Blog : गुरुपौर्णिमा विशेष : डॉ .ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची ‘गरुडझेप’

0
पावसात इतर पक्षी आसरा शोधत असतात पण, पाऊस टाळण्यासाठी गरुड पक्षी ढगांच्या ही वर जाऊन उंच उडत असतो, समस्या एकच असते पण दृष्टीकोन प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो.

गरुडझेप घेऊन सर्व समस्यांवर मात करणाऱ्या मिसाईल मँनची जीवन गाथा एखाद्या रोचक कादंबरीच्या नायकाप्रमाणे आहे. ज्यांना आपण डॉ ए.पी.जे .अब्दुल कलाम या नावाने ओळखतो. भारताचे 11 वे माजी राष्ट्रपती प्रसिद्ध वैज्ञानिक आणि अभियंता च्या रुपात जगविख्यात आहेत.

ते एक गैर राजनैतिक व्यक्ती असून सुद्धा राष्ट्रपती भवनाचे व्दार त्यांच्या साठी सहज खुले झाले ते त्यांनी वैज्ञानिक क्षेत्रात मिळवलेल्या उत्तुंग यशामुळे. डॉ कलाम हे अतिशय उच्च विचारसरणी अंगी बाळगणारे प्रभावशाली व्यक्तीमत्वाचे धनी  असल्याने ते सर्व जाती धर्माचे आणि समाजाचे भासत होते.

डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे  संपूर्ण नाव ‘अवुल पाकिर जैनुल्लाब्दीन अब्दुल कलाम’ त्यांचा जन्म 15 अक्टोंबर 1931 साली रामेश्वरम तमीळनाडू येथे तामिळी मुस्लीम कुटुंबात झाला. त्यांचे वडील जैनुल्लाब्दीन नाविक होते, त्यांचा मच्छीमारांना होड्या भाड्याने देण्याचा छोटासा व्यवसाय होता.

त्यांचे वडील अशिक्षित आणि गरीब होते. पण नियमांचे पालन करणारे होते. डॉ कलाम यांच्या जीवनात त्यांच्या वडीलांनी दिलेल्या संस्कारांचा अधिक प्रभाव होता. संयुक्त कुटुंबात वाढलेले डॉ . कलाम हे पाच भाऊ आणि पाच बहिणी असा त्यांचा परिवार आणि घरात आणखी तीन कुटुंब एकत्रित राहत होते.

घरची परिस्थिती बेताची असल्याने शालेय जीवन काळात त्यांनी वर्तमानपत्रे विकून घरात आर्थिक सहकार्य केले. घरात ते सर्वात लहान व घरात आर्थिक मदत ही करत म्हणून ते आईवडीलांचे लाडके होते.

रात्री उशिरापर्यंत ते राँकेलचा किंवा तेलाचा दिवा लावून अभ्यास करत असत. ते सांगत, गरिबीने मला शाकाहारी बनायला भाग पाडले अखेर ते मला आवडले.

डॉ .कलाम यांनी आपले संपूर्ण जीवन देशासाठी, समाजकार्यात समर्पित केले. ते आजीवन ब्रह्मचारी राहिले. डॉ .कलाम ज्यावेळी आठ-नऊ वर्षाचे होते. त्यावेळी, त्यांचे गणिताचे शिक्षक हुशार विद्यार्थ्यांना गणिताची मोफत शिकवणी घेत असत. त्यावेळी सकाळी चार वाजता उठून आंघोळ करून शिकवणीला जात असे, नंतर तिथून आल्यावर वडीलांसोबत सकाळी साडेपाच वाजता नमाज पढत असत.

नंतर ‘कुराण शरीफ’ अध्ययनासाठी अरेशिक स्कूल (मदरसा) येथे जात असे. त्यानंतर रेल्वेस्थानक व बस स्थानकावरून वर्तमानपत्रे गोळा करून रामेश्वरमच्या रस्त्यावर धावत-धावत विकायचे आणि शाळेत जायचे असा त्यांचा दिनक्रम होता.

डॉ. कलाम ‘एयरोस्पेस टेक्नॉलॉजी’कडे वळले. त्यामागे त्यांचे पाचवी इयत्तेचे शिक्षक सुब्रमण्यम अय्यर यांची प्रेरणा होती. एकदा त्यांनी डॉ कलाम यांना प्रश्न विचारला, पक्षी कसे उडतात? त्यावेळी त्यांना उत्तर देता आले नाही. मग सरांनी हाच प्रश्न वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना विचारला, पण कोणालाही त्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही.

