Friday, May 3, 2024
Homeनगरनेवासा तालुक्यात कपाशी विम्याचे 12 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा

नेवासा तालुक्यात कपाशी विम्याचे 12 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा

नेवासा |तालुका वार्ताहर|Newasa

नेवासा तालुक्यातील शेतकर्‍यांना पिकविमा योजने अंतर्गत 2019 चा खरीप हंगामातील कपाशी पिकाला नामदार शंकरराव गडाख यांच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील सर्व सर्कलमधील 10 हजार शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर सुमारे 14 हजार 500 एकर क्षेत्रासाठी 12 कोटी 10 लाख रुपयांची विमा अनुदानाची रक्कम जमा झाली असल्याची माहिती नामदार गडाख यांच्या संपर्क कार्यालयातून दिली आहे.

- Advertisement -

या अगोदर नुकताच 2018-19 चा रब्बी हंगामातील पिकविम्याचे 4 कोटी 17 लाख रुपये शेतकर्‍यांचे बँक खात्यावर जमा होत असतांना त्या पाठोपाठ आता कपाशीच्या पिकविम्याची मिळालेली 12 कोटी दहा लाखाची रक्कम मिळून तालुक्यासाठी एकूण सव्वासोळा कोटीचा पिक विमा मिळवून देऊन आमदार गडाख यांनी शेतकर्‍यांना मोठा आर्थिक आधार दिला आहे.

मागील खरीप हंगामात पीक विम्याचा लाभ तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकर्‍यांना मिळावा व कोणीही शेतकरी पिकविम्याचे लाभापासून वंचित राहू नये म्हणून नामदार गडाख यांनी जिल्हा बँक व्यवस्थापनास सूचना करून बँकेचे कामकाज सुट्टीच्या दिवशी तसेच कामकाजाचे दिवशी जास्त वेळ चालू ठेवले होते.

2019 चे खरीप हंगामात प्रतिकूल हवामान, कीडरोग व अधिक पाऊस यामुळे शेतकर्‍यांना कपाशी पिकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली होती. आता ऐन सणासुदीच्या पार्श्वभूमीवर व शेतीतील पिकांची जोपासना व मशागत करण्यासाठी शेतकर्‍यांना पैशाची गरज असताना हे पैसे उपलब्ध झाल्याने शेतकर्‍यांमधून समाधानाची भावना व्यक्त होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या