Video : नाशिकच्या नामांकित रुग्णालयाकडून रूग्णाची फसवणूक

मुस्लिम ब्रिगेडसह संघटना आंदोलनाच्या पावित्र्यात

1
नाशिक | ता. ११ : आयसीयूतील रुग्णाच्या उपचारासाठी औषधाचे पैसे उकळले, मात्र त्याला संबंधित औषधेच दिली नाहीत. नातेवाईकांनी जेव्हा या प्रकारावर आक्षेप घेतला, तेव्हा आमच्या पोलिसांशी ‘अर्थपूर्ण’ ओळखी असून मिटवून घेण्याची भाषा केल्याचा खळबळजनक प्रकार नावात ‘हार्ट’ असलेल्या द्वारका भागातील एका नामांकित रुग्णालयाच्या  बाबतीत घडला आहे.

यासंदर्भात रूग्णाच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक आणि महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत या प्रकाराची वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या समितीने चौकशी केल्यानंतर त्यांनीही आपल्या अहवालात रुग्णालयाबाबत संशय व्यक्त केला आहे.

दुसरीकडे या पोलिस आणि आरोग्य यंत्रणा या प्रकारात केवळ एकमेकांना पत्राचार करत असून अजूनही संबंधित रुग्णालयावर कारवाई झाली नसल्याने या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी भूमिका छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व छत्रपती संभाजी ब्रिगेड यांनी दिला आहे.

चौकशीची टोलवाटोलवी

शहरातील या नामांकित दवाखान्यात फरीद चांद शेख यांनी आपल्या वडिलांना लघवीचा त्रास होत असल्याने दाखल केले होते.

डॉक्टरांमार्फत मेडिसिन लिहून देण्यात आल्या. परंतु त्या पेशंटला मेडिसिन दिल्या जात नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर फरीद यांनी वेळोवेळी नर्स तसेच डॉक्टरवर लक्ष ठेवण्यास सुरवात केली. त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर व खात्री झाल्यानंतर १ जानेवारी रोजी मुंबई नका येथील पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली.

त्यानंतर २ जानेवारीला मुंबई नाका पोलीस स्टेशनतर्फे नाशिकचे जिल्हा शल्यचिकित्सक यांना चौकशीबाबत पत्र देण्यात आले. त्यानंतर त्यांनी हे प्रकरण नाशिक मनपाचे वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडे वर्ग केले.

चांद शेख, आपल्या कुटुंबासह

यासंदर्भात संबंधित संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार, या चौकशी समितीत नाशिक सेक्रेटरी फिजिशियन असोसिएशन डॉ. विजय धोंडगे, आयएमएचे सेक्रेटरी डॉ. नितीन चितळकर, नाशिक मनपाचे सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत शेटे या समितीसमोर उपस्थित राहून अहवाल तयार करण्यात आला.

परंतु मुंबई नाका पोलिसांनी सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी पुन्हा शल्य चिकित्सकांकडे पत्र पाठवले. पत्राच्या अनुषंघाने जिल्हा शल्य चिकित्सकांनी ते पत्र पुन्हा आरोग्य विभाग नाशिक मनपा वैद्यकीय समितीकडे वर्ग केले.

मुंबई नाका पोलिसांनी या हॉस्पिटल येथील सीसीटीव्ही फुटेज तपासणे गरजेचे असल्याने पुढील तपास हा पोलिसामार्फत व्हावा असे पत्र देण्यात आले. त्याचबरोबर वैद्यकीय समितीने आपल्या अहवालाच्या निष्कर्षामध्ये स्पष्टपणे उल्लेख करत सांगितले की, रुग्णाच्या नातेवाईकांनी उपस्थित केलेल्या मुद्यामध्ये तथ्य आढळून येत आहे.

त्यामुळे पुढील सविस्तर चौकशी व कायदेशीर कारवाई ही पोलीस यंत्रणेमार्फत करण्यात यावी. सदर प्रकरण मुंबई नाका पोलीस स्टेशनमार्फत १ जानेवारीपासून आजपर्यंत तपासात अडकले असून चौकशीच्या फेऱ्यात अडकले असून रुग्णांना व नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

शहरातील नामांकित दवाखान्यात जर असे प्रकार खुलेआम घडत असतील तर याविरोधात वेळीच आवाज उठवला नाही तर त्यांना रान मोकळे होईल. या दवाखान्याबाबत प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी तसेच संबंधित जबाबदार वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल. असा इशारा छत्रपती शिवाजी महाराज मुस्लीम ब्रिगेड, मुस्लीम ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे.

1 COMMENT

  1. व्होकार्ट हॉस्पिटलमध्ये हे काही नवीन नाही. पहिल्यांदाच बातमी आली. कधीही बातम्या पण येऊ देत नाहीत, मेलेल्या महिलेचे 3 लाख 25 हजार रुपये मागणारे हेच हॉस्पिटल आहे. अनेक किस्से आहेत या दवाखान्याचे. नाशिक शहरात उभालेला वैद्यकीय कसाई खाना आहे, दुसरी व्याख्या नाही.

LEAVE A REPLY

*