Type to search

धरणाचे पाणी, विकसित शेती; जोडीला कॅन्सरचा आजार

दिवाळी विशेष - रिपोर्ताज

धरणाचे पाणी, विकसित शेती; जोडीला कॅन्सरचा आजार

Share

नाशिक जिल्ह्यामध्ये विकासप्रक्रिया कशी सुरू आहे? सरकारी योजनांची काय स्थिती आहे. शेतकऱ्यांसह लोकांना या योजनांचा लाभ होतो का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी महिन्यात आम्ही जिल्ह्यातील अनेक गावांत फिरलो आणि या रिपोर्टरच्या डायरीत त्याची नोंद करत गेलो. त्या डायरीचे हे दुसरे प्रकरण…

नांदुरी येथून अभोणा गाठले. कळवण तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून अभोण्याची ओळख आहे. येथील शेतकरीदेखील सधन आहे. मिरची, टोमॅटो, वाल पापडी, कोबी फ्लावरची मोठ्या प्रमाणात लागवड येथील शेतकरी करतात. चणकापूर धरण उजवा कालवा अभोण्यापासून गेल्यामुळे येथील शेतकऱ्यांना पाण्याची टंचाई भासत नाही.

अनेकांच्या विहिरी कालव्याच्या नजीक असल्यामुळे आणि तिथून पाईपलाईनकरून पाणी नेले असल्यामुळे उत्कृष्ट दर्जाची शेती याठिकाणी होते. अलिकडे बऱ्याच शेतकऱ्यांनी पॉलीहाऊसची उभारणी करून शिमला मिरचीचे दर्जेदार उत्पन्न घेऊन प्रगती साधली आहे. येथे इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. अनेक शेतकऱ्यांची मुले आता इंग्रजी शाळेत शिक्षण घेत आहेत.

नांदुरीकडून अभोणा येथे जाताना अतिरुंद घाटातून जावे लागते

अभोण्यात पाणी योजनेअंतर्गत घराघरांत नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. ‘उन्हाळ्यात कमी दाबाने पाणी येते, एरवी पाण्याची कधीही टंचाई नाही’, एका कृषी सेवा केंद्राचे चालक सांगत होते. हे गाव हागणदारी मुक्त झालेले आहे. कळवण व देवळा येथून गॅस एजन्सीधारक दर आठ दिवसाला अभोण्यात सिलेंडरची गाडी पाठवतात तिथून ग्राहकांना सिलेंडर वितरीत होते. उज्ज्वला योजनेअंतर्गत वन विभागाकडून अनेक आदिवासींना गॅस वाटप करण्यात आले आहेत. त्यांनाही अभोण्यात येऊन सिलेंडर घेऊन जावे लागते.

नांदुरी – अभोणा रस्त्यावर असलेले घाटमाथ्यावरील अदिवासी मुलांचे वसतीगृह

अभोणा सोडल्यानंतर पुढे मोर्चा कनाशीकडे वळवला. २५० ते ३०० आदिवासी खेडोपाड्यांनी वेढलेल्या या भागातील कनाशी हे एक महत्वाचे गाव आहे. व्यापारी आणि व्यावसायिकांचे गाव म्हणूनही या गावाची ओळख आहे. वनसंवर्धनासाठी येथील नागरिकांनी कंबर कसली असून याठिकाणी वन विभागाचे मोठे कार्यालय आहे. वन विभागाकडून वृक्षलागवड, गलोलमुक्त जंगल, पशुसंवर्धन यासारखे उपक्रम राबविले जातात. परिसरात उज्ज्वला योजनेअंतर्गत अनेक घरांत वनविभागाकडून गॅस पोहोचविण्यात आला आहे.

अत्याधुनिक पद्धतीचा शेतीचा नमुना : मल्चिंग पेपर पसरवून केलेली मिरचीची लागवड

चणकापूर धरण लागूनच असलेल्या या गावात अनेक आदिवासी शेतकऱ्यांनी शेतीत चांगला जम बसवला आहे. चणकापूर धरणाचे पाणी उन्हाळ्यात कमी कमी होत जाते. त्यामुळे मागे राहिलेल्या सुपिक गाळात येथील शेतकरी टोमॅटो, मिरची, कोथिंबीरची लागवड करतात. मिळालेले उत्पन्न उंबरठ्यावर न विकता मुंबई, सुरत याठिकाणी पाठवतात. यामुळे शेतकऱ्यांना बाहेरच्या बाजाराचा अंदाज आला आणि दिवसागणिक त्यांची प्रगती होत गेलेली दिसते.

येथील आदिवासींच्या मुलांसाठी येथील स्थानिक नेत्यांनी वसतीगृह, आश्रमशाळा उभारून उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले आहेत. हजारो आदिवासी विद्यार्थी या आश्रमशाळेतून शिक्षण घेऊन सरकारी नोकरी, स्वतःची कंपनी व्यवसायात उतरल्याची अनेक उदाहरणे आहेत.

कनाशी : आदिवासी शेतकरी धरणाची पाणी पातळी कमी झाली की गाळयुक्त जमिनीत मिरची, कोबी, फ्लावर सारख्या भाजीपाल्याचे उत्पादन घेतात…

कळवण तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये कनाशीचादेखील समावेश आहे. गाव हागणदारी मुक्त अद्याप १०० टक्के झालेले नसले, तरीही अनेक कुटुंबांनी स्वखर्चाने तसेच अनुदानातून शौचालयांची उभारणी केली आहे. येथील डॉ. अशोक बहिरम यांचेशी चर्चा झाली. त्यांच्यासह या भागांत १५ च्या आसपास दवाखाने आहेत. सरकारी दवाखान्याची अवस्था चांगली आहे.

