Video : नाशिककर गायक ऋषिकेश शेलारचा तमाशाच्या फडापासूनचा ‘नाममात्र’ प्रवास

0

अंधारून आली बाई घरामधी रात,

राबणारा गेला कसा मातीच्या भावात

इस्कटून गेली सारी संसाराची घडी

छोटी कशी झाली गोष्ट डोंगराएवढी…

मुंबई नाका (दिनेश भागवत) |

शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणाऱ्या ‘नाममात्र’ मालिकेतील एक गाणं नाशिक जिल्हातील प्रसिद्ध कवी प्रकाश होळकर यांनी रचले आहे. विशेष म्हणजे हे गाणं नाशिककर गायक ऋषिकेश शेलार याने गायले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या मालिकेच्या निमित्ताने नाशिककर कलाकाराची अनोखी पेशकश प्रेक्षकांना लळा लावणार आहे.

ऋषिकेश मुळचा सिन्नर तालुक्यातील निमगाव देवपूर या खेडेगावातील. गावाची लोकसंख्या अवघी ५००  ते ७०० आहे.  सिन्नर तालुक्यातीलच वंडांगळी येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे ८ व्या इयत्तेत होते.

याप्रसंगी गणेश डोकबाणे या संगीत शिक्षकाची नेमणूक झाली होती. ऋषिकेशचा आवाज डोकबाणे सरांना आवडला. त्यांनी ऋषिकेशला गाण्यास सांगितले. तेव्हापासून खऱ्या अर्थाने ऋषिकेशच्या गाण्याचा श्रीगणेशा झाला.

गाण्यातील काहीही माहिती नसतानादेखील डोकबाणे सरांनी त्यास गाण्याचे धडे दिले. त्यानंतर मोठ्या स्टेजवरचे ऋषिकेशने पहिले गाणे गायले. क्षण होता स्नेहसंमेलनाचा. गाण्याचे बोल होते. हे शिव शंकर गिरीजा तनया गण नायक प्रभू वरा… तेव्हापासून ऋषिकेशने गायनाला सुरुवात केली.

त्यानंतर तमाशा सम्राट काळू बाळू यांचा वंडांगळीत तमाशाचा फड लागला होता. त्यातील गायक आजारी पडला होता. वेळेवर ऋषिकेशला संधी मिळाली. संधीचे सोने करत ऋषिकेशने तमाशा चांगलाच गाजवला.  त्याच्या कामगिरीवर तमाशातील कलाकार खुश झाले त्यांनी मानाची मखमली टोपी परिधान करून ऋषिकेशचा सन्मान केला.

त्यानंतर ऋषिकेशचे १० ते १२ वी शिक्षण लासलगावला झाले. १२ वी नंतर पुन्हा संगीरकार बी. आर. चव्हाणके यांच्याकडे गायनाचे धडे घेतले.

गायनाचे धडे घेता घेता एका बाजून ऋषिकेशची पदवी पूर्ण होत होती. पदवी झाल्यानंतर ऋषिकेश नाशिकमध्ये पुढील शिक्षणासाठी आला.

त्यानंतर ऋषिकेशने उस्ताद रशीद खान यांचे शिष्य असलेल्या पंडित प्रसाद खापर्डे यांच्याकडे गायनाचे धडे घेतले. ऋषिकेशने आतापर्यंत शुभांगी सदावर्ते, आनंद ओक, सौरभ कुलकर्णी, रसिका नातू , अबोली गटणे , भूषण काळोखे , मयुरी निमोणकर, भार्गवी कुलकर्णी, शयुरी कुलकर्णी, अनिकेत शेलार, पंकज वारुंगसे, विपुल आपटे, पंकज कुटे ही संगीत साधना करणाऱ्या मंडळीचा ऋषीकेशला परिसस्पर्श झाला.

उस्ताद राशीद खान यांच्या समवेत पंडित प्रसाद खापर्डे. सध्या ऋषिकेश पं. प्रसाद खापर्डे यांच्याकडे गायनाचे धडे घेत आहेत.

‘नाममात्र’चा प्रवास

झी मराठीवर सध्या नाम फाउंडेशनच्या कामावर आधारित ‘नाममात्र’ नावाची मालिका सुरु झाली आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारी मालिका ग्रामीण भागात चांगलीच लोकप्रिय झाली आहे.

या मालिकेतील सर्वात लोकप्रिय झालेले गाणं नाशिकच्या ऋषिकेश शेलारच्या आवाजातील आहे. विशेष म्हणजे लासलगाव येथील प्राध्यापक कवी प्रकाश होळकर यांनी रचलेल्या या कवितेच्या ओळी आहेत.

गाण्याला असलेली पार्श्वभूमी सुरुवातीला ऋषिकेशला समजावून सांगण्यात आली. त्यानंतर गाणे रेकॉर्ड झाले. मग हे गाणे पुढे नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांना ऐकविण्यात आले.

गाणे ऐकल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता गाणे याच मुलाच्या आवाजात रेकॉर्डिंग करून हवंय! या मुलाच्या आवाजात गावरान तडका आहे. त्यानंतर ऋषिकेशचे गाणे नव्याने रेकॉर्ड करण्यात आले आणि आज नाममात्र मालिकेत डोळे पाणावतील अशा आवाजात त्याने गायले आहे.

ऋषिकेश शेलारच्या आवाजातील गाणं

LEAVE A REPLY

*