उत्पन्न वाढीसाठी नवतंत्रज्ञानाचा उपयोग करा –  शितल सांगळे

0
नाशिक दि. 1- शेतीच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साधण्यासाठी शेतकऱ्यांनी नवतंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा शितल सांगळे यांनी केले.

जिल्हा कृषि विभागामार्फत जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित कृषि दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संजीव पडवळ, जगदिश पाटील, आत्माचे प्रकल्प संचालक अशोक कांबळे आदी उपस्थित होते.

श्रीमती सांगळे म्हणाल्या, विविध कृषि योजनांचा लाभ घेवून शेतकऱ्यांनी प्रयोगात्मक शेतीवर भर देणे आवश्यक आहे. ज्यामुळे पिकात विविधता येवून जमीनीचा कस देखील राखता येतो. देशाची अर्थव्यवस्था शेतीवरच अधिक प्रमाणात अवलंबून असल्याने शेतकरी जगला तरच देश जगेल, असेही श्रीमती सांगळे यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. पडवळ यांनी स्व. वसंतराव नाईक यांनी शेतीसाठी दिलेले योगदान व शेतीच्या प्रगतीसाठी केलेल्या सुधारणांची माहिती दिली. उन्नत शेती व समृद्ध शेतकरी अभियान आणि जलयुक्त शिवार अभियानाचा शेतकऱ्यांना लाभ झाल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात कृषि विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या कृषि विकास योजना पुस्तिका, भित्तीपत्रक, घडीपत्रिका यांचे अनावरण करण्यात आले. तसेच वर्षभरात उत्तम काम करणाऱ्या कृषि उत्पादक कंपनी, बचत गट, वैयक्तिक शेतकरी, पीक स्पर्धा विजेते शेतकरी यांचा प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला.  मृद आरोग्य पत्रिकांचे प्रातिनिधीक स्वरूपात वितरणही यावेळी करण्यात आले.

LEAVE A REPLY

*