Blog : साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती विशेष

0

भारतामध्ये अनेक महापुरुष, थोर समाजसुधाररक, क्रांतिकारी, लोक होऊन गेले. प्रत्येकाचे कार्ये हे देशाच्या हितासाठी, समाजाच्या हितासाठी महत्वाचे आहे,  महापुरुष्यांची हि कार्ये आजही समाजाला प्रेरणा देणारी आहे, त्यांचे विचार आजही समाजाला, देशाला मार्गदर्शक ठरत आहेत.

यामध्ये प्रामुख्याने महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, महात्मा ज्योतीबा फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब  आंबेडकर यांच्याबद्दल आपण नेहमी ऐकत आलेलो आहोत. यांच्याबद्दल आपण नेहमी ऐकत आलेलो आहोत. त्यामुळे आणाभाऊ साठे यांच्याबद्दल  प्राथमिक माहिती तरी आपल्याला असावी यासाठी हा लेख लिहण्याचा प्रयत्न आहे

जन्म  घरची परिस्थिती : अण्णाभाऊ साठे यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० ला वाटेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली या ठिकाणी झाला. अण्णाभाऊ साठे यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. अण्णांचे बालपण हे वाटेगावच्या निवडुंगात तग धरून उभ्या असलेल्या मातंग वस्तीत अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गेले.

त्यांच्या घरी २० गुंठे वडिलोपार्जित जमीन होती, परंतु कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल एवढे अन्नधान्य त्यात पिकत नव्हते. त्यामुळे उपासमारी पाचवीलाच पुजलेली होती, त्यातच सातारा जिल्हा ‘फकिरा ‘च्या बंडाने पेटलेला होता हा फकिरा मातंग कुळातला आणि अण्णांच्या नात्यातला, त्याच्या बंडाने ब्रिटिश सत्तेला व सरंजमदाराना सतत हादरे देण्यास सुरुवात केली.

त्याच्या या वागणुकीमुळे मातंग समाजवारच गुन्हे नोंदविले जायचे. १९२५ मध्ये गुन्हेगार जमातीच्या वसाहतीचा कायदा पास झाला. तेव्हा कुठेही काही पण  घडले तरी मातंगांच्या घरी झाडाझडती घेतली जायची.

स्वाभिमानाने व प्रामाणिकपणाने जीवन जगणाऱ्या अण्णाभाऊंच्या आई वडिलांना या परिस्थितीचा आणि आजूबाजूच्या वातावरणाचा त्रास व्हायचा, वडिलांना, आपले जीवन सुरक्षित वाटेना, मानसिक त्रास व्हायचा, निराशा, मुलांच्या भविष्याची चिंता या गोष्टीमुळे अण्णांचे वडील म्हणजे भाऊ यांनी वाटेगाव सोडण्याचा विचार केला आणि त्यानुसार त्यांनी गाव सोडून ते मुंबई ला निघून गेले.

एका मोठ्या शहरात आपण पहिल्यांदाच जातोय त्या ठिकाणी कामधंदा, राहण्याची सोय, याची कोणतीच नसल्यामुळे भाऊ साठे एकटेच मुंबईला गेले. मुंबईत आल्यानंतर भाऊंना फक्त शेतीची कामे येत असल्यामुळे त्यांनी धनिकांच्या घरी बागकाम करून बागा फुलविल्या, बागेच्या कामानिमित्त श्रीमंत व उचशिक्षित लोकांचा समाज त्यांनी जवळून बघितला तेव्हा भाऊंना सुद्धा वाटायला लागले आपलेही मुले अशा शहरात राहावीत, त्यांनाही चांगले चांगले शिक्षण मिळावे.

ती मोठी व्हावीत, इकडे वाटेगावला आई वालुबाई आपल्या मुलांसह जो कामधंदा मिळेल तो करून व मिळणाऱ्या मनिऑर्डरवर संसाराचा गाडा पुढे हाकायच्या. मनिऑर्डर सोबत अण्णांचे वडील म्हणजे भाऊ साठे पात्र पाठवायचे त्या पत्रात अण्णांना शाळेत घालण्यासाठी सूचना असायच्या.

