Type to search

Featured सार्वमत

नेवासा तालुक्यातील खुणेगाव येथील अपघातात जखमी महिलेवर उपचारात निष्काळजीपणा; दोघा डॉक्टरांकडून आठ लाखांची भरपाई

Share

राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा निकाल

नेवासा (तालुका प्रतिनिधी) – मोटारसायकल अपघातात जखमी झालेल्या नेवासा तालुक्यातील एका महिलेवर उपचार करताना निष्काळजीपणा केल्याप्रकरणी अहमदनगरच्या एका खासगी रुग्णालयातील दोघा डॉक्टरांनी रुग्ण महिलेस आठ लाख रुपये भरपाई द्यावी असे आदेश राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. याबाबत माहिती अशी, की नेवासा तालुक्यातील खुणेगाव येथील सविता संभाजी कदम या महिलेला 28 एप्रिल 2012 रोजी मोटारसायकल अपघातात मार लागल्यामुळे तारकपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर तेथील डॉ. संदीप सुराणा व डॉ. राजेश शहा यांनी उपचार केले होते. वैद्यकीय तपासण्या केल्यानंतर त्यांच्या खांद्यावर शस्त्रक्रियाही केली होती.

यानंतर सविता यांना दीड-दोन वर्षांनी पोटदुखीचा त्रास सुरू झाला व वाढतच गेला त्यावर त्यांनी खाजगी दवाखाना व शिर्डी येथील साईबाबा रुग्णालयात तपासणी केली असता त्यांच्या शरीरात सेंट्रल लाईन वायर राहून गेल्याचे आढळून आले. दरम्यानच्या काळात लवकर निदान न झाल्याने डॉक्टर संदीप सुराणा यांनी रुग्णास अधिक उपचारासाठी पुणे येथील रुबी हॉल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यास सांगितले परंतु वेळेवर उपचार न झाल्याने रुग्णाच्या शरीरातील सेंट्रल लाईन वायर गुंतागुंत झाल्याने निघू शकली नाही. परिणामी शरीरात रुग्णास कायम त्रास होत राहिला. यावर सविता संभाजी कदम यांनी राज्य ग्राहक निवारण आयोग औरंगाबाद येथे धाव घेतली. ग्राहक संरक्षण कायदा 1980 चे कलम 12 अन्वये कसूर केल्याबद्दल नुकसानभरपाई मिळावी म्हणून तक्रार दाखल केली. या प्रकरणात तक्रारदार व गैरअर्जदार यांनी दिलेला पुरावा कागदपत्रे व त्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर डॉक्टरांनी रुग्णावर उपचार करताना योग्य ती काळजी घेतली नाही; तसेच रुग्णाच्या शस्त्रक्रियेबाबत रुग्णांना वेळेत माहिती दिली नाही आणि सेंटर लाईन वायर रुग्णाच्या शरीरात टाकल्या बाबत रुग्णाची व त्यांची संमती घेतली नाही. त्यामुळे त्या रुग्णाला शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. या निष्कर्षापर्यंत राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग अध्यक्ष श्रीमती टी. एस. बारणे व सदस्य के. बी. गवळी आले.

तक्रारदारास नुकसान भरपाई म्हणून आठ लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच वैद्यकीय खर्च म्हणून 40 हजार रुपये, मानसिक व शारीरिक 10 हजार आणि तक्रारीचा खर्च रुपये 5 हजार असे सर्व पैसे 45 दिवसाच्या आत द्यावेत असे आदेश दिले आहेत. विहित नमुन्यात आदेशाचे पालन न झाल्यास या रकमेवर नऊ टक्के व्याजदर राहील असेही निकालात म्हटले आहे. या प्रकरणात तक्रारदाराच्या वतीने अ‍ॅड. सुनील थिटे यांनी काम पाहिले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!