पण कुत्रे चावले, सर्पदंश झाल्यावर तेथे उपचार मिळत नाहीत. त्यामुळे खेड्यातील आदिवासींची गैरसोय होते. अनेकदा गावकऱ्यांनी प्रश्न मांडले, मात्र ही समस्या आहेत त्याच स्थितीत आहे. ग्रामीण भागात कुपोषण तर नाही पण मधुमेह, तुरळक कर्करोगाचे रुग्ण आढळून येतात. व्यसनाधीनतेमुळे या भागात हे प्रमाण असावे, असे डॉ. बहिरम यांनी सांगितले.

वनखात्याकडून जंगलतोड, सागवानची चोरी, लाकडांची अवैध वाहतूकीवर नियमित पाळत ठेऊन कारवाई करण्यात येते. कनाशीत प्रत्येक घरात नळ योजनेअंतर्गत पाणी पोहोचले आहे. टंचाईच्या काळात गैरसोय होऊ नये म्हणून ठिकठिकाणी बोअर करून पाणीटंचाई दूर करण्याचा प्रयत्न केल्याचे ग्रामस्थ सांगतात.  एकंदर विकासाच्या वाटेवर हे गाव असल्याचे जाणवते.

चणकापूर धरणाच्या बांधावरून धरणातील दिसत असणारी हिरवीगार शेती

कनाशी येथून पुढे चणकापूर धरणाच्या बांधावरून थेट चणकापूर गाव गाठले. धरणाच्या आजूबाजूचा परिसर प्रचंड झाडाझुडूपांनी वेढलेला आहे. याठिकाणी परिसरातील अनेक पर्यटक धरणावर फिरण्यासाठी आलेले दिसून आले. ठिकठिकाणी मच्छिमार उभे होते. पात्र मोठे असल्यामुळे याठिकाणी गोड्या पाण्यातील मासेमारीदेखील चालते. मच्छिमार वणी, नांदुरी, कळवण, अभोणा याठिकाणी मासे विक्रीसाठी नेतात.

कसमादे(कळवण, सटाणा, मालेगाव व देवळा) तसेच खानदेशची जीवनदायिनी समजले जाणारे चणकापूर धरण

पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे सध्या कमी प्रमाणात हा व्यवसाय सुरु आहे. वन विभागाकडून १३ कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य यंदाच्या पावसाळ्यात ठेवले आहे. धरणच्या नजीकच वन विभागाची प्रचंड मोठी नर्सरी असून याठिकाणी रोपटे जगविण्यासाठी प्रयत्न युद्धपातळीवर सुरूं आहेत. चणकापूर गावाची कहाणी करूण आहे. गावातील प्रत्येकाची जमीन विहीर, नाला धरण बांधले तेव्हा धरणात गेले. तेव्हापासून जवळपास सर्वच धरणग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त आहेत. सरकारी योजनांचा लाभ मात्र येथील जनतेला खूप कमी प्रमाणात झाला आहे.

सुरगाणा तालुक्यातील केम नदीचा उगम आहे. तांबडी नदी आणि गिरणा नद्यांचाही उगम सुरगाणा तालुक्यातीलच आहे. पुढे या नद्या एकत्र येऊन या नद्यांवर चणकापूर धरण बांधण्यात आले. चणकापूर गाव आदिवासी बहुल आहे. चणकापूर धरण गावापासून हाकेच्या अंतरावर असूनही या धरणाचा शून्य फायदा या गावाला होतो.

नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठ्या ७ धरणातील एक असलेले चणकापूर धरण

इंग्रजांनी  १९०३ साली हे धरण बांधले. समुद्रसपाटीपासून धरणाची उंची १६८ फुट आहे तर १४१ फुट धरणाच्या पाणीपातळीपासून उंचीवर असल्याची माहिती येथील शेतकरी दादा जगताप यांनी दिली. निसर्गपर्यटन म्हणून नावारूपाला आलेले चणकापूर धरणाच्या आजूबाजूचा परिसर वन विभागाकडून अतिशय स्वच्छ करण्यात आला असून याठिकाणी गेस्ट हाऊसची उभारणी करण्यात आली आहे.

अनेक पर्यटक याठिकाणी मुक्कामालादेखील येतात. पुढे चणकापूर गावाहून अभोणा येथे परतलो. अभोणा ते चणकापूर रस्ता अतिशय चांगल्या अवस्थेत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूचे अतिक्रमण बांधकाम विभागाकडून काढण्यात आल्यामुळे वाहतुकीस कुठल्याही प्रकारचा अडथळा येत नाही. तसेच येथील शेतकरीही सधन असून मिरची, कोबी, कांदे, गहू, खरिपाच्या हंगामात बाजरी, मक्याची लागवड करतात.

वनविभागाचा १३ कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम इथूनच सुरु होतो

अनेकांनी याठिकाणी शेवग्याची लागवड केली आहे. अनेक शेतकऱ्यांना कांदा चाळीचे अनुदान प्राप्त झाले असून त्या माध्यमातून त्यांनी शेतात चाळी बांधल्या आहेत. याठिकाणी अनुदान लाभार्थी शेतकऱ्याचा गट क्रमांक, नाव याबाबत माहिती चाळीनजीक बघावयास मिळाली. शेतीच्या योजनांचा लाभ घेण्याची कुवत येथील शेतकऱ्यांमध्ये असल्याचे पाहून समाधान वाटले. तेथून परत  अभोण्यात येऊन सावकी कोल्हापूर फाटा मार्गे मानूर गावाकडे मोर्चा वळवला. (क्रमश:)

  • दिनेश सोनवणे, देशदूत डिजिटल
Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!