मायानगरीचे व्यवस्थापन करणारा नाशिकचा ‘अमित’

0

अशोक आढाव | देशदूत डिजिटल विशेष 

चित्रपटसृष्टी म्हणजे साक्षात मायानगरी. या मायानगरीत अनेकजण आपले स्वप्न साकारण्याचा प्रयत्न करतो. त्यातच नाशिकच्या एका तरुणाने या मायानगरीत आपल्या कलेच्या जोरावर प्रवेश करत नाशिकचे नावलौकिक केले. अमित कुलकर्णी असे या युवकाचे नाव. आजची तरुण पिढी चार-पाच आकडी पगाराची नोकरी करण्यातच धन्यता मानतात. परंतु, ही चाकोरी मोडून काढत अमितने चित्रपटनिर्मिती व्यवस्थापन क्षेत्रात नावलौकिक मिळवत करियरचा नवा मंत्र या पिढीला दिला.

नाशिक ही भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची जन्मभूमी. दिग्गज सुपरस्टार दिलीपकुमार यांच्याशी नाते सांगणार्‍या, देवळालीत रुजलेल्या, उमललेल्या अमित कुलकर्णीने ‘हम भी कुछ कम नहीं’ अशी वाटचाल सुरू केली आहे. फाळके व दिलीपकुमार यांचा वारसा चालवण्याची धडपड तो करतो आहे. बॉलिवूडचे लक्ष नाशिकच्या दिशेने वळवण्याचे अवघड काम अमित करू पाहत आहे.

नाशिक हे अनेक गोष्टीत अद्वितीय असे म्हणता येईल. येथील भौगोलिक परिस्थिती, हवामान, जंगल, हिरवीगार शेती, आदिवासी संस्कृती, परदेशात सापडतील अशी लोकेशन, सर्वात चांगली गोष्ट म्हणजे मुंबईच्या तुलनेत येथील स्वस्ताईमुळे निर्माते नाशिकला पसंती देत आहेत.

चित्रपट व्यवस्थापनची कोणतीही पदवी नसताना फक्त कष्ट व अनुभवातून त्याने उत्तुंग झेप घेतली आहे. माजी आमदार बबन घोलप व सुभाष घिया यांच्या मार्गदर्शनाखाली अमितने 2000 साली ‘राजा शिवछत्रपती’ या मालिकेपासून व्यवस्थापनास प्रारंभ केला. काही वर्षे त्याने स्वखर्चावर ही कामे केली. 2003 साली राजकुमार संतोषी दिग्दर्शित ‘खाकी’ चित्रपटाद्वारे त्याने खर्‍या अर्थाने कामास सुरुवात केली.

कामाच्या जिद्दीमुळे व ओळखी वाढल्याने त्याला काम मिळत गेले. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. आज नाशिक जिल्ह्यात कोठेही सिनेमाचे चित्रिकरण करायचे असेल तर त्याचे नाव आवर्जून घेतले जाते. हिंदी व मराठी चित्रपटाचे व्यवस्थापन करता करता राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय जाहिरातींचे कामही त्याला मिळू लागले.

आतापर्यंत 100 हून अधिक जाहिरातीचे व्यवस्थापन केले आहे. तसेच नामवंत खेळाडू व कलाकारांना नाशिकमध्ये चित्रिकरणासाठी आणण्यास त्याने सुरुवात केली. चित्रिकरणासाठी हवे तसे लोकेशन व सहकार्य हमखास मिळेल, असा विश्वास निर्माण झाल्यानेच दिग्दर्शक व निर्माते अमितचे नावाला प्रथम प्राधान्य देत आहे. गत महिन्यात सिनेनिर्माता आशुतोष गोवारीकर त्यांच्या आगामी ‘पानिपत’ चित्रपटाच्या लोकेशनसाठी नाशिकला आले होते.

त्यांनाही नाशिक भावले. अमितमुळे जिल्ह्याच्या महसुलात वाढ होत असून स्थानिक कलाकार, हॉटेल व्यावसायिक, ट्रान्सपोर्ट आदींना काम करण्याची संधी मिळत आहे. राजकुमार संतोषी, राकेश ओमप्रकाश मेहरा, विशाल भारद्वाज, सुजित सरकार, प्रदीप सरकार यांसारख्या अनेक दिग्गज दिग्दर्शकांचे चित्रपटाचे व्यवस्थापन अमितने यशस्वीरित्या पार पाडले आहे. मालेगाव येथे पोलीस दल आयोजित मॅरेथॉनची चित्रफितही अमितने तयार केली होती.

नाशिकमधील लोकेशन्स :

गोदाघाट, कापड बाजार, काळाराम मंदिर, सेंट्रल जेल, सोमेश्वर धबधबा परिसर, देवळाली कॅम्प परिसर, देवळाली कॅम्प रेल्वे स्टेशन, कसबे-सुकेणे रेल्वे स्टेशन, भगूर, त्र्यंबकेश्वर परिसर, इगतपुरी परिसर, गंगापूर गाव, महामार्ग स्टॅण्ड, सिन्नर-घोटी रस्ता.

या कलाकारांसोबत कामाचा अनुभव :

अमिताभ बच्चन, आमीर खान, अजय देवगण, आर. माधवन, अक्षयकुमार, ऐश्वर्या राय, तुषार कपूर, अतुल कुलकर्णी, विवेक ओबेराय, नाना पाटेकर, अयुब खान, ईशा शर्वरी, सोहेल खान, बिपाशा बासू, करिना कपूर, नसरुद्दीन शाह, मुकेश तिवारी, प्रियंका चोप्रा, सुनील शेट्टी, दिया मिर्झा, शाहिद कपूर, गोविंदा, संजय नार्वेकर, अंकुश चौधरी, भरत जाधव, नेहा पेंडसे, तृप्ती भोईर, वैभव तत्ववादी.

आतापर्यंत चित्रिकरण केलेले चित्रपट :

राजा शिवछत्रपती, खाकी, किसना, ब्लॅकमेल, रामजी लंडनवाले, रंग दे बसंती, ओमकारा, डेड लाईन, दिवार, अपहरण, बुलेट राजा, ओंकारा, जय-विरू, कमिने, शू बाईट, रावण, जोकर, देढ इश्किया, जॉनी मस्ताना, मिले ना मिले तुम, इंग्लिश विंग्लिश, पीके, तूच माझा भाऊराया, फक्त सातवी पास, गुलाम बेगम बादशाह. ऑल इज वेल, देवा, रईस, रिव्हॉल्व्हर रॉनी, अक्सर-2.

येणार्‍या काळात नाशिकमध्ये आशुतोष गोवारीकरचा ‘पानिपत, वैभव तत्ववादी, स्पृहा जोशी यांचा ‘खलीवली’ तर वैभव आणि प्रार्थना बेहरे यांचा ‘कावर’ या चित्रपटांचे चित्रिकरण होणार आहे. नाशिकच्या विकासासाठी व नवतरुणांसाठी याचा नक्कीच फायदा होईल.
– अमित कुलकर्णी, लाईन प्रॉड्युसर

LEAVE A REPLY

*