Type to search

Video : नवोदित डॉक्टरांनी ग्रामीण भागात आरोग्य सेवा द्यावी – भगत सिंह कोश्यारी

Share
नवोदित डॉक्टरांनी ग्रामीण भागात आरोग्य सेवा द्यावी - भगत सिंह कोश्यारी, newcomer doctors provide health care in rural areas bhagat sing koshiyari

नाशिक | प्रतिनिधी

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातून पदवी घेतलेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या स्नातकांनी राष्ट्राप्रती समर्पण भावनेने काम करीत ग्रामीण भागात आरोग्य सेवा द्यावी, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठाच्या एकोणिसाव्या दीक्षांत समारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला विद्यापिठाचे प्र-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमि़त देशमुख, पालकमंत्री  छगन भुजबळ, कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर, प्रति-कुलगुरु डॉ. मोहन खामगांवकर, डॉ. तात्याराव  लहाने, आयुषचे संचालक कुलदीप राज कोहली, कुलसचिव डॉ. के.डी. चव्हाण, परीक्षा नियंत्रक  डॉ. अजित पाठक आदी उपस्थित होते.

श्री. कोश्यारी म्हणाले, आपल्याला समाजाने सर्व काही दिले आहे. समाजामुळे अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना मिळातात. त्यामुळे समाजसेवेला प्राधान्य देऊन सेवाभावनेने कार्य केल्यास वैद्यकीय क्षेत्रातील खरे समाधान विद्यार्थ्यांना मिळविता येईल.

भारतीय प्राचीन पंरपरेने आयुर्वेदासारखी मोठी देणगी आपल्याला दिली आहे. त्या काळात माणसांच्या आजाराचा विचार करुन आयुर्वेदाची मांडणी झाली. अशा पारंपारिक ज्ञानाला पुनरुज्जिवीत करण्याचे प्रयत्न व्हावेत, त्याचबरोबर आंतरविद्याशाखीय दृष्टीकोन ठेऊन वैद्यकीय क्षेत्रातील ज्ञान मिळविण्याचा स्नातकांनी प्रयत्न करावा, व्यापक ज्ञान प्राप्त रुग्णसेवेच्या क्षेत्रात आदर्श कार्य घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वैद्यकीय क्षेत्र नोकरीसाठी नसून देशाचा आणि जगाचा गौरव वाढविण्यासाठी आहे, असेदेखील राज्यपाल म्हणाले.

प्रारंभी, विद्यापीठाद्वारे तयार करण्यात आलेल्या एमबीबीएस अभ्यासक्रमात नवी दिल्ली येथील आयुर्विज्ञान परिषदेने मान्यता प्रदान केली असून भारतातील सर्व आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये हा अभ्यासक्रम लागू करण्यात आला आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विद्यापीठांबरोबर सामंजस्य करार करण्यासाठी विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय शैक्षणिक केंद्र सुरु केले आहे.आदिवासी व ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्य संवर्धनासाठी विद्यापीठाने ‘सर्वांसाठी परिपूर्ण आरोग्य’ हा उपक्रम सुरु केला आहे. विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल 30 दिवसांच्या कालावधीत जाहीर करण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू दिलीप म्हैसेकर यांनी दिली.

दीक्षांत समारंभाची सुरुवात विद्वजन मिरवणुकीने झाली. कार्यक्रमात आरोग्य विज्ञान पदवी आणि पदव्युत्तरच्या विविध विद्याशाखांतील अंतिम वर्षाच्या परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण, विविध विषयांमध्ये  नैपुण्य  प्राप्त  केलेल्यांना  सुवर्णपदके प्रदान करण्यात आली.


वैद्यकीय क्षेत्रातील पदवी विद्यार्थ्यांचे आणि समाजाचे जीवन बदलवून टाकणारी असते. या पदवीच्या माध्यमातून डॉक्टर म्हणून गोरगरीबांची सेवा करण्याची संधी प्राप्त होते. त्यादृष्टीने पदवी प्राप्त विद्यार्थ्यांनी समाजसेवेसाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करावा आणि आपल्या कार्याने विद्यापीठाचे नाव देशपातळीवर पोहोचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी.

