Friday, April 26, 2024
Homeनगरअखेरच्या दिवशी एका उमेदवाराची माघार नेवाशाच्या नगराध्यक्षपदासाठी सरळ लढत

अखेरच्या दिवशी एका उमेदवाराची माघार नेवाशाच्या नगराध्यक्षपदासाठी सरळ लढत

नेवासा (शहर प्रतिनिधी)- नेवासाच्या नगराध्यक्षपदाच्या उद्या बुधवारी होत असलेल्या निवडीसाठी काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एका उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने भाजपा-काँग्रेस व अपक्षांच्या नगरपंचायत विकास आघाडी व आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखालील क्रांतीकारी शेतकरी पक्षात सरळ लढत होणार आहे.

भाजपच्या डॉ. सौ. प्रमिला सांगळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने काँग्रेसकडून निवडून गेलेल्या व नगरपंचायत विकास आघाडीतील सदस्य असलेल्या सौ. शालिनी संजय सुखदान तर क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या नगरसेविका योगीता सतीश पिंपळे यांच्यात सरळ लढत होणार आहे.

- Advertisement -

दोन्ही गटांकडे समसमान संख्याबळ असल्याने नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागले असून नागरिकांत उत्सुकता वाढली आहे

नेवासा नगर पंचायतीची निवडणूक 24 मे 2017 रोजी झाली होती. नगराध्यक्षपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाल दि. 19 डिसेंबर रोजी पूर्ण झाल्याने पुढील कार्यकाळासाठीची नगराध्यक्षपदाची निवड उद्या दि. 18 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यासाठी क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून सौ. योगीता पिंपळे तर नगरपंचायत विकास आघाडीकडून सौ. शालिनी संजय सुखदान व डॉ. सौ. प्रमिला सांगळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. काल दि. 16 डिसेंबर रोजी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारीखेस डॉ. सौ. सांगळे यांनी अर्ज मागे घेतल्याने दोन्ही गटांकडून एकास एक उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत

प्रभाग क्रमांक तेरातील नगरसेविका फेरोजबी इमामखान पठाण यांचे पद रद्द झाल्याने क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या नगरसेवकांची संख्या 9 वरून 8 झाली आहे. तर गट नोंदणीमध्ये भाजपा, इंदिरा काँग्रेस व अपक्ष मिळून बनलेल्या नगरपंचायत विकास आघाडीचे 8 नगरसेवक आहेत.

समसमान नगरसेवक दोन्हीकडे असल्याने कोण बाजी मारणार याबाबत मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन काम पाहत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या