Thursday, May 2, 2024
Homeनगरनेवासा न्यायालयीन इमारतीचे काम पूर्ण झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही- आ. गडाख

नेवासा न्यायालयीन इमारतीचे काम पूर्ण झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही- आ. गडाख

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

नेवासा येथील न्यायालयीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही आमदार शंकरराव गडाख यांनी नेवासा वकील संघाने आयोजित केलेल्या सत्कार समारंभ प्रसंगी दिली.

- Advertisement -

नेवासा येथील जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारत बांधकामास रक्कम रुपये 37 कोटी 57 लाख रकमेस तसेच न्यायाधीश निवासस्थान बांधकामासाठी रुपये 5 कोटी 91 लाखाचा असा एकत्रित रुपये 43 कोटी 48 लाखाचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार शंकरराव गडाख यांचा नेवासा वकील संघाच्यावतीने जाहीर सत्कार करण्यात आला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे न्यायालयीन इमारत कामासाठी 54 कोटी 6 लाख तसेच न्यायाधीश निवासस्थान बांधकामासाठी रुपये 6 कोटी 56 लाख असे एकत्रित रुपये 60 कोटी 62 लाख निधीची मागणी करण्यात आली होती.

मात्र 5 ऑगस्ट 2022 रोजी मंत्रालयात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची बैठक होऊन त्यात राज्यातील विविध शासकीय विभागातील इमारत बांधकामाचे 28 प्रस्ताव शिफारसीसाठी सादर करण्यात आले होते. त्यात बारा प्रस्ताव हे न्यायालयीन इमारत बांधकामाचे होते. त्यात नेवासा तालुक्याचा प्रस्ताव असल्याने त्याची छाननी होऊन न्यायालयीन इमारत बांधकामासाठी रुपये 37 कोटी 57 लाख तसेच न्यायाधीश निवासस्थान इमारत बांधकामासाठी 5 कोटी 91 लाख अशी एकत्रित मिळून 43 कोटी 48 लाख निधीला मंजुरी मिळाली.

पूर्वी छोट्या इमारतीमध्ये न्यायालयाचे कामकाज चालत होते त्यामुळे वकिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता आता मात्र त्यामुळे वकिलांची होत असलेली अडचण दूर होईल हे दोन्ही बांधकाम पूर्णत्वास नेण्यासाठी सर्व वकील मंडळींनी साथ द्यावी अशी भावना आमदार शंकरराव गडाख यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी वकील संघाचे वतीने तालुका बार असोसिएशन अध्यक्ष अ‍ॅड. बन्सी सातपुते, जिल्हा बारचे अध्यक्ष अ‍ॅड. अण्णासाहेब अंबाडे माजी अध्यक्ष अ‍ॅड. गोरख काकडे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अ‍ॅड. बाळासाहेब चव्हाण यांनी केले तर आभार अ‍ॅड. जमीर शेख यांनी मानले. याप्रसंगी सभापती रावसाहेब कांगुणे, अ‍ॅड. मुरलीधर करडक, अ‍ॅड. देसाई देशमुख, अ‍ॅड. सुभाष दरंदले, अ‍ॅड. पी. व्ही. माकोणे, अ‍ॅड. पी. व्ही. अंबाडे, अ‍ॅड. प्रदीप वाखुरे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या