नेवासा पोलिसांवर ‘घर देता का घर…’ म्हणण्याची आली वेळ

0

तीनपैकी केवळ एकाच वसाहतीचा वापर ; निरुपयोगी झाल्याने दोन वसाहती अनेक वर्षांपासून बंद

नेवासा बुद्रुक (वार्ताहर)- नेवासा शहरातील 24 हजार नागरीकांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणार्‍या नेवासा पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या तीन सरकारी वसाहतींची दुरवस्था होवून मोडकळीस आलेल्या असल्याने पोलिसांना सध्या ‘कोणी घर देता का घर’ म्हणत शहराच्या विविध भागात खासगी घर शोधण्याची वेळ आली आहे.
कामगिरी बजावताना जरासा कसूर झाला तरी जाब विचारणारे सर्वच वरिष्ठ मात्र या गंभीर प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करत असल्याने शहरात विविध ठिकाणी खासगी खोल्यांचा शोध घेत पोलिसांना फिरावे लागत आहे. चोहोबाजूने घाणीच्या विळख्यात अडकलेल्या या वसाहतींचे नुतनीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु सरकारी काम, अन् सहा महिने थांब या प्रमाणे गेल्या कित्येक वर्षापासून हा प्रश्‍न भिजत पडलेला आहे.
तालुक्याचे ठिकाण असलेल्या नेवासा शहराची लोकसंख्या 24 हजाराच्या जवळपास आहे तर 85 गावांचा कारभार नेवासा पोलीस ठाण्याच्या अतंर्गत येत आहे. चार अधिकारी व 83 पोलीस कर्मचारी येथे कार्यरत आहेत. पोलिसांच्या निवासासाठी एकूण तीन ठिकाणी वसाहती आहेत.
परंतु त्यातील दोन गेल्या कित्येक वर्षापासून अतिशय जिर्ण व निरुपयोगी झाल्याने वापरात नाहीत. बाजार तळालगतच्या एकमेव वसाहतीचा सध्या वापर होत आहे. परंतु तिचीही अतिशय वाईट अवस्था झालेली आहे. या ठिकाणी सध्या फक्त 25 कुटुंबे जिव मुठीत धरून रहात आहेत.
गटारीच्या पाण्याने वेढलेल्या या वसाहतीत नेहमीच डुकरांचा वावर असतो. विषारी साप घरात निघण्याचे प्रकार तर नित्याचेच झाले आहेत. गटारीच्या दुषित पाण्याने या कुटूंबांचा आरोग्याचा प्रश्‍न तर नेहमीचाच झाला आहे. अनेक पोलिसांचे कुटुंब अजून निवासस्थानापासून वंचित आहेत. सुसज्ज निवासव्यवस्था नसल्याने पोलिसांना राहण्यासाठी खासगी खोल्या शोधण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
 • ज्ञानेश्‍वर मंदिर रस्त्यालगतचा ब्रिटिश कालीन फौजदार बंगला व त्यामागे असलेली पोलीस वसाहत दहा-अकरा वर्षांपासून बंद असल्याने येथे फक्त भिंती शिल्लक राहिल्या आहेत.
 • खिडक्या, दरवाजे,फरश्या गायब होवून पूर्णपणे मोडकळीस येवून काट्यांनी वेढली गेली आहे.
 • या सगळ्या वसाहतींच्या नुतनीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अनेकदा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाला पोलीस ठाण्यामार्फत पाठवले गेले आहे.
 • त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही.
 • तक्रारी करुनही दुरुस्ती नाही –
  पोलिसांच्या निवासस्थानाच्या दुरुस्तीबाबत पोलीस अधिकार्‍यांनी अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. तसेच नगरपंचायतही याकडे दुर्लक्ष करीत असल्याने पोलीस कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली जात आहे.
 • पोलीस कुटूंबाचा राहण्याचा प्रश्‍न ऐरणीवर आलेला असताना अनेकदा मागणी करूनही सरकार दरबारी हा प्रश्‍न भिजत पडलेला आहे.
 • प्रशासन मात्र याकडे सोयीस्करपणे डोळेझाक करत आहेत.
 • पोलीस ठाण्यालगत असणारी वसाहत बर्‍याच वर्षांपासून बंद अवस्थेत आहे.
 • पूर्वी तेथे पोलीस अधिकारी राहत होते.
 • आता या वसाहतीच्या आवारात अपघाती तसेच जप्त केलेल्या दुचाकी वाहनांचा मोठा खच पडलेला आहे.

LEAVE A REPLY

*