठी राखून ठेवणे शक्य आहे.
धरणात काही पाणी साठवून ठेवल्यास पाण्याच्या उधळपट्टीला आळा बसेल. पुढील वर्षी पावसाळा लांबल्यास खरीपाच्या पेरण्यांसाठी या साठवून ठेवलेल्या पाण्याचा उपयोग करता येईल. पावसास सुरुवात झाल्यावर आणि त्याचे प्रमाण चांगले राहिल्यास ही धरणे लवकर भरतील. आणि ओव्हरफ्लो लवकर सुरु होईल. त्यामुळे नदीकाठच्या गावांना दिलासा मिळेल.
.
जास्ती प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्यास पाण्याची मोठ्या प्रमाणात उधळपट्टी होते. पूर्वी सरासरी दोन टीएमसी पाण्यात भंडारदर्‍याचे एक आवर्तन पूर्ण होत असे. अलीकडे एका आवर्तनाला तीन, साडेतीन टीएमसी पाणी लागते. कारण पाण्याची मोठ्या प्रमाणात होणारी उधळपट्टी. पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली पाटाचे पाणी लाभक्षेत्रातील बंधारे, तलावात सोडले जाते. नाव पिण्याच्या पाण्याचे असले तरी या पाण्याचा मुख्य वापर पिकांसाठीच केला जातो. या उधळपट्टीला आळा घालून पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.
निळवंडे धरण हे मुख्यतः दुष्काळी भागासाठी आहे. चांगल्या पावसाच्या वर्षातही निळवंडे धरणाचे पाणी भंडारदर्‍याच्या लाभक्षेत्रात वापरले गेल्यास त्यातून पाणी वापरण्याचे हितसंबंध निर्माण होण्याची शक्यता आहे. कालांतराने या पाण्यावर हक्क सांगितला जाऊ शकतो. त्यामुळे जेव्हा कालवे होतील तेव्हा निळवंडेच्या लाभक्षेत्राला त्यांच्या हक्काचे पाणी मिळेलच याची शाश्‍वती नाही.
तेव्हा निळवंडेच्या पाण्यासाठी वंचित भागाला पुन्हा संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे. असे हितसंबंध निर्माण होऊ नयेत म्हणून निळवडेच्या पाण्याची जेव्हा खरी गरज असेल तेव्हाच भंडारदर्‍याच्या लाभक्षेत्रासाठी उपयोग करण्याची आवश्यकता आहे. यावर्षीची पाणी स्थिती लक्षात घेता त्याची सुरुवात जलसंपदा विभागाने याच वर्षापासून करणे गरजेचे आहे.

भंडारदरा धरणाचा मृतसाठा 300 दलघफू असून सुमारे एक टीएमसी पाणी पिण्यासाठी वापरले जाते. निळवंडे धरणाचा मृतसाठा 256 दलघफू असून या धरणातील सुमारे अर्धा टीएमसी पाणी अकोले, संगमनेरच्या पाणी योजनांसाठी राखीव आहे. त्यामुळे या दोन्ही धरणांचा विचार करता यावर्षी सुमारे 17 टीएमसी पाणी सिंचनासाठी उपलब्ध आहे.

भंडारदरा, निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात यावर्षी पाऊस चांगला पडला असला तरी यापेक्षाही अधिक पावसाची नोंद यापूर्वी झाली आहे. मात्र यावर्षी पावसाने जुलै महिन्यातील काही दिवसांचा अपवाद वगळता त्यामुळे धरणात पाण्याची विक्रमी आवक अनेक वर्षानंतर झाली. पाणलोट क्षेत्रात यावर्षी रतनवाडीला 5 हजार 322 मिमी पावसाची नोंद झाली. तर अन्य ठिकाणचा पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे-घाटघर 4645, पांजरे 4119, भंडारदरा 3219, वाकी 2917. 

भंडारदरा धरणात यावर्षी सुमारे 19 हजार 400 ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत 19 हजार 374 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. तर निळवंडे धरणात 20 हजार 799 दलघफू नवीन पाणी जमा झाले. तरीही यावर्षी सुमारे 20 टीएमसी पाणी ओव्हरफ्लोच्या रुपाने प्रवरा नदी पात्रातून वाहिले. त्यामुळे दोन अडीच महिने प्रवरा नदी कमी जास्त प्रमाणात वाहत होती.

पाणलोट क्षेत्राप्रमाणेच लाभक्षेत्रातही यावर्षी सरासरीपेक्षा जास्ती पाऊस पडला. अकोले परिसरात सरासरीच्या दुप्पट पावसाची नोंद झाली. अकोलेत 1032 मिमी, निळवंडे 845 मिमी तर लाभक्षेत्रातील ओझर येथे 873 मिमी पाऊस पडला. दोन अडीच महिने वाहत असलेली नदी आणि लाभक्षेत्रात पडलेला चांगला पाऊस लाभक्षेत्रात भूगर्भातील पाणी पातळी चांगलीच वाढली आहे. अनेक ठिकाणी विहिरी तुडुंब भरल्या आहेत. त्यामुळे निळवंडे, भंडारदरा धरणांतील सर्वच पाण्याची गरज यावर्षी लाभक्षेत्राला भासणार नाही.

ऑक्टोबर अखेर 11 हजार 39 दलघफू क्षमतेचे भंडारदरा धरण तुडुंब भरलेले आहे. तर आठ हजार 192 दलघफू क्षमतेच्या निळवंडे धरणाची स्थिती तशीच असून गळतीमुळे त्या धरणात क्षमतेपेक्षा 30- 35 दलघफू पाणी कमी आहे.

LEAVE A REPLY

*