Saturday, April 27, 2024
Homeनगरनेवासाफाटा येथे तीन तास वाहतूक कोंडी; प्रवाशांचे हाल

नेवासाफाटा येथे तीन तास वाहतूक कोंडी; प्रवाशांचे हाल

ऊस वाहतूक व लग्न मुहुर्ताच्या दिवसामुळे वाहनांची प्रचंड गर्दी

नेवासाफाटा (वार्ताहर)- नगर औरंगाबाद महामार्गावर नेवासा फाटा येथे आज सायंकाळी दरम्यान तब्बल साडेतीन तास वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. नगर रोड, औरंगाबाद रोड, शेवगाव रोड व नेवासा रोडवर दुतर्फा सुमारे तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांना रात्री 8 वाजता वाहतूक सुरळीत करण्यात यश आले.

- Advertisement -

लग्नमुहूर्ताचा दिवस, रविवार सुट्टीचा दिवस व ऊस वाहतूक करणारी बेशिस्त वाहने यामुळे दुपारी तीन वाजेपासूनच वाहतुकीच्या कोंडीला सुरुवात झाली. सुमारे साडेतीन तास झालेल्या या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. त्यातच दुपारी ऊसवाहतूक करणारे एक वाहन राजमुद्रा चौकात बंद पडले होते. त्या ठिकाणी जशी जागा मिळेल तशी वेडी वाकडी वाहने घालण्यास लोकांनी सुरुवात केली. सध्या नेवासा फाटा येथे एकच वाहतूक नियंत्रक पोलीस कार्यरत आहे.

आणखी वाहतूक नियंत्रक पोलीसांची नेमणूक करणे गरजेचे आहे. दुपारी साडेतीन तास झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे अनेक रुग्णवाहिका व नववधू – वर वाहतुकीच्या कोंडीत अडकले. सायंकाळी पाच वाजता पोलीस निरीक्षक रणजीत डेरे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण शेवाळे, वाहतूक नियंत्रण कक्षाचे नाना तुपे, विठ्ठल गायकवाड, देसाई आदींनी स्थानिक युवकांच्या मदतीने महत्प्रयासानंतर रात्री आठ वाजता वाहतूक सुरळीत करण्यात यश मिळवले. राजमुद्रा ग्रुपचे अध्यक्ष सरपंच सतीश निपुंगे यांच्या समवेत चंद्रशेखर ठुबे, महेश निपुंगे, शंकर दाणे, सचिन पठाडे, सौरभ माळी, मनोज जावळे, हेमंत गायकवाड, विजय गाडे, दिगंबर उभेदळ, शंकर कुर्‍हे, महेश निमसे, पप्पू कुटे, अंकुश पोटे, राहुल कत्तेवर, गणेश पडोळे आदि युवकांनी ही वाहतूक कोंडी हटविण्यासाठी सहकार्य केले. वाहतूक कोंडीवर कायमस्वरुपी तोडगाव काढावा अशी मागणी प्रगतशील शेतकरी व मुळा कारखान्याचे संचालक पांडुरंग निपूंगे यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या