क्या हुवा तेरा वादा? तो विकास, तो इरादा! ; नेवाशात नगरसेवकांनी दिलेली वचने हरवली

0
विकासाची गंगा अवतरलीच नाही
नेवासा (शहर प्रतिनिधी) – नेवासा ग्रामपंचायतची नगरपंचायत झाली. मात्र नेवासकरांची पंचायत संपायला तयार नाही, नगरपंचायत स्थापन होवूनही नागरीकांची समस्या मिटत नसल्याने व प्रभागात नगरसेवकांनी व त्यांच्या नेते मंडळींनी दिलेली आश्‍वासन पूर्ण न झाल्याने नगरसेवकांनी दिलेली वचने आता हरवल्यात जमा झाली आहेत.
त्यामुळे ‘क्या हुवा तेरा वादा? तो विकास, तो इरादा’…असा प्रश्‍न विचारण्याची वेळ सामान्य नागरिकांवर आली आहे.
नगरपंचायत निवडणूक प्रचारादरम्यान सर्वच नगरसेवकांनी आपआपल्या प्रभागात मोठं मोठी आश्‍वासने देवून मते मिळवली. मात्र नगरपंचायतीच्या माध्यमातून कोणतीच योजना व ठोस कामे झालेली नाही यात नगरसेवकांची देखील घुसमट होत असून दाद कुठे मागायची असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
नेवासा तिर्थक्षेत्र व शहराचा विकासा भोवतीच गेली अनेक वर्षे राजकारण खेळले जात आहे. आजतागायत सर्वच पक्षाच्या राजकीय नेत्यांनी नेवासकरांना विकासाचे गाजर दाखवून आपला राजकीय स्वार्थ साधलेला आहे. गेल्या कित्येक वर्षाच्या पाठपुराव्यानंतर नगरपंचायत स्थापन झाली. आता तरी नेवासकरांना आपली स्वप्न पूर्ण होवून शहराचा कायापालट होईल, अशी भाबडी आशा निर्माण झाली होती.
निवडणूका झाल्यानंतर प्रथमश्रेणी दर्जाचा अधिकारी येईल अन सगळ्या कर्मचार्‍यांना शिस्त लावून नागरीकांना भेडसावणार्‍या अडचणी दुर होतील, अशी अपेक्षा जनतेला होती. तसेच नगरसेवकांना देखील मोठ्या अपेक्षेने लोकांनी निवडून दिल्याने आता प्रभागात विकासाची गंगा अवतरेल हे स्वप्न भंग पावू लागले आहे.
मुख्याधिकारी यांच्याकडे दोन नगरपंचायतींचा कारभार असल्याने त्यांच्या कडूनही कामकाजासाठी वेळ कमी पडत आहे तसेच सध्या नेवासा नगरपंचायतीत सुरू असलेले पत्रकयुद्ध किंवा मुख्यााधिकार्‍यांचे याची नगरसेवकांशी असलेले मतभेद या सर्व गोष्टी नेवासा शहराच्या विकास कमासाठी गती देणार्‍या नसून आपापल्या पक्षाच्या नेते मंडळींकडून विकास कामाचा मूलमंत्र घेण्याची गरज नगरसेवकाना आहे.
मध्यंतरी मासिक सभेसाठी मुख्याधिकारी उपस्थित न राहिल्याने संतप्त उपनगराध्यक्ष तसेच सर्व नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन सभा तहकूब केली. मुख्याधिकारी यांच्या विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. मात्र तेथेही या विषयावर ठोस कारवाई न झाल्याने नगरसेवकांसमोर मोठे प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे.
नागरिकांनी नगरसेवकांकडे विकास कामाची विचारणा केली असता काही नगरसेवक आमचीच अद्याप बोहनी नाही? असे सांगतात. नगरपंचायतमधील गंमतीदार कारभाराचे किस्से नागरिकांना ऐकायला मिळतात.

 

 

LEAVE A REPLY

*