नेवाशाच्या गढूळ पाण्याने तालुक्याचे राजकीय वातावरण ढवळले

0
नेवासा (प्रतिनिधी) – नेवासा शहराला पाणीपुरवठा करणार्‍या योजनेतून गढूळ पाणी पुरवठ्याच्या प्रश्‍नाने गेल्या काही महिन्यात केवळ शहरातीलच नव्हे तर तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून टाकल्याचे दिसून येत आहे. परंतु यातून शहरवासियांना शुद्ध पाणीपुरवठा होण्याचे दूरच राहीले असून या योजनेच्या ठेकेदाराची प्रशासनाकडून पाठराखण केली जात असल्याच्या संशयास आता पुष्टी मिळू लागली आहे.
संपूर्ण विश्‍वाची चिंता व्यक्त करणार्‍या नेवासकरांना पिण्यासाठी चांगले पाणी मिळू नये यासारखे दुसरे दुर्दैव ते काय अशी खंत व्यक्त करण्याची वेळ गेल्या काही वर्षांत ग्रामस्थांवर ओढवलेली दिसते. मात्र गेल्या तीन वर्षांपासून यावरुन राजकीय सुंदोपसुंदी सुरु असून हा प्रश्‍न अधिकच ‘गढूळ’ बनत चालल्याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत असल्याचे लक्षात येते. तीन वर्षांपूर्वी तालुक्यात झालेल्या राजकीय परिवर्तनानंतर ‘अच्छे दिन’ आलेल्यांपैकी या योजनेचा ठेकेदार असल्याचा आरोप कायमच होताना दिसतो. तालुक्याच्या लोकप्रतिनिधींशी नातेसंबंध असल्यामुळेच या ठेकेदारांच्या ‘गढूळ’ लिलांकडे संबंधित विभागाकडून डोळेझाक करण्यात येत असल्याचेही सांगण्यात येते. गल्ली ते दिल्ली सत्तेची ताकद वापरुन या योजनेसंदर्भातील आरोपांची शहानिशा करण्याचेही टाळले जात असल्याकडे ग्रामस्थ लक्ष वेधत आहेत.
इलेक्ट्रिक मोटारी पंपसेटच्या बाबतीत तज्ञ समजल्या जाणार्‍या या ठेकेदाराने या योजनेसाठीच्या शक्तीशाली इलेक्ट्रिक मोटारी टाकताना अत्यंत तकलादू तसेच असेंबल केलेल्या बसवून त्यांना वरुन नामांकित कंपन्यांचे लेबल चिकटवण्याचा चाणाक्षपणा दाखविल्याचा धक्कादायक आरोप काही जबाबदार ग्रामस्थांनी केला आहे. तर वेळोवेळी पुरेसा निधी मिळूनही या योजनेच्या फिल्ट्रेशन प्लँटमधील विशिष्ट प्रकारची वाळू बदललीच नसल्यामुळे नेवासकरांवर गेली काही वर्षे गढूळ, दुषित पाणी पिण्याची वेळ ओढवली आहे. शासनाच्याच आरोग्य विभागाकडून नेवासा नळ योजनेचे पाणी पिण्यासाठी योग्य नसल्याचा अहवाल असल्याचे सांगितले जात आहे. मात्र एवढे सारे घडूनही या ठेकेदाराच्या कारभाराची चौकशी होताना दिसत नाही. किंवा किमान ग्रामस्थांना चांगले पाणी मिळण्याच्या दृष्टीने कार्यवाही देखील होत नाही.
यामुळे नेवासा परिसरातील खाजगी फिल्टर प्लँटवाल्यांची मोठी चलती झाली आहे. मात्र ज्यांची आर्थिक परिस्थिती आहे ते लोक दररोज जारचे पाणी विकत घेऊ शकतात. गोरगरीबांना मात्र या गढूळ पाण्यात तुरटी फिरवत बसण्याखेरीज दुसरा पर्याय नसल्याचे समोर आले आहे. सामान्य कुटुंबातील अनेक आबालवृद्ध पिण्याच्या पाण्यासाठी वाड्यावस्त्यांवर वणवण करत असल्याचे विदारक चित्रही नित्याचेच झाले आहे.

योजनेलाच कीड –  या योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी गेल्या काही वर्षांत कोट्यावधींचा निधी देण्यात आला. मात्र राजकीय वरदहस्तामुळे संबंधित ठेकेदाराने बरीचशी कामे फक्त कागदोपत्री दाखवली तर जी केली तीही अत्यंत निकृष्ट दर्जाचे तकलादू साहित्य वापरुन केल्यामुळे या पाणी योजनेलाच कीड लागली आहे. सामान्यजनांचे पाणी गढूळ करणार्‍या या ठेकेदारावर कारवाई करुन नवीन ठेकेदाराची नेमणूक झाल्याशिवाय नेवासकरांची ससेहोलपट थांबणार नाही.  – नंदकुमार पाटील (उपनगराध्यक्ष)

एम.बी.रिपोर्टचं गौडबंगाल –  नेवासा पाणी योजनेच्या रेखांकन, अंदाजपत्रक आदी मूळ कागदपत्रांबरोबरच एम. बी. रिपोर्टची वेळोवेळी मागणी करुनही दिली जात नसून ती जाणीवपूर्वक दडवली जात असल्याच्या आरोपामुळे पाण्याबरोबरच सामाजिक वातावरणही गढूळ बनत चाललं आहे.

LEAVE A REPLY

*