अण्णाभाऊंचे शिक्षण : त्या काळी दलितांसाठी, मागासवर्गींयांसाठी वेगळी शाळा भरायची सवर्णांच्या शाळेच्या व्हरांड्यात ती भरायची. शिकवणारे शिक्षकही उच्चवर्णीयच होते.शिक्षक लांबूनच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे द्यायचे. बाराखडी, पाढे, अंकलेखन असे शिक्षण असायचे. अण्णाभाऊंचा शाळेचा पहिला दिवस उजाडला होता.

दुपारपर्यंत मास्तरची नजर अण्णाभाऊंच्या पाटीवर गेली नव्हती आणि जेव्हा गेली ते ती नजर अण्णाभाऊंची वाट लावणारी ठरली. कारण मास्तरांनी अण्णाभाऊंची पाटी बघितली तर त्या पाटीवर काहीच लिहलेले नव्हते.  पाटी कोरी होती कारण अण्णाभाऊ यांना काहीच लिहता येत नव्हते.

पाटीवर काहीच लिहलेले नसल्याचा मास्तरांना राग अनावर झाला, अण्णाभाऊंना शिक्षा केली, मास्तरांनी अण्णाभाऊंची बोटं फोडून काढली या घटनेचा अण्णाभाऊंच्या मनावर खूप परिणाम झाला आणि त्यामुळे अण्णांनी कधीच शाळेचे तोंड पहिले नाही, केवळ दिड दिवसाची शाळा अण्णांच्या वाट्याला आली.

अण्णाभाऊंचे बालपण छंद  : अण्णाभाऊंना लहानपनापासून काही छंद जडलेले होते त्यांना डोंगरात नद्याखोऱ्यांत जंगलात फिरणे, लोकगीते म्हणणे, दांडपट्टा हा त्यांचा आवडीचा खेळ असायचा, या शिवाय सूरपारंब्या खेळणे, गाई म्हशींशी झुंज लावणे, पोहणे, कबुतर पाळणे, पोपट, साळुंखी, सुतार पक्षी अशा विविध पक्षांच्या आवाजाची नक्कल करणे असे सर्वसाधारणपणे १३९२ पर्यंतचा कालावधी दौडण्यातच गेला.

खर तर याच अनुभवाच्या शिदोरीनें त्यांना महान साहित्यीकांच्या यशोशिखरावर विराजमान केले. ते लोकगीत पाठ करून करून चालीवर म्हणायचे, पोवाडे, लावण्या पाठ करायचे, म्हाताऱ्या माणसांकडून वेगवेगळ्या गोष्टी ऐकायचे, त्याचवेळी भारताच्या स्वातंत्र्याची चळवळसुद्धा वेग धरत होती.

कोल्हापूर, सांगली, सातारा याठिकाणी तरुण मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होऊ लागले, याच गोष्टीचे वेड अण्णाभाऊंना सुद्धा लागू लागले, त्यामुळे अण्णा घराबाहेर राहू लागले, पुढे पुढे तर अण्णा  आपल्या चुलत भावाच्या तमाशाच्या फडासोबत यात्रा करू  लागले, तेव्हा अण्णांचे हे प्रताप बघून आई वालूबाईंनी पती भाऊ साठे याना पत्र  पाठवून काय बी करा पण आमाला बम्बईला घेऊन जा, नाई तर तुक्या हातचा जाईल असे कळविले, पत्र  मिळाल्यानंतर भाऊ साठे यांनी कुटुंबाला मुंबईला नेण्याचा  विचार  केला.

प्रवास मुंबई नगरीचा : १९३१ पर्यंतचा काळ हा बालपणातच गेला. पक्षांसारखे हुंदडणे, शिकार करणे, गाणे म्हणणे, सुगीच्या दिवसात जे-जे मिळेल ते ते खाणे, फकीरासारखे बंड  करून गरिबांना न्याय देण्याची स्वप्ने पाहणे, लोकनाट्यात, तमाशात छोटी मोठी कामे करणे ऐन सुगीच्या काळातच वडिलांसोबत मुंबईला जाण्याची वाट स्वीकारली.

१९३१ चा काळ होता अत्यंत हालअपेष्टा सोसत हे कुटुंब मुंबईच्या दिशेने चालले होते. उन्हा-तान्हात रखडत कधी उपाशी तापाशी अवस्थेत हे कुटुंब सातारा पुणे कल्याण भायखळा अशा एकेक गावाला मागे टाकत मुंबई नगरीमध्ये मार्गक्रमण करत होते.

