ऊसतोड कामगाराची मुलगी झाली PSI; राज्यात मुलींमधून १७ वा क्रमांक

0
सायगाव (एकनाथ भालेराव) | येवला तालुक्यातील खरवंडी येथील सीमा काशिनाथ खडांगळेने महाराष्ट्रातून अनुसूचित जाती प्रवर्गातून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले.

सीमा तिचा राज्यात १७ वा क्रमांक आला. येवला तालुक्यातील खरवंडी गाव. सीमाचे वडील काशिनाथ फकिरा खडांगळे हे ऊसतोड कामगार होते. वडीलासह पाच भावंडांचे एकत्रित कुटुंब. घरची परिस्थिती अतिशय बेताची. शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून असल्याने आर्थिक अडचणी नित्याच्याच.

त्यामुळे ऊसतोड कामासाठी जावे लागे. त्यातून मुलांना शिकवून मोठे करायचे त्यांना पुन्हा शेतीकडे फिरकून देखील द्यायचे नाही. कारण आम्ही ज्या यातना भोगतो आहोत, त्या मुलांनी भोगू नये.

अशिक्षित असुन देखील सीमाचे काका कारभारी खंडागळे यांची जबरदस्त इच्छाशक्ती व शिक्षणावरील विश्वास, भावनिक आधार, घरातील संस्कार तसेच ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध असून जो पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही’ हे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, मोठे काका यांची हिंमत सीमासाठी प्रेरक ठरली.

खरवंडी गावातील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते चौथी प्राथमिक शिक्षण घेऊन सीमाने मनमाड येथे सेंट झेवियर मनमाड बोर्डिंग स्कूलमध्ये पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण घेतले.

लहानपणापासून पोलीस खात्यात जायचे असा मानस होताच त्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल भरती देखील केली व अवघ्या एक गुणांनी ती संधी हुकली.

मात्र प्रयत्न न सोडता तिने स्पर्धा परीक्षेचा जोमाने अभ्यास सुरु केला व ज्या मैदानावर पोलीसाची नोकरी एका गुणांनी गेली त्याच मैदानावर सीमाने पोलीस उपनिरीक्षक पदाची शारीरिक चाचणी परीक्षा दिली.

बी. ए., एम. ए. इंग्लिश व इतिहास स्पेशल विषयात तिने दुसरी डिग्री पूर्ण केली. समाज कल्याण विभाग नाशिकच्या होस्टेलला राहून अभ्यासाची तयारी केली. वसतिगृहात राहून गिते अभ्यासिकेत सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत दिशाहीन अभ्यास करायचा.

सीमा मुळात हुशार पण महत्वाचा अभ्यास कसा करावा हे तिला माहित नव्हते त्याच वेळी तिला मार्गदर्शक म्हणून मिळाला गणेश सास्ते. यांनी तिला अभ्यासाची दिशा दिली. फुले, शाहू, आंबेडकर, डॉ अब्दुल कलाम यांचे विचार देखील तिच्यासाठी आदर्श होते. घरातील प्रत्येकाचा तिला खंबीर आधार होता. यांच्या जीवावरच मी या पदापर्यंत पोहचू शकले असा तिचा उदात्त विचार आहे.

महाराष्ट्रात अनुसूचित जाती या राखीव जागेसाठी मुलींसाठी २९ जागा होत्या. त्यात १७ व्या क्रमांकावर घवघवीत यश मिळवले. जि. प. शाळा मराठी माध्यमातून माझा पाया पक्का झाला व सर्व विषय मला पदवीपर्यंत अभ्यासायला मिळाल्याने मला खूप आनंद होतो आहे असे सीमा म्हणते.

माझ्या या यशामागे मित्र व जीवलग मैत्रिणींचा, पाहुणे, यांचा देखील मोलाचा वाटा आहे व त्यांची मी आयुष्यभर ऋणी राहील तसेच यांच्या या सहकार्यामुळेच मी PSI झाले व यापुढे तहसीलदार होण्याचं माझं स्वप्न आहे व मी तहसीलदार होणारच असा आत्मविश्वास व पुढील ध्येय असल्याचे सीमाने देशदूतशी बोलताना सांगितले.

अतिशय बिकट व प्रतिकूल परिस्थिती, पाठीमागे कुठलेही आर्थिक, शैक्षणिक पाठबळ नसतांना पैशाअभावी कुठलीही अँकॅडमी जॉईंट न करता मिळवलेले हे यश खरच ग्रामीण भागातील तरुणांसाठी व तरुणींसाठी प्रेरणादायी आहे.

सीमा खडांगळेचा गावासाठी व तरुण पिढी योग्य मार्गाने चालवण्यासाठी, मुली देखील आपली मान गर्वाने उंच करू शकतात ही भावना रुजवण्यासाठी संपूर्ण तालुक्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, पुढाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी तिचा अध्ययन अनुभव आपल्या गावासाठी उपलब्ध करून द्यावा.

रुपचंद रामचंद्र भागवत, उपसभापती पंचायत समिती येवला.

परिस्थितीतही मोडला नाही कणा

आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना कितीही अडचण काढायची पण मुलांना, मुलींना उच्च शिक्षण द्यायचेच. मुलांनी देखील माझ्या या इच्छाशक्तीला दाद देत मनापासून शिक्षण घेतले. आज गर्वाने आमची मान उंचावली.

कारभारी फकिरा खंडागळे, सीमाचे चुलते, खरवंडी

LEAVE A REPLY

*