
रायपूर, ता.जळगाव । वार्ताहर Jalgaon Raipur
जळगाव जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या वाढत असतांना व गाव परिसरातील गावांमध्येही करोनाचे रूग्ण आढळून आले मात्र अशी स्थिती आपल्या गावात येवू नये यासाठी ग्रामस्थ, करोना योध्दांसह ग्रामपंचायत व पोलीस विभागाने योग्य वेळी योग्य ती आवश्यक कार्यवाही करून गाव करोना मुक्त ठेवले आहे व यापुढेही गावात बाधा होऊ नये यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत गाव आहे रायपूर (ता.जळगाव) त्याचीच ही सचित्र यशोगाथा...
जळगाव शहरात रोज करोना बाधितांची संख्या वाढत आहे. तर रायपूर हे गाव शहरापासून काही अंतरावरच व एमआयडीसीला लागून असूनही याठिकाणी आजपर्यंत करोनाचा एकही रूग्ण आढळून आला नाही.
करोनाचा शिरकाव गावात होऊ नये यासाठी येथील ग्रामपंचायत, कोरोना समिती व ग्रामस्थांच्या प्रयत्नांनी रायपूर कोरोनामुक्त ठेवण्यात ग्रामस्थांना यश मिळाले आहे.
एमआयडीसी लगत गाव असल्याने गावात भाडेकरींची संख्या मोठी आहे, असे असूनही सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रा.पं. कर्मचारी तसेच कोरोना समितीतील तलाठी, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका तसेच गावातील प्रतिष्ठीत नागरिक यांनी आधिपासूनच खबरदारी म्हणून आवश्यक ती कार्यवाही केली आहे.
ग्रामस्थांना कोरोना आजाराविषयी जनजागृती, योग्य आहार घेण्याबाबत तसेच आरोग्याविषयी योग्य काळजी घेवून शासकीय नियमांचे योग्य पालन व अंमलबजावणी करण्याबाबत विनंती केली.
पदाधिकारी व कर्मचार्यांनी स्वतः अंमलबजावणी करुन ग्रामस्थांनाही त्याचे महत्त्व समजावून सांगितल्याने रायपूर गाव कोरोनामुक्त ठेवण्यास मोलाची मदत मिळाली आहे.
तसेच नियमांची काटेकोर अंमलबजावणीसाठी पोलिसांचेही मोलाचे सहकार्य लाभले. शासकीय नियमांचे काटेकोर पालन व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले तर कितीही मोठ्या संकटावर सहज मात करणे शक्य होते हे रायपूर ग्रामस्थांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले आहे.
जलजन्य व किटकजन्य आजार व साथीचे आजार पसरु नये म्हणून ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे कोरोना आजारासोबत साथीच्या रोगांचा प्रसार टळण्यास मोलाची मदत झाली.
गर्दी टाळण्यासाठी गावातील सार्वजनिक मंदिरे बंद करण्यात आल्याने कोरोना संसर्गजन्य आजारावर नियंत्रण मिळविणे शक्य झाले.
जि.प.शाळेत पोषण आहार वाटप करतांना कुपन पध्दतीचा वापर करुन तसेच सोशल डिस्टंसिंग व सॅनिटायझरचा वापर केल्याने नियमांचे पालन करणे सोयीचे ठरले.
कायदा सुव्यवस्था कायम राखण्यासाठी व गावातील चौकाचौकात होणारी गर्दी, मास्कचा वापर न करणारे नागरिक, फेरिवाले, विक्रेते यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस विभागाचे सहकार्य मोलाचे ठरले.
लॉकडाऊन काळात नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने रेडक्रॉस सोसायटीतर्फे नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
गावात घरोघरी फिरुन जलजन्य व किटकजन्य आजारांची माहिती देण्यात आली. त्यामुळे कोरोना आजारासोबतच साथीच्या आजारांचा प्रसार होण्यासही प्रतिबंध बसला. नागरिकांचे अनमोलसहकार्य व कोरोना समिती सदस्यांचे परिश्रम यामुळे रायपूर कोरोनामुक्त ठेवण्यास यशस्वी ठरल्याने नियोजन, अंमलबजावणी, एकजूटीमुळे कोणत्याही संकटावर मात करणे शक्य असल्याचे यावरुन दिसून आले.