शेवटी सहा महिन्यांचा वाटेगाव ते मुंबई भायखळा प्रवास थांबला, भायखळ्यालाच थांबावे असे भाऊ साठेंना वाटले, त्यांनी चाळीतील चांदबीबी वस्तीत खोलीचा शोध घेतला व एका भाड्याच्या खोलीत कुटुंब राहू लागले. आई वडील दैनंदिन कामला लागले, दिवस उगवू लागला, मावळू लागला तशी अण्णाभाऊंना मुंबईची ओळख होऊ लागली.

चांदबीबी वस्ती ही प्रामुख्याने कष्टकऱ्यांची, कामगारांची. तेथे हातावरचे पोट असणारी लोक राहायची, त्यामुळे कामगारांचा संप झाला, हरताळ झाली, मोर्चे निघाले निघाले तरी त्याचा परिणाम संपूर्ण वस्तीवर पडायचा, त्यामुळे या गोष्टींचे कुतूहल व आकर्षण अण्णांना होतेच ह्याच काळामध्ये सांगली जिल्यातील पुनवत या गावाचे एक मातंग समाजाचे व्यापारी भाऊ साठेंकडे राहायला आले.

त्यांचा व्यापार होता जुने – नवीन कपडे देवाणघेवाणीचा. अण्णांचे वय हे फिरण्याचे असल्याने अण्णा त्या व्यक्तीसोबत कपड्यांचे गाठोडे डोक्यावर घेऊन रोजंदारी मुंबईमध्ये लागले. फिरता-फिरता अण्णांनी संपूर्ण मुंबई पायाखाली घातली.  बाराखडीची थोडीशी ओळख असणारे अण्णा रस्त्याच्या पाट्या, त्यांच्या समजण्यानुसार वाचू लागले.

अण्णांची अक्षरओळख : अण्णांना वारणेच्या काठी, त्यांच्या गावाकडचा एक मातंग भाऊबंद भेटला होता, मुंबईत गावाकडची ओळख निघाली, गप्पागोष्टी झाल्या, चहापाणी झाला आणि निरोप देताना तो मांगबंधू अण्णांना म्हणाला की, येणाऱ्या दोन दिवसांनी श्रावण महिना लागणार हाय  ‘मी रामविजय ग्रंथ मांडणार आहे, तू रोज रात्री माझ्या खोलीवर पोथी वाचायला येत जा, अण्णांनी लगेच होकार दिला आणि अण्णांनी प्रश्न विचारला की, पण पोथी वाचणार कोण?

त्यावर मांगबंधू म्हटला की कोण कशाला मीच वाचणार हाय की तू ये तर खरं, मांगबंधूंचे हे उत्तर ऐकून अण्णा भावुक झाले. त्यांच्या डोळ्यात पाणी आले, की आपल्याच गावाकडचा मांगबंधू बम्बईला येऊन पोथी वाचतोय, तो कसा शिकला असेल, कोणी शिकविले असेल? कधी शिकला असेल? अशा सर्व प्रश्नांची कुतूहलता व जिज्ञासा लागली, तेव्हापासून अण्णा रोज दिवसभर फेरी करून आल्यावर रात्री वरळीच्या त्या बावन चाळीच्या मांगबंधूकडे जायला लागले.

तो मांगबंधू रामविजय ग्रंथातील ओळी सुंदर अशा आवाजाच्या चढउतारात लोकांना स्पष्ट करून सांगायचा, त्यातील शब्द आणि शब्द अगदी त्यात रमून भक्तिभावाने तो लोकांना समजावून सांगायचा, स्पष्ट  शब्दोच्चार व भराभर वाचन या गोष्टी बघून अण्णाभाऊ थक्क झाले, त्यांना स्वतःवर पस्तावा यायला लागला, डोळ्यात अश्रू उभे राहिले, शिक्षणाशिवाय माणसाला पर्याय नाही, या गोष्टींची जाणीव व्हायला लागली.

गावाकडच्या शाळेत फक्त दीड दिवस शाळेत जाऊन शिक्षणाचा धडा न गिरवता त्या मास्तराला दगड मारून शाळा सोडली, या गोष्टीचा आता अण्णांना पस्तावा येऊ लागला आणि शिक्षणाबद्दलची आपुलकी, कुतूहलता, जवळीकता, वाढू लागली, मांगबंधूकडून दररोज ग्रंथ ऐकता ऐकता अण्णांनी मांगबंधूकडून शिक्षणाचे धडे गिरवायला सुरुवात केली.

