नेवासा नगराध्यक्ष, उपनगराध्यपदाची निवड 19 जूनला

0
नेवासा (तालुका प्रतिनिधी) – नेवासा नगरपंचायतीच्या पहिल्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड 19 जून रोजी होत आहे. या विशेष सभेच्या अधिकारी म्हणून प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर या काम पाहणार आहेत.
नेवासा नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक 24 मे रोजी झाली. 26 मे ला मतमोजणी झाल्यानंतर माजी आमदार शंकरराव गडाख प्रणीत क्रांतिकारी शेतकरी पक्षास बहुमत मिळाले. परंतु अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असलेल्या नगराध्यक्ष पदासाठीच्या जागेवर भाजपच्या संगीता बर्डे या निवडून आल्या. त्यामुळे अध्यक्षपदाच्या माध्यमातून नेवासा नगरपंचायतीवर भाजपची सत्ता आली आहे.
नगराध्यक्षपदासाठी 13 जून रोजी नामनिर्देशन पत्र दुपारी दोन वाजेपर्यंत दाखल करावे लागणार आहे. याची छाननी त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजेपर्यंत होणार आहे. तर वैध सदस्यांची यादी 15 जून रोजी सायंकाळनंतर जाहीर होईल. माघारीची मुदत 16 जून रोजी 4 वाजेपर्यंत आहे.
उपनगराध्यक्षपदासाठी 19 जून रोजी 10 ते 12 च्या वेळेत नामनिर्देशन पत्र दाखल करावे लागणार आहे. उपनगराध्यक्ष पदासाठी अर्ज मागे घेण्याची मुदत 19 जूनपर्यंत असणार आहे. दोन्हीही पदांच्या निवडी 19 जून रोजी दुपारी दोन वाजता नगरपंचायत कार्यालयात होणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
राखीव नगराध्यक्षपदाच्या जागेवर अनुसूचित जमातीचा एकमेव उमेदवार भाजपचा निवडून आल्याने नगराध्यक्षपद भाजपचे आहे. गट नोंदणीमध्ये भाजपा व इंदिरा काँग्रेसच्या गटात 8 जण आहेत. तर क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या गटात 9 जण आहेत.
क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून उपनाराध्यक्षपदासाठी माजी सरपंच नंदकुमार पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. तर भाजपकडून सर्वच जण राजकारणातील नवीन चेहरे आहेत. इंदिरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय सुखधान यांच्या पत्नी शालिनीताई सुखधान या देखील उपनगराध्यक्षपदाच्या इच्छुक उमेदवार असू शकतात.

LEAVE A REPLY

*