त्यावेळी शिक्षक नाराज झाले नाही दुसऱ्या दिवशी सुब्रह्मण्यम अय्यर सर्व विद्यार्थ्यांना समुद्र किनारी घेऊन गेले. तिथे सर्व प्रकारचे पक्षी उतरले होते काही उडत होते काही काही उडण्याची तयारी करत होते. अय्यरांनी उदाहरणासह प्रात्यक्षिक दाखवून विद्यार्थ्यांना समजवून सांगितले आणि सर्व विद्यार्थ्यांनी बारकाईने सर्व पक्षांचे व त्यांच्या उडण्याच्या क्रियेचे निरिक्षण केले.

डॉ. कलाम यांच्यासाठी पक्षांचे उड्डाण केवळ उड्डाण म्हणून सिमित राहिले नाही ते पक्षांचे उड्डाण आणि रामेश्वरमचा समुद्र किनारा त्यांच्या ह्रदयात पूर्णपणे समावून गेले. त्यानंतर त्यांनी त्यांनी उड्डाण क्षेत्रात करिअर करण्याचा निश्चय केला.

सुब्रह्मण्यम अय्यरांनी विचारलेल्या एका प्रश्नाने त्यांच्या जीवनाला एक धेय्य मिळाले. एक दिवस आपला द्रुढ निश्चय घेऊन ते सुब्रमण्यम अय्यरांकडे गेले. मला उड्डाण क्षेत्रात करिअर करायचे आहे त्यासाठी मला काय करावे लागेल? असा प्रश्न सरांना विचारला. तेव्हा त्यांनी धैर्याने उत्तर दिले, तु आधी आठवी पास कर, नंतर हायस्कूल पूर्ण कर.. नंतर काँलेजमध्ये तुला उड्डाण क्षेत्रासंबंधित शिक्षणाची संधी उपलब्ध होईल.

नंतर पुढे जाऊन त्यांनी काँलेजात भौतिक विषयाची निवड केली. पुढे त्यांनी अभियांत्रिकी शिक्षणासाठी ‘चेन्नई इंस्टिट्युट आँफ टेक्नॉलॉजी’ येथे प्रवेश घेतला. अशाप्रकारे शालेय जीवनात घडलेली लहानशी घटना! पण त्याचा प्रभावाने उड्डाण इंजिनिअर क्षेत्राची दिशा त्यांच्या जीवनाला मिळाली.

डॉ. कलाम वैमानिक इंजिनिअर झाले तेव्हा त्यांच्या जवळ नौकरीच्या दोन मोठ्या संधी चालून आल्या, एक संधी भारतीय वायुसेना दलात आणी दूसरी रक्षा मंत्रालयात होती. रक्षा मंत्रालयाच्या तांत्रिकी विभागात 1958 साली 250 रु महिना पगारावर वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून कामकाज पाहु लागले. नौकरीच्या पहिल्याच वर्षी त्यांनी आँफिसर इंचार्ज आर. वरदाजनच्या मदतीने एक अल्ट्रासोनिक लक्ष्यवेधि विमान डिझाईन केले.

राँकेट इंजिनिअर पदावर कार्यरत असताना इंडियन कमेटी फाँर स्पेस रिचर्सकडून प्रक्षेपणासाठी त्याना बोलवून घेण्यात आले. त्याचे परिक्षण अंतरिक्ष कार्यक्रमाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांनी स्वतः केले. त्यानंतर त्यांना भारतीय अंतरिक्ष अनुसंधान समितीत राँकेट इंजिनिअर पदावर नियुक्त करण्यात आले.

डॉ. कलाम यांना राँकेट प्रक्षेपणासंबंधित तांत्रिक शिक्षणा साठी त्यांना अमेरिकेत ‘नँशनल एयरोनाँटिक्स अँण्ड स्पेस ‘ म्हणजेच ‘नासा’ येथे पाठवण्यात आले. डॉ. कलाम शिक्षण घेऊन भारतात परत आले तेव्हा त्यांनी भारताचे ‘नाईक -अपाचे’ नावाचे पहिले राँकेट अंतरिक्ष मध्ये सोडले.

डॉ. साराभाई यांनी त्याना  राटो परियोजने साठी प्रोजेक्ट लीडर म्हणून नियुक्त केले. 8 आँक्टोंबर 1972 साली उत्तर प्रदेशातील बरेली येथे स्टेशनवर या प्रणालीचे सफलता पूर्वक परीक्षण केले.