बाराखडी, पाढे, अक्षरलेखन, अंकओळख, जोडाक्षरे व त्यानंतर वाचन यामध्ये अण्णा रमून जायला लागले. त्यांना फक्त शिक्षणाचीच आस आणि गोडी लागली होती, त्यांना स्वप्ने पण शिक्षणाचीच पडायला लागली होती. शिक्षणाचा साक्षात्कार व्हायला लागला होता, हेच अण्णांचे बिना प्रमाणपत्रांचे शिक्षण होते, यातूनच अण्णांनी कादंबऱ्या, नाटके, पोवाडे, कथा, शाहिरी, लावण्या लिहल्या.

अण्णांचे तारुण्य अवस्थेतील जीवन : अण्णांच्या तारुण्याचा हा काळ होता, अण्णाभाऊ कामगार संघटनेच्या अनेक कार्यक्रमामध्ये सक्रिय झाले होते, कामगारांची आंदोलने, अनेक सामाजिक संघटनांचे कार्यक्रम तसेच महात्मा गांधी, बॅरिस्टर जीना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विविध राजकीय व्यक्ती यांच्या कार्यक्रमामुळे मुंबई ढवळून निघत असताना अण्णाभाऊची एन्ट्री नव्यानेच या क्षेत्रामध्ये होत होती.

अण्णाभाऊ कम्युनिस्ट पक्षाकडे झुकत चालले होते. कामगारांचे आंदोलने, मोर्चे, चळवळी यामध्ये अण्णा सक्रिय सहभागी होऊ लागले, कम्युनिस्ट वर्तुळामध्ये आता अण्णा शाहीर म्हणून उदयास होऊ लागले होते, या निमित्ताने विविध लोकांशी, कार्यकर्त्यांशी ओळखी वाढल्या संबंध वाढले त्यातच पुण्यामध्ये अण्णांची एका तरुणीशी ओळख झाली. त्या तरुणीचे नाव होते जयवंताबाई. जयवंताबाई या विवाहित होत्या. त्यासुद्धा कम्युनिस्ट संघटनेचे काम करत होत्या.

त्यांना एकमेकांबद्दल आस्था वाटायला लागली, प्रेम वाटायला लागले, आपुलकी वाटायला लागली एकमेकांबद्दल आदर वाढला, सहवास वाढला व १९४५ च्या सुमारास अण्णाभाऊ व जयवंताबाई मुंबईस आले व एकत्रच राहू लागले व पुढे त्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला.

विवाहामुळे अण्णांच्या भटकंतीला विराम मिळाला होता, जयवंताबाईंनी अण्णांना प्रोत्साहन दिले व अण्णांमधील कलाकार जपून जातं केला. पत्र्याच्या चाळीतील छोट्याशा घरात प्रेरणा देऊन, प्रोत्साहित करून मनातील उदासीनता काढून टाकली व यातूनच समाजजीवनाला स्पर्श करणाऱ्या कलाकृती निर्माण झाल्या. या काळामध्येच ‘खोपऱ्या चोर’ , ‘अकलेची गोष्ट’ ही लोकनाट्य लिहिली व ती रंगमंचावर सादर केली.

अण्णाभाऊंचे कष्टकर्यांसाठी / कामगारांसाठी / अन्याय अत्याचाराच्या विरोधासाठी/ ब्रिटिशांच्या अन्यायाविरोधात बंड पुकारण्याची अजरामर साहित्य.

