अभूतपूर्व संघर्षास तयार : गडाख

0

जाचक अटीविरहीत कर्जमाफी हवी, नेवाशात शेतकरी मेळावा व मूकमोर्चा

नेवासा (प्रतिनिधी)- कर्जमाफी देण्याच्या नावाखाली जाचक अटी लादून राज्य सरकारकडून शेतकर्‍यांची क्रूर चेष्टा सुरू असल्याचा घणाघाती आरोप करत संपूर्ण कर्जमाफी होऊन सातबारा कोरा होण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी पक्ष अभूतपूर्व संघर्षाच्या तयारीत असून राजकीय जोडे बाजूला ठेऊन त्यात शेतकर्‍यांनी सामील होण्याचे आवाहन माजी आमदार शंकरराव गडाख यांनी केले.
राज्य सरकारने कर्जमाफीसंदर्भात लादलेल्या जाचक अटींबाबत चर्चा करण्यासाठी नेवासा पंचायत समिती प्रांगणात आयोजित शेतकरी मेळाव्याच्या अध्यक्षीय भाषणात गडाख यांनी राज्य व केंद्र सरकारवर हल्लाबोल करत उपस्थित शेतकर्‍यांना अभूतपूर्व संघर्षाचे आवाहन केले.
यावेळी ज्येष्ठ नेते कॉ. बाबा आरगडे यांनी क्रांतिकारी शेतकरी पक्षाचा झेंडा खाली ठेवणार नसल्यास यापुढे तुमच्या नेतृत्वाखाली शेतकरी आंदोलनात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केल्याचा धागा पकडून गडाख यांनी यापुढील काळात याच झेंड्याखाली मार्गक्रमण करणार असल्याचे स्पष्ट करत इतर राजकीय पक्षात प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम दिला.
केंद्र सरकारचे चुकीचे आयात-निर्यातीचे धोरण तसेच सततचा दुष्काळ यामुळेच शेतकरी कर्जबाजारी झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधून त्यांच्यापुढे सरकारकडून संपूर्ण कर्जमाफी किंवा आत्महत्या करणे हेच दोन पर्याय उरल्याचे त्यांनी सांगितले. संपावर जाण्याची पुणतांब्यातील शेतकर्‍यांची कल्पना अफलातून असल्याचे नमूद करत कर्जमाफीसाठी यादरम्यान झालेल्या आंदोलनांना शेतकर्‍यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. मात्र सरकारने यावर सहानुभूतीने विचार करण्याऐवजी दडपशाही मार्गांचा अवलंब करण्याचे धोरण आखल्यामुळेच शेतकर्‍यांचा संताप अधिकच उसळल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नगर जिल्ह्याच्या भूमीतून सुरू झालेले हे आंदोलन देशपातळीवर पोहचले.
शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याच्या घोषणेपाठोपाठ सरकारी नोकरांनी सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी सरकारवर दबाव टाकण्याचे टायमिंग साधल्याबद्दल गडाख यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली. सातवा वेतन आयोग लागू करण्याबरोबरच या सरकारी कर्मचार्‍यांनी शेतकर्‍यांकडून हमीभावाने शेतमाल खरेदी करण्याची मानसिकता दाखविण्याचे आवाहन त्यांनी केले. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, तसेच शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी राजकारण विरहीत लढा उभारण्याची गरज व्यक्त केली.
यावेळी दादासाहेब चिमणे, संजय नागवडे, बाळासाहेब नवले, हरिभाऊ तुवर, अशोक गायकवाड यांची भाषणे झाली. मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर, उपाध्यक्ष भाऊसाहेब मोटे, प्रशांत गडाख, भैय्यासाहेब देशमुख, विश्‍वासराव गडाख, संतोबा काळे, नंदकुमार पाटील, अशोक मंडलिक, कडूबाळ कर्डीले आदींसह तालुक्याच्या विविध भागांतून मोठ्या प्रमाणावर शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक अ‍ॅड. कारभारी वाखुरे यांनी केले. सूत्रसंचालन सुभाष राख यांनी केले.
सभेनंतर तालुक्यातील शेतकर्‍यांनी माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली नेवासा तहसीलवर काळ्या कापडाने तोंड बांधून मूक मोर्चा काढला. मोर्चा तहसीलसमोर आल्यावर शेतकर्‍यांनी राज्य सरकारने कर्जमाफीसंदर्भात लादलेल्या जाचक अटींच्या परिपत्रकाची होळी करत निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणून टाकला. नायब तहसीलदार कोरडे, पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी मोर्चेकर्‍यांचे निवेदन स्वीकारले.

…तर लोकप्रतिनिधींना डोक्यावर
घेऊन नाचेन ः गडाख
नेवाशाचे विद्यमान लोकप्रतिनिधी कृषी पदवीधर तसेच शेतकरी कुटुंबातील असल्याने शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांची त्यांना जाण असल्याने त्यांनी प्रामाणिक भूमिका घेतल्यास आपण राजकारण विरहित संपूर्ण मदत करण्यास तयार असल्याचे सांगतानाच शेतकरी कर्जमाफीसंदर्भात त्यांनी स्पष्ट भूमिका घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यास सरकारला भाग पाडले तर आपण स्वतः त्यांना डोक्यावर घेऊन नाचू, असे प्रतिपादन माजी आमदार शंकरराव गडाख यांनी यावेळी केले.

पतसंस्था, नागरी बँका व सावकारी कर्जेही माफ करा
गडाख म्हणाले, सरकारने तत्वतः कर्जमाफी जाहीर केली असली तरी त्यासाठी तब्बल 20 ते 25 जाचक अशा अटी घातल्याने या सरकारला शेतकरी जीवंत ठेवायचाच नाही हे स्पष्ट झाले आहे. लहान-मोठे शेतकरी असा भेदभाव न करता सरसकट कर्जमाफी देण्याच्या मागणीचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार करून यापूर्वी शेती कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलेल्या कर्जखात्यांचाही या कर्जमाफीत समावेश करण्याची आग्रही भूमिका मांडली. जिल्हा सहकारी बँकेबरोबरच राष्ट्रीयीकृत बँका, नागरी बँका, मल्टिस्टेट, नागरी पतसंस्था, सावकारी कर्जही माफ करण्यात यावे. 

LEAVE A REPLY

*