Blog : यार दिलदार, जसपाल सिंग विर्दी

0
जसपालसिंग विर्दी हा तरुण म्हणजे नाशिक सायक्लिस्टचा आयडियल माणूस. तो नाशिक सायक्लिस्टचा अध्यक्ष असताना त्याने कितीतरी उपक्रम राबविले. नाशिक सायकल कॅपिटल व्हावे हे त्याचे स्वप्न होते. त्याने त्यासाठी पुढाकार घेतला होता. नाशिक शहरात त्याने कितीतरी उपक्रम राबविले. हे उपक्रम दिवसेंदिवस वाढत गेले.

जसपालसिंग हे नाव सर्वदूर पोहचले. विर्दी हे मूळचे पंजाबचे. आजोबांनी नोकरी व्यवसायासाठी नाशिक गाठले आणि ते नाशिककर होवून गेले. पंजाबी माणसाची उद्यमशीलता त्यांनी जपली आणि नोकरीतून व्यवसायाकडे मोर्चा वळविला. सातपूर, गोंदे (नाशिक) येथील औद्योगिक वसाहतीत स्वतःचे उद्योग सुरु केले . स्वतःच्या उद्धाराबरोबरच नाशिक मधील पंजाबी समाजाचे संघटन जसपालच्या आजोबांनी केले. नाशिकची गुरु गोविंद सिंग शैक्षणिक संस्था हे त्याचे उदाहरण.

‘नाशिक पंढरपूर सायकल वारी’ हा उपक्रम दिवसेंदिवस वाढत चालला आहे. नाशिक सायक्लिस्टच्या या उपक्रमात दोन-तीन वर्षापासून पाचशे सायक्लिस्ट आणि स्वयंसेवक सहभागी होत असतात. या उपक्रमात दोनतीन वर्षापासून जसपालसिंग स्वतःला झोकून देत असे. वारीचे अचूक नियोजन करण्याकडे त्याचा कल असे.

सायक्लिस्टची सुरक्षा महत्वाची मानून तो नियोजन करण्याकडे त्याचा कल असे. जसपालसिंग उत्तम संघटक होता . पंजाबी माणूस शूर, लढवय्या आणि उद्यमशीलही असतो तसाच तो भाबडाही असतो. जसपालमध्ये हे सगळेच गुण कमी अधिक प्रमाणात होते. एका सायक्लिस्टने सायकल भेट मागितली. आर्थिक दृष्ट्या सबल असणा-या माणसाला हा चक्क नवी सायकल देवून मोकळा. घेणाराही हुशार होता, अमूक कंपनीची सायकल हवी असे मागणारा म्हणाला आणि या भल्या माणसाने तो हट्ट सुध्दा पुरवला.

जसपालसिंग उदार होता. एका आदिवासी पाडयावर स्ञिया पाणी भरायला अनवाणी पायाने जाताना दिसल्यावर हा माणूस चपलांचा जोड घेवून तिथे पोहचला. आपण या भगिनींना खाण्यासाठी काही बरोबर आणले नाही, या उणिवेवर त्याने लगेच मात केली. रस्त्याने खाली, पावबटर विकणारा चालला होता . जसपालने त्याचा सगळा माल विकत घेतला.

त्याच्या लक्षात आले, ये कम पडेगा. जसपालसिंग गावातल्या दुकानात गेला आणि तिथली सारी बिस्कीटाची पुडे घेवून मोकळा झाला. भाबडेपणापेक्षा जसपालसिंग उदार अधिक होता. त्याने एक आदिवासी शाळेवर आईच्या नावाने संगणक भेट दिला होता. तिथल्या मुलामुलींना सायकलही दिल्या होत्या.

