नेवाशाचे गढूळ पाणी ‘गुप्तचर यंत्रणे’ने ढवळावे

0

भाजपचे अनिल ताके यांची पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नेवासा (तालुका प्रतिनिधी) – लोकसहभागासह शासकीय योजनांमधून ग्रामीण नळपाणी पुरवठा योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च होऊनही नागरिकांना शुद्ध व पुरेशा प्रमाणात पाणी पुरठ्यापासून वंचित रहावे लागत असेल तर या योजनांवरील खर्च कशाप्रकारे व कुठे झिरपला याची केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून सखोल चौकशी झाल्यास यातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे.
मागील सरकारच्या काळापासून यातील गैरप्रकार व त्यातून कुरघोडीचे राजकारण याचा सिलसिला सुरू असून व्यापक जनहितार्थ याची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे अशोक ताके यांनी पंतप्रधान व मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवलेल्या निवेदनात केली आहे. नेवाशातील राजकारण ढवळून काढणारे गढूळ पाण्याचे प्रकरण भाजपच्या पदाधिकार्‍यांनी आता थेट केंद्र आणि राज्य सरकारच्या कोर्टात खेचल्याने याप्रकरणात पुढे काय होणार, याची उत्सुकता वाढली आहे.
निवेदनात ताके यांनी म्हटले की, नेवासा तालुक्यासह अहमदनगर जिल्हा व राज्यात काही नळपाणी पुरवठा योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च होऊनही या योजना कोणत्याही ऋतूत सुरळीत चालत नसल्याने नागरिकांना अनेक ठिकाणी अशुध्द पाण्याचा पुरवठा होतो. त्यातून साथीचे आजार पसरतात. तर काही ठिकाणी नळ योजना असतानाही पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. नेवासा नळपाणी पुरवठा ठेकेदारास वेळोवेळी पेमेंट अदा होऊनही देखभाल, दुरुस्तीतील हलगर्जीपणामुळे शहराला दूषित पाणीपुरवठा होतो, असा आरोप त्यांनी केला आहे.

बिले अदा तरी स्वच्छ पाण्यावर गदा –  प्रवरासंगम ते नेवासा नळपाणी पुरवठा योजना नूतनीकरणासाठी अटी व शर्तीसह ऑक्टोबर 2013 अन्वये तांत्रिक मान्यता देण्यात आली होती. नियमानुसार देखभाल दुरुस्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदाराकडे देण्यात आली होती.  

कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जि. प. अ.नगर यांनी डिसेंबर 2014 ते मार्च 2017 या कालावधीत नेवासा येथील एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखा प्रमुखास सारख्याच सूचना असलेले तीन वेगवेगळे पत्र पाठवून संबंधित ठेकेदाराचे बिल अदा करण्याविषयी कळविले होते.  

दिनांक 9 डिसेंबर 2014 च्या पत्रानुसार ठेकेदारास 64 लाख 79 हजार 351 रूपये, तर सर्व करांसहित एकूण 74 लाख 91 हजार 721 रुपये तसेच 19 सप्टेंबर 2015 च्या पत्रानुसार ठेकेदारास 66,66,501 रुपये तर  करांसहित एकूण बिल 74,91,721 रुपये तर तिसर्‍या पत्राप्रमाणे (नगर पंचायत आस्तित्वात आल्यानंतर) दिनांक 23 मार्च 2017  च्या पत्रानुसार ठेकेदारास 67,25,825 रुपये तर सर्व करांसहित एकूण बिल 76,30,373 रुपये या प्रमाणे वेळोवेळी अदा झाले. 

बिल अदा होऊनही संबंधित ठेकेदाराने फिल्टर स्वच्छता, अन्य दुरुस्त्या या कामांत हालर्गजीपणा केल्याने शहराला अनेकदा अस्वच्छ पाणी पुरवठा झाला. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा वेळोवेळी प्रश्‍न निर्माण झाल्याने यातूनच कुरघोडीचे राजकारण होऊन गावाला वेठीस धरण्याचे प्रकार झाले. या ठेकेदाराचीही सखोल चौकशीची मागणी ताके यांनी आपल्या निवेदनात केली आहे.

 

LEAVE A REPLY

*