पर्यटकांना आकर्षित करतोय बिलगावचा बारधार्‍या धबधबा

सातपुडयात निसर्ग बहरलाय....!
पर्यटकांना आकर्षित करतोय बिलगावचा बारधार्‍या धबधबा

जितेंद्र ढोले

धडगाव । दि.10 - NANDURBAR

गेल्या महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे सातपुडयात निसर्ग बहरलेला आहे. सातपुडयाच्या पर्वतरांगांमध्ये दरीखोर्‍यांमध्ये अनेक धबधबे फेसाळतांना दिसत आहेत, तर नद्या मोठया प्रमाणावर प्रवाहीत झालेल्या आहेत.

त्यामुळे सध्या सातपुडयात मनमोहक वातावरण आहे. त्यातल्या त्यात धडगाव तालुक्यातील बिलगाव येथील बारधार्‍या धबधबा पर्यटकांना खुणावतांना दिसत आहे.

पावसाळा हा ऋतू सर्वाना हवा हवासा वाटणारा असतो.च त्यातल्या त्यात सातपुडा पर्वतरांगांमध्ये तर हा ऋतू अधिकच बहर घेवून येत असतो. पावसासोबत नवीन ध्येय, नवीन आशा अशा अनेक गोष्टी सातपुडयात पहायला मिळतात.

पानझडी प्रकराची वृक्ष वने आपल्या सातपुड्यामध्ये आढळतात. त्यामुळे या ठिकाणी पूर्ण सातपुडयामध्ये नवीन पालवी फुटलेली असते, जी सर्वाना आकर्षित करते. हिवाळा येता येता पूर्ण सातपुडा घनदाट जंगलात रुपांतरीत होतो.ओढे, नद्या नवीन रुप घेऊन प्रवाहित झालेले असतात. त्यामुळे वीक एंडच्या सुटीसाठी सातपुड्यात अनेक रमणीय ठिकाणे उपलब्ध आहेत.

सध्या तरी सातपुडा अनेकांना आकर्षित करत आहे. बिलगाव हे गाव छोटेसे गाव सर्वांनाच ठाऊक आहे. स्वदेश चित्रपटाची प्रेरणा या ठिकाणाहूनच घेतली गेली आहे. या ठिकाणी असणारा धबधबा सर्वांचे आकर्षण आहे.

बिलगाव येथील शेतामध्ये आदिवासी पद्धतीने वसलेली घरे डोळ्यांची पारणे फेडणारी आहेत. यातच समोर नर्मदा नदी म्हटले कि सुंदरतेत आणखीन मोलाची भर पडते. साधारण धडगावपासून 20 किमी अंतरावर वसलेले हे गाव कधी काळी स्वतःची वीज निर्मिती करत होते. संपूर्ण गावाला या ठिकाणाहून वीज पुरवठा केला जात होता.

पण बर्‍याच वर्षापूर्वी आलेल्या महापुरात संपूर्ण वीज प्रकल्प वाहून गेला आणि पुन्हा एकदा बिलगाव अंधाराच्या काळोखात हरवून गेले. पण शासनाच्या अथक प्रयत्नाने या ठिकाणी वीज पोहचली आहे. बिलगाव हे गाव उदय नदी व टिटवळी या दोन नंद्यांच्या संगमावर वसलेले आहे.

या ठिकाणी शासकीय आरोग्य केंद्र व शासकीय आश्रमशाळा असल्याने शेजारील 30 गावांचा या ठिकाणी कायम संपर्क असतोच. सध्या सोशल मिडियामधून या ठिकाणचे बरेच फोटो वायरल झाले आहेत. बरेच धडगाव आणि आजूबाजूच्या तालुक्यातील पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात. येथील धबधब्याकडे जाणारा रस्ता हा आश्रमशाळेतून जातो.

आश्रम शाळेच्या गेटमधून 10 मिनिट चालत गेलो तर सरळ संगमाच्या ठिकाणीच पोहचता येते. शाळेचे विद्यार्थी हा मार्ग येण्या जाण्यासाठी वापरत असतात. याच ठिकाणी जुन्या वीज प्रकल्पाचे अवशेष अजूनही पाहायला मिळते.

या ठिकाणी उदय नदीवर असलेला बारधार्‍या धबधबा गर्जत कोसळत असतो. उदय नदीचे पाण्याचे पात्र एकदम दुथडी भरून वाहते. त्यामुळे या ठिकाणी पाण्यात उतरण्याची कल्पना सुद्धा मनात आणणे चुकीचे असते.

शांत नदीचे पात्र सुद्धा धबधबा असल्याने धोकादायक बनते. यामुळे येथे कोणीही पाण्यात उतरण्यचे साहस करत नाही. एकदम दोन नद्याच्या संगमावर हे स्थळ असल्या कारणाने अजूनही प्रेक्षणीय बनते.

वीज प्रकल्पाच्या बाजुने नदी पात्राच्या बाजूने जाणार्‍या पायवाटेकडे येथून छोटीसी लहान वाट खाली टिटवळी नदीच्या पात्राकडे जाते. टेकडी वरून वाहणारी उदय नदी त्यावरून कोसळणारा धबधबा आणि त्याला खाली मिळणारी टिटवळी नदी असे एकदम मनमोहक दृश्य पहायला मिळते. या धबधब्याला बारा प्रवाह असल्यामुळे त्याचे नाव बारधार्‍या धबधबा नाव आहे. पावरी भाषेत त्याला बारखोल्लू असे सुद्धा म्हणतात.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com