Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

सिन्नर : संयम संपला…..; पोलीसांकडून कठोर कारवाईचे संकेत

Share

सिन्नर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी व जमावबंदीचा आदेश लागू करून देखील शहरी तसेच ग्रामीण भागात नागरिकांचा रस्त्यांवर मुक्तसंचार आढळून येत आहे. त्यामुळे सामंजस्याची भूमिका बाजूला ठेवण्यात आली असून आता नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेत पोलिसांकडून देण्यात आले आहेत.

रविवार (दि. २२) पासून संपूर्ण राज्यात सरकारकडून जमावबंदी व पाठोपाठ संचार बंदीचे आदेश देण्यात आले आहेत. दि. ३१ मार्चपर्यंत असणाऱ्या या आदेशांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दि.१४ एप्रिल पर्यंत वाढ देण्यात आली आहे. संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा पंतप्रधानांनी केले असून या पार्श्वभूमीवर राज्यात देखील संचार बंदीची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी शासनाच्या गृह विभागाने पावले उचलली आहेत.

नाशिक जिल्ह्यात अद्याप कोरोनाचा एकही संशयित मिळून न आल्याने नाशिक वासीयांसाठी ही दिलासादायक बाब आहे. मात्र, लोकांनी स्वतःहून काळजी घेत घराबाहेर पाडणे टाळले पाहिजे यादृष्टीने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी व संचारबंदी लागू केली आहे.

सर्वसामान्य जनतेकडून मात्र अद्यापही याबाबतीत सकारात्मक सहकार्य मिळत नसल्याने शहरी भागात तसेच गावात देखील नागरिकांचा मुक्त संचार सुरू आहे. त्यामुळेच पोलिस यंत्रणेकडून आता सामंजस्याची भूमिका बाजूला ठेवत नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

तालुक्यात पोलिसांकडे असणारी मनुष्यबळाची कमतरता, परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात मर्यादा येत असल्या तरी स्थानिक स्तरावर ग्रामपंचायती व नगरपालिका क्षेत्रात नगरपालिकेकडून सहकार्य घेत लोकांचा रस्त्यावरील संचार थांबवण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे. याशिवाय संपूर्ण तालुक्यात लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी देखील पोलिस यंत्रणा सरसावली आहे. पोलीस उपाधिक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील तीनही पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात पोलिसांकडून नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत. त्यात कामाशिवाय घराबाहेर पडणाऱ्यांवर दंडुके चालवण्याशिवाय गत्यंतर नसल्याचे पोलीस सुत्रांचे म्हणणे आहे.

राज्याच्या गृहमंत्र्यांनी देखील ‘आता काठीला तेल लावून ठेवा ‘ असे सांगत पोलिसांकडून घेण्यात येणाऱ्या संभाव्य भूमिकेचे समर्थनच केले आहे. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर आज पहिल्याच दिवशी तालुक्यात पोलीस यंत्रणा सक्रिय झाल्याने अनेक गावांमध्ये शुकशुकाट जाणवत होता. गेल्या दोन दिवसांपेक्षा आजची परिस्थिती प्रशासनाच्या दृष्टीने अधिक सकारात्मक राहिली. लोकांना घरा बाहेर पडण्यास मज्जाव करण्यापेक्षा त्यांनी स्वतःहूनच नियम अनुसरले पाहिजेत असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

पोलीस यंत्रणेची धावपळ
प्रशासकिय स्तरावरून लोकसंख्येच्या प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध करून देणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने आज कोरोनाच्या गंभीर संकटाशी मुकाबला करताना पोलीस यंत्रणेतील धावपळ बघायला मिळते आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!