नाशिक येथे आरोग्य विज्ञान विद्यापीठ असतांना वैद्यकीय महाविद्यालय आणि पदव्यूत्तर अभ्यासक्रम सुरु व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विद्यापीठाच्या गुणवत्तेत सातत्याने सुधारणा होत असल्याबद्दल त्यांनी विद्यापीठ व्यवस्थापनाचे कौतुक केले. तसेच सुवर्ण पदक विजेत्या स्नातकांमध्ये विद्यार्थींनीची संख्या अधिक असल्याचे समाधान वाटते.

छगन भुजबळ, अन्न आणि पुरवठा मंत्री, नाशिकचे पालकमंत्री 


आरोग्य विज्ञान विद्यापीठाची वाटचाल कौतुकास्पद आहे. भारतातील अग्रगण्य विद्यापीठ म्हणून याची ओळख आहे. हे विद्यापीठ देशात प्रथम क्रमांकाचे व्हावे यासाठी वेगवेगळ्या विद्या शाखा अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. तळागाळातील जनतेला आरोग्य सेवा देण्यासाठी डॉक्टरांची अधिक संख्या आवश्यक असून त्यादृष्टीने विद्यापीठाचे प्रयत्न सुरु आहेत.  नाशिकची ओळख राज्यातील ‘आरोग्यदायी शहर’ म्हणून व्हावी. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यशस्वी विद्यार्थ्यांनी राज्यातील जनतेचे आरोग्य चांगले रहावे यासाठी प्रयत्न करावे आणि गुणात्मक आरोग्य सेवेवर भर द्यावा.

डॉ. अमित देशमुख, वैद्यकीय शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य


62 गुणवतांना सुवर्ण पदके आणि  14 विद्यार्थ्यांना पीएच डी 

शैक्षणिक वर्ष 2018-2019 मध्ये घेतलेल्या  पदवीका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या व आंतरवासियता  पूर्ण  केलेल्या आरोग्य शाखांच्या  एकूण 11 हजार  409 विद्यार्थ्यांना  पदव्या प्रदान  करण्यात आल्या. आधुनिक वैद्यक विद्याशाखा पदवीचे 474, दंत विद्याशाखा पदवीचे 104, आयुर्वेद विद्याशाखेचे 856, युनानी  विद्याशाखेचे 91, होमिओपॅथी विद्याशाखेचे 811, पीबी बीएस्सी नर्सिग विद्याशाखेचे 336, बेसिक बीएस्सी नर्सिंग विद्याशाखेचे 1977, बीपीटीएच विद्याशाखेचे  108 बीओटीएच विद्याशाखेचे 19,

बीएएसएलपी  विद्याशाखेचे  31, बीपीओ विद्याशाखेचे 06, डिप्लोमा इन ऑर्प्थेल्मिक सायन्स विद्याशाखेचे 04, डिप्लोमा इन ऑप्टोमेट्री विद्याशाखेचे 03, पदव्युत्तर विद्याशाखेमध्ये एमडी मेडिकल विद्याशाखेचे 882, एमएस मेडिकल विद्याशाखेचे 466, डीएम मेडिकल विद्याशाखेचे 377,

एमसीएच मेडिकल विद्याशाखेचे 59, पीजीडिप्लोमा विद्याशाखेचे 436, पॅरामेडिकल डिप्लोमा विद्याशाखेचे 114, पीजीडी एमएलटी विद्याशाखचे 110, एमबीए (हेल्थ केअर ॲडमिनिस्ट्रेशन) 51, एमडीएस विद्याशाखेचे 388, एमडी आयुर्वेद विद्याशाखेचे 46, एमएस आयुर्वेद विद्याशाखेचे  23, एमएस्सी नर्सिग विद्याशाखेचे 139, एमडी होमिओपॅथी विद्याशाखेचे 68, एमपीएच (न्युट्रीशन) 08 तसेच 62 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक व एक  विद्यार्थ्यांस रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले.

Leave a Comment

error: Content is protected !!