नेवासा : कार्तिक एकादशीनिमित्त पैस खांबाचे 2 लाख भाविकांनी घेतले दर्शन

0
नेवासा (तालुका प्रतिनिधी)- कार्तिक वद्य एकादशीनिमित्त संत ज्ञानेश्‍वरांची कर्मभूमी असलेल्या श्रीक्षेत्र नेवासा येथील संत ज्ञानेश्‍वर मंदिरातील पैस खांबाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. दिवसभरात 2 लाख भाविकांनी दर्शन घेतले.
पहाटे 5 वाजता संत ज्ञानेश्‍वर मंदिराचे प्रमुख शिवाजी महाराज देशमुख व श्रीक्षेत्र डोंगरगण येथील गणेश महाराज आव्हाड, संस्थानचे अध्यक्ष माधवराव दरंदले यांच्या हस्ते पैस खांबासह संत ज्ञानेश्‍वर महाराज, विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीस वेदमंत्राच्या जयघोषात अभिषेक घालण्यात आला.
उदय सभारंजन यांनी पौरोहित्य केले. यावेळी मंदिर संस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड. माधवराव दरंदले, कृष्णा महाराज हारदे, लक्ष्मण महाराज नांगरे, आप्पा होन, गोविंदराव शेटे, भिकाजी जंगले, ज्ञानेश्‍वर शिंदे, मार्तंड महाराज चव्हाण, गोरख भराट, मच्छिंद्र भवार, रामभाऊ कडू, मयूर डौले उपस्थित होते.
पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मंदिरामध्ये सुरेगाव-(गंगा) येथील भक्तांनी माऊली चरणी सेवा दिली. भाविकांना रांगेत दर्शन घेता यावे म्हणून वै. बन्सी महाराज तांबे वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनी स्वयंसेवकांची भूमिका बजावली. संत ज्ञानेश्‍वर मंदिर रस्ता भाविकांच्या गर्दीने व विविध दुकानांनी फुलून गेला होता.
यावेळी ज्ञानोबा माउली तुकारामचा गजर करत खेड्यापाड्यासह वाड्या वस्त्यांमधून आलेल्या शेकडो दिंड्यांचे गुरुवर्य शिवाजी महाराज देशमुख यांनी स्वागत केले. दिवसभरात 2 लाख भाविकांनी पैस खांबाचे दर्शन घेतले. संत तुकाराम महाराज मंदिरामध्ये उद्धव महाराज मंडलिक यांनी भाविकांचे स्वागत करून सुसंवाद साधला.
कार्तिक वद्य एकादशीनिमित्त संत ज्ञानेश्‍वर मंदिरासह नेवासा शहरातील रस्तेही गर्दीने फुलून गेल्याने नेवासा शहराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. श्री मोहिनीराज मंदिरामध्येही दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. मंदिर प्रांगणात मोठी यात्रा भरली होती खेळणी, कुंकू, बुक्का, ग्रंथ पानफुले यांची दुकाने मोठ्या प्रमाणावर थाटण्यात आली होती. संत ज्ञानेश्‍वर मंदिरास माजी आमदार पांडुरंग अभंग, पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी भेट दिली.

LEAVE A REPLY

*