ऩंतर 18 जुलै 1980 रोजी सकाळी आठवाजून 3मिनिटांनी श्री  हरिकोटा राँकेट प्रक्षेपण केंद्रातून एस. एल. बी. 3 ने सफल उड्डाण केले. या योजनेच्या सफलतेने त्यांना राष्ट्रीय ओळख दिली. भारत सरकारने त्याना 26 जानेवारी 1981 साली ‘पद्म भुषण’ पुरस्काराने सन्मानित कले.

1980 साली त्यांनी पहिले स्वदेशी बनावटीचे  प्रक्षेपणास्र रोहिणी उपग्रह प्रुथ्वी कक्षेच्या जवळ स्थापित केला. यामुळे भारताला सुध्दा आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष क्लबचे सदस्यत्व प्राप्त झाले.’इसरो लाँन्च व्हीकल प्रोग्राम’चे श्रेय पण त्यांनाच दिले जाते.

डॉ. कलाम यांनी स्वदेशी तंत्रज्ञानातून अग्नि आणि प्रुथ्वी या सारखे दोन मिसाईल बनवले. डॉ. कलाम जुलै 1992 ते  डिसेंबर 1999 पर्यंत रक्षामंत्री यांचे वैज्ञानिक सल्लागार होते आणि सुरक्षा शोध विकास विभागाचे सचिव होते.

त्यांनी स्ट्रिटेजिक मिसाईलचा सिस्टीमचा  वापर अग्नेयास्त्रांच्या स्वरुपात केला. याप्रकारे पोखरणमध्ये  दुसऱ्यांदा न्युक्लिअर विस्फोट देखील  परमाणु ऊर्जेचा वापर करून केला. याप्रकारे भारताने परमाणु शस्त्र निर्माण करण्याची क्षमता प्राप्त केली. त्यांचा   79 वा जन्मदिन संयुक्त राष्ट्रांनी विश्व विद्यार्थी दिन म्हणून साजरा  केला.

वर्ष 2002 मध्ये डॉ. कलाम यांना भारताचे 11 वे राष्ट्रपती म्हणून नियुक्त करण्यात आले. 2005 मध्ये स्विझरलैंड सरकारने  डॉ. कलाम यांच्या स्विझरलैंडमधील दौऱ्यप्रित्यर्थ 26 मे हा दिवस विज्ञान दिन म्हणून घोषित केला. पाच वर्ष राष्ट्रपती पदाचा कार्यकाल सफलतेने पार पाडला.

त्यानंतर ते पुन्हा वैज्ञानिक, शैक्षणिक, सामाजिक,  लेखन क्षेत्रात पुन्हा आपली सेवा देण्यासाठी वापस आले. डॉ.  कलाम यांना लिखाण करण्याची आवड होती. ते रात्री दोन तास लिहित असत.  त्यांनी युवा पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी  त्यांनी दोन आत्मचरित्र लिहिले 1) विंग्स आँफ फायर 2)  साइंटिस्ट टु प्रेजिडेंट आणि  इंडिया 2020 विजन आँफ मिलेनिअन, माय जर्नी, इग्नाइटिव्ह माइंडस.

2013 मध्ये त्यांना अंतरिक्ष विज्ञानात केलेल्या कुशल कामगिरी साठी त्यांना वाँन ब्राउन अवार्ड ने सन्मानित करण्यात आले .40 विश्वविद्यालयांनी त्यांना डॉक्टरेटने सन्मानाने मानांकित केले.

भारत सरकारने त्याना पद्म भूषण, पद्मविभूषण आणि भारतातील सर्वात मोठा नागरिक सन्मान ‘भारतरत्न’ने त्यांना सन्मानित केले.

त्याना विर सावरकर पुरस्कार, इंदिरा गांधी पुरस्कार, रामानुजन पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. 27 जुलै 2015 रोजी सायंकाळी 6:30 वाजता शिलौंग येथे विद्यार्थ्यांना व्याख्यान देत असताना त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला वते खाली कोसळले.

हाँस्पिटल मध्ये नेत असताना थोर मिसाईल मँनची  रस्त्यातच प्राण ज्योत मावळली. देश सेवेसाठी स्वतः ला आयुष्यभर वाहुन नेणार्या थोर प्रभावशाली महान डॉ . ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना शत कोटी प्रणाम.

सुवर्णा सोनवणे, चाळीसगांव
7744880087

LEAVE A REPLY

*