  • गावगाडा गावगाडा या कथेत अण्णांनी दलितांवर झालेल्या अन्याय अत्याचार व त्याविरुद्ध दलितांनी केलेला संघर्ष याबद्दलचे चित्रण केले आहे, गावगाड्यात माणसे आपल्यावर झालेल्या अन्याय अत्याचाराविरुद्ध सतत संघर्ष करतात, संघर्षाशिवाय त्यांना पर्याय उरत नाही कधी-कधी तर नैराश्यातून टोकाची भूमिका घेतली जाऊ शकते असे अण्णांनी मांडले.
  • सापळा  : सापळा ह्या कथेत अण्णांनी रेखाटले आहे की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार प्रबोधनातून त्यांच्या आवाहनातून दलितांमध्ये जागरूकता निर्माण झाली आहे, बहुजन अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी संघर्षाचा भाग म्हणून गावगाड्यांशी संपर्क तोडतात. सापळाया कथेत मांडले की, महार मंडळी मेलेली जनावरे ओढण्याचे काम नाकारतात, कथेतील हारबा महार आपल्या गावकीचे काम व जनावरे ओढण्याचे काम नाकारतो.
  • विष्णुपंत कुलकर्णी : या आपल्या कथेत अण्णाभाऊ दुष्काळात घडलेल्या सत्य घटनेवर आधारित अशी व्यक्ती चित्रणात्मक कथा लिहतात. दुष्काळामध्ये गरीब, दलित, दीनदुबळे हैराण झाले होते, पोटाला अन्नही मिळत नव्हते, तेव्हा काही लोक तोडगा म्हणून माळवाडीच्या माठातील धान्यांची लूट करतात. आणि त्यावेळेस प्रांतसाहेब चोरीच्या आरोपाखाली दलित आणि मांगांना तुरुंगात टाकतात. तेव्हा मांगांची बाजू घेऊन विष्णुपंत कुलकर्णी संघर्ष करतात यातून अण्णा दाखवून देतात की शासनाची ध्येयधोरणे ही दलित, गरीब,पीडित, शोषितांच्या विपरीत असूनही पोटाला अन्नसुद्धा मिळत नाहीये ही शोकांतिका आहे. म्हणतात की. आमच्या पूर्वजांनी आतापपर्यंत मेलेली जनावरे ओढली परंतु आजपासून ती कामे आपण कधीच करणार नाहीत हे विचार त्याचे नव्हते तर ते विचार बाबासाहेबांचेच होते कारण बाबासाहेबांच्या प्रबोधनामुळे हे शक्य झाले.
  •  कोंबडीचोर : कोंबडीचोर या कथेतील रामू हा पोटाची खळगी भरण्यासाठी चोरी करतो, चोरी करणे ही सुद्धा त्याच्यासाठी कला होती. तो एखाद्या गावात गेल्यावर कोरड्याश्याची मागणी करायचा आणि दुसरीकडे धान्याचे दाणे कोंबड्याने टाकायचा थोडे दाणे कोंबडीकडे व थोडे स्वतःच्या पायाजवळ दाणे, जेव्हा पायाजवळचे दाणे खायला कोंबडी जवळ यायची तेव्हा तो पायाच्या अंगठ्यात व बोटात त्या कोंबडीचे मुंडके पकडायचा व चोरीलेली कोंबडी दुसऱ्या गावात नेऊन विकायचा. चोरीच्या ह्या धंद्यामुळे रामूला ‘रामू कोंबडीचोर’ हे नाव भेटले.  याच कथेतून अण्णांना दाखवायचे होते की, स्वातंत्र्यानंतरसुद्धा सामान्य माणूस नीट जगू शकत नाहीये, त्याची भूक भागवत न आल्यामुळे माणूस वाईट मार्गाला लागतो, सामान्य माणसाच्या दुःखाला वाचा फोडण्याचे काम त्यांच्या लिखाणातून समाजासमोर येते.
  • माझी मैना  : माझी मैना या लावणीमध्ये मैनेचे व्यक्तिमत्व अण्णाभाऊंचे समाज जीवनाचे आकलन, त्यांच्या वर्गीय जाणिवेची खोली, चिकित्सा करणाऱ्या चिंतनाची कुवत, प्रीती, विरहाने व्याकुळ झालेल्या नायकाचे दर्शन घडवणारी जिवंत तळमळ आणि विद्रोहाचा वणवा घेऊन पेटलेली इ. गोष्टी दर्शवते.
  • फकिरा : फकिरा या आपल्या कादंबरीत अण्णाभाऊंनी फकिरा या वीरपुरुष्याची व्यक्तिरेखा रेखाटली आहे. फकिरा हा बंडखोर व्यक्ती होता. तो सरकारच्या विरोधात बंड पुकारायाचा, त्यांना लुटायचा, गरीब, दीनदुबळ्या, दलित, आदिवासी, डोंगराळ भागात, वारणेच्या नदी खोऱ्यात राहणाऱ्या लोकांना न्याय मिळवून द्यायचा. या फकिराच्या सर्व घटना, गोष्टी क्रमवारीने मांडून अण्णांनी फकिराला जगासमोर आणण्याचे काम फकिरा या कादंबरीच्या माध्यमातून केले आहे. फकिरा या कादंबरीत फकिरा हा मुख्य नायक आहे तर फकिराचे विकसन, त्याची जात-जमात, पंथ, वाटेगाव गावातील इतर माणसे व इंग्रजांविरुद्ध असलेला संघर्ष या सर्व गोष्टींचा समावेश आहे.
  • अण्णाभाऊंनी फकिरा ही कादंबरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीला अर्पण केली आहे. बाबासाहेबानी दलितांना, उपेक्षितांना, गुलामगिरीतून, दास्यातून, जोखडातून मुक्त होण्याचा बाहेर पडण्याचा, अन्यायाविरुद्ध बंड पुकारण्याचा संदेश दिला.
  • जगण्याची प्रेरणा दिली, समाजात समता, स्वातंत्र्याता, बंधुता, न्यायता रुजविण्यासाठी अविरत कष्ट घेतले. मांग जातीमध्ये जन्माला आलेला फकिरा हा आपल्या जमातीच्या मुक्ततेसाठी सामाजिक  व्यवस्था व पारतंत्र्यातील राजकीय व्यवस्थेसाठी लढा देत राहिला. अशा प्रेरक व्यक्तिमत्वाच्या फकीराची झुंजारकथा अण्णांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केली.

