नाशिक जिल्ह्यात सरासरी २१ मिमी पाऊस; ६ तालुके कोरडेच

0
नाशिक | गेल्या अनेक दिवसांपासून पाठ फिरवलेला पाऊस आज नाशकात परतला. मात्र अजूनही जिल्ह्यातील सहा तालुके पूर्णपणे कोरडेच आहेत.

अनेक शेतकऱ्यांनी वातावरणाचा अंदाज बघून पेरणी केली, मात्र त्यानंतर पावसाची वाट बळीराजा पहावी लागली. आज नाशिकमध्ये संततधार पाऊस सुरु असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून मुसळधार पावसाची मात्र प्रतीक्षाच आहे.

आज दिवसभरात नाशिक जिल्ह्यात २१ मिलीमीटरच्या सरासरीने पाऊस पडला. यात नाशिकमध्ये २२, इगतपुरीत ४७, त्र्यंबकमध्ये ४५, दिंडोरीत ०७, पेठमध्ये सर्वाधिक ६९, निफाडमध्ये ०.५, सिन्नरमध्ये ०३, चांदवडमध्ये ००, देवळ्यात ००, येवला ०१, नांदगाव ००, मालेगावमध्ये ००, बागलाणमध्ये ०२, कळवणमध्ये ०४ व सुरगाणा ३४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

इगतपुरी, त्र्यंबक, पेठ, सुरगाणा तालुक्यात पावसाची संततधार गेल्या काही दिवसांपासून सुरु असल्यामुळे पावसाची टक्केवारी या भागात वाढली आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी भाताची आवणी केली असून येथील शेतकरी समाधानी आहे.

मात्र नाशिकच्या कसमादे पट्टा, दिंडोरी, निफाड, येवला, नांदगाव व चांदवड परिसरात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे येथील शेतकरी अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

या परिसरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला की येथेही पाऊस पडेल अशी माहिती हवामान तज्ञ किरणकुमार जोहरे यांनी दिली आहे. म्हणजेच येणाऱ्या काळात नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

पुण्याकडे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पाऊस पुण्याकडे सरकला. त्यामुळे पुण्याकडेही आज पावसाने हजेरी लावली. लवकरच मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली जात आहे.

१५ जुलै पर्यंत करा पेरणी

पावसाने यंदा उशिराने हजेरी लावली असली तरी अजून पेरणी करण्यास वाव असल्याची माहिती तज्ञांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी गोंधळून न जाता मका, बाजरी व कापसाची लागवड करावी.

LEAVE A REPLY

*