याचा अर्थ तो पैसा उधळत होता, असे नाहीं. उद्योजकीय कुटुंबातील माणसांना पाॅकीटमनी दिला जातो. तो त्यांनी खर्च करायला हरकत नसते. काही लोक वीकेंडला हा पैसा वापरतात, काही हाॅटेलिंग , मौजमजेत पैसा खर्च करतात , काही तिर्थयाञांवर खर्च करतात. जसपालसिंग समाजातील असल्याने असा खर्च करीत असे. नाशिक सायक्लिस्टसाठी तो तन मन धनाने एकरूप झाला होता.

नाशिकच्या डाॅ हितेंद्र महाजन आणि डाॅ महेंद्र महाजन बंधुंनी RAM (Race Across America) ही अतिशय खडतर अशी सायकल स्पर्धा जिंकली तेंव्हा नाशिक सायक्लिस्टच्या सभासदांना आणि नाशिककरांना खूप आनंद झाला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ या आकाशवाणीवर प्रसारित होणा-या भाषणातही या घटनेची दखल घेतली. सायकलविषयी लोकांमध्ये कुतूहल आणि क्रेझ निर्माण झाली.

पंतप्रधान कार्यालयाने या दोन्ही बंधूंचा सत्कार करण्यासाठी दिल्लीला बोलावले. या दौ-याचे प्लॅनिंग करण्यात जसपाल आघाडीवर होता. तिकीट बुकींगपासून तर तिथल्या व्यवस्थेपर्यंत जसपालने प्लॅनिंग केले. नाशिकहून किरण चव्हाण, जसपाल महाजन बंधूंबरोबर होते. मुंबईहून हरीश बैजल सहभागी झाले. खा. हेमंत गोडसे, खा. हरिश्चंद्र चव्हाण लोकप्रतिनिधी म्हणून या सत्कारात सहभागी झाले. सात जणांची टीम पंतप्रधान कार्यालयाजवळ अगदी वेळेवर पोहचली.

पंतप्रधान कार्यालयाची सुरक्षा अतिशय कडक असते. तिथे गेल्यावर सुरक्षा रक्षकांनी फक्त सहा जणांनाच जाता येईल असे सांगितले. दिल्लीत सातजण पीएमओ कार्यालयात पोहचलेले. एकाला हा सत्कार ऑखो देखा पाहता येणार नव्हता. या पेचप्रसंगात जसपालसिंग म्हणाला, तुम लोग जाओ! मै बाहर रुकता हूँl

जसपाल नितळ आणि पारदर्शी माणूस होता. सर्व पलॅनिंग करण्यात आघाडीवर असणा-या जसपालने बाहेर थांबण्यात कमीपणा मानला नाही. त्याच्या दृष्टीने डाॅ महाजन बंधूचा पंतप्रधानांनी केलेला सत्कार महत्वाचा होता. सायकलिंग प्रमोट करण्यात आघाडीवर असणारा जसपालसिंग जिंदादिल माणूस होता.

जसपालसिंग बिर्दी हा तरुण उदार होता. त्याने नाशिककरांची मने जिंकली होती. दिवसरात्र सायक्लिस्टच्या उपक्रमाला वाहिलेल्या या यूवामिञाने अखेरचा श्वास घेतला तो क्षण सुध्दा सायकलच्या उपक्रमात. हृद्यक्रीया बंद (HeartFelt) पडून जसपालसिंग गेला आणि सारे नाशिक शोकसागरात बुडाले.

माझिया जातीचे मज भेटो कोणीचा अनुभव नाशिककरांनी घेतला . मी स्वतः अमरावती विद्यापीठाच्या आवारात होतो. जसपालसिंग गेल्याची बातमी कळली आणि हादरलोच. नाशकात पोहचलो तर सगळेच मिञ शोकसागरात बुडालेले.  जसपालसिंग गेला! कुठे गेला? तो तर आपल्यात आहे…मिञा असा कसा लळा लावून गेलास! जसपालसिंग अमर आहे हेच खरे!

प्रा. शंकर बोऱ्हाडे, सायकलीस्ट नाशिक.

LEAVE A REPLY

*