अण्णा निघाले रशियाला : प्रवास करून अण्णांचे कुटुंब भायखळा मुंबईला आले आणि आता प्रवास मुंबई ते थेट रशिया आणि तोही विमानाने किती आश्चर्याची बाब आहे ना? रशियाला जाण्याचा योग्य आलं अति फकिरा  या कादंबरी मुळेच कारण या कादंबरीला सरकारचा पुरस्कार जाहीर झाला होता.

अण्णा आणि त्यांच्या शिष्टमंडळा ला रशिया मधून बोलावणे आले. तेव्हा आणा रशियाला जाण्यासाठी निघाले. अण्णा आणि त्यांचे शिष्टमंडळ विमानात बसायला वर चढत होते, सर्व लोक अण्णांकडे बघत होते कारण अण्णांची राहणीमान अगदी साधी होती. एक काळासावळा माणूस, ज्याला नीट टॉय सुद्धा बांधता येत नाही, असा कोणी तरी एखादा मुरकी माणूस विमानाने प्रवास करतोय असे आजूबाजूच्या प्रवाश्याना वाटत होते.

पण हळूहळू प्रवासात लोकांना जाणीव झाली की हेच ते लोकशाहीर आणि साहित्यिक अन्नाभाऊ साठे. अण्णाभाऊ भावुक झाले त्यांना घरची, परिवाराची, मुंबईची आठवण येत होती. अशा आठवणींमध्ये बुडालेले असतानाच रशिया आले, त्यांचा पाहुणचार  सेव्हियत स्काय या आलिशान हॉटेल मध्ये झाला.

रशियामध्ये अण्णाभाऊंना अनेक भारतीय, महाराष्ट्रीयन लोक भेटले ते आपल्या देशावर,  आपल्या कामावर प्रेम करतात. काम आणि संस्कृतीवर प्रेम करतात, राजमार्गावर प्रेम करतात.

अण्णाभाऊ साठे रशियातील विविध शहरात फिरले, तेथील संस्कृती समजावून घेतली. तेथील समाजव्यवस्था समजावून घेतली, तेथील खेड्यात भेटी दिल्या. अण्णांच्या मते रशियातील खेडी म्हणजे भारतातील प्रगत शहरे असतील एवढा विकास रशिया मध्ये होता. भारतातील खेडी अजूनही अशमयुगात जगात असतील, तेथील लोक फक्त आणि फक्त श्रमाला प्राधान्य देत होते. श्रम हाच त्यांचा धर्म, सामुदायिक शेती हा त्यांचा प्रयोग अशीच काहीशी योजना भारतातसुद्धा असावी असे अण्णांना वाटायला लागले.

कामगारांची / कष्टकऱ्यांचे प्रशंसा दि. २ मार्च १९५८ मध्ये आयोजित केलेल्या महाराष्ट्र  दलित साहित्य संघाच्या पहिल्या साहित्य संमेलनात अण्णाभाऊ साठे उदघाटनपर भाषण करताना अण्णाभाऊ साठे म्हणतात की , ही पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावर नसून दलितांच्या / कष्टकऱ्यांच्या / गरिबांच्या तळहातावर तरलेली आहे.

गरीब माणूस आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी प्रामाणिकपणाने, सरळमार्गाने काम करून, संघर्ष करून आपल्या पोटाची भूक भागवितो, तो नेहमी धडपड करीत असतो. तो अति कष्टाचे काम करीत असतो, अवघड कामे करतो, दलित विजेच्या तारा तोडतो. खाणीत उभे राहून सुरुंगाना पेट देतो. पोलादाचा रस करणाऱ्या भट्टीवर तो निर्भय वावरतो आणि सर्व ठिकाणी तो मृत्यूशी सामना करत असतो.

ही जगण्याची ,मरणाची प्रीत आहे, दलित वरवर कंगाल दिसत असला तरी त्याची संसार करण्याची इच्छा केव्हाही पवित्रच असते, कुठलेही काम तो करायला तयार होतो, म्हणून अण्णा म्हणतात की, पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावर नसून दलितांच्या / कष्टकऱ्यांच्या / /गरिबांच्या तळहातावर तरलेली आहे ”

जग बदल घालुनी घाव,  सांगून गेले मज भीमरावहजारो वर्षाच्या जातीपातीच्या नावाखाली गरीब, दीनदुबळा, दलितांवर साम्राज्याची पगडी होती, या साम्राज्यविरोधात, वर्णव्यवस्थेविरोधात, अस्पृश्यतेविरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर लढा उभारत होते. सामाजिक न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करत होते, लढाऊ साम्राज्यवादही भारतात रुजू झाला होता. तेव्हा खऱ्या अर्थाने अशा समस्यांची सोडवणूक करून दुखी माणसाची जीवघेण्या

अवस्थेतून मुक्तता करावयाची असेल  व त्यांना सुखी जीवन जगायला शिकवायचे असेल तर हे जग बदलायला हवे आणि ते बदलण्यासाठी त्यावर घाव घालावा लागेल ,तो घाव कशाचा ? तर तो घाव विचारांचा असेल , कृतीचा असेल. आणि हे सर्व बदलण्याची ताकद फक्त आणि फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारात होती.

हे अण्णाभाऊंनी जाणले होते म्हणूनच ते म्हणत होते की जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मज भीमराव मोठ्या कष्टामधून , श्रमातून , अनेक प्रयत्नातून उभा राहिलेला हा समतेचा विचार आज टिकविणे गरजेचेच आहे परंतु समता नांदताना भेदभावाचे चित्र आजही समाजात दिसते . या देशात गौत्तम बुद्धाने समतेची भाषा केली पण त्यांना पुराणमतवादी लोकांनी संपविले , ज्योतिबा फुलेंनी समतेचा विचार मांडला तर त्यांना  शेणा विटांचा मार  खावा लागला. बाबासाहेबानी समता दाखवली त्यांना अनेक मानसिक, शारीरिक अपमान सहन करावा लागला  होता.

त्यातच अण्णाभाऊंनी समतेची भाषा ,समतेचे लिखाण उभे केले तर ते सुद्धा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचू दिले नाहीत. आजही लोकांना छत्रपती शिवाजी महाराज नीट माहित नाही, महात्मा फुले नीट माहित नाहीत , डॉ. बाबासाहेब आंबेडकर माहित नाहीत आणि अण्णाभाऊ साठे नीट माहित नाहीत.

आपण फक्त महापुरुष्याना डोक्यावर घेऊन भेदभाव करून कट्टरतावाद निर्माण करत आहोत, परंतु  महापुरुष्याना डोक्यावर न घेता डोक्यामध्ये घेण्याची खरी वेळ आजच्या समाजाला आहे.

ज्या ज्या महापुरुष्यानी समतेची भाषा केली त्यांना पद्धतशीर संपविण्याचा प्रयत्न संकुचित प्रवृत्तीच्या घटकांकडून झाला आहे . त्यामुळे या समतावादी महापुरुष्याचे सर्वच क्षेत्रातील विचार आपल्याला स्वतःच्या आचरणात आणावे लागतील . तीच  महापुरुष्याना हीच खरी आदरांजली असेल.

प्रा. मिलिंद पाडेवार, वाणिज्य विभाग, भोसला मिलिट्री महाविद्यालय नाशिक

संपर्क 8055170812

LEAVE A REPLY

*