नेवासा तालुक्याला अभंग महोत्सवाचे वेध

0

शरद पवारांची उपस्थिती अन् घुलेंचा पुढाकार

भेंडा (वार्ताहर)- नेवासा तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी घुलेंनी घेतलेला पुढाकार आणि शरद पवारांची उपस्थिती यामुळे माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाचे नेवासा तालुक्याला वेध लागले आहेत.

जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर तालुक्यातील राष्ट्रवादी मध्ये मोठी उलथापालथ झाली. त्याचा परिपाक म्हणून नेवासा तालुक्यात राष्ट्रवादीला केवळ एक जिल्हा परिषद व एक पंचायत समितीच्या जागेवरच समाधान मानावे लागले.

गडाखांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर नेवासा तालुक्यातील पक्षाची जबाबदारी घुले बंधू, पांडुरंग अभंग व विठ्ठलराव लंघे यांच्या खांद्यावर आली आहे.शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी स्थापन केली त्यावेळी जिल्ह्यातील पवार समर्थकांनी बघ्याची भूमिका घेतली असताना लोकनेते मारुतराव घुले पाटील व तत्कालीन काँग्रेसचे विद्यमान आ. पांडुरंग अभंग यांनीच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून पवारांना साथ दिली.त्यांनतर सत्तेसाठी अनेक संधीसाधू राष्ट्रवादीत आलेत आणि गेलेत हा भाग वेगळा.

नगर जिल्ह्यातील शरद पवारांवर निष्ठा असणारे आणि पवारांचे अत्यंत विश्वासू असलेल्या नेत्यांमध्ये अभंग यांचा वरचा नंबर आहे. नेवासा तालुक्यातील एकमेव ओबीसी नेता म्हणून त्यांची ओळख आहे. नेता व पक्षाने दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडणारा व सर्वांना बरोबर घेऊन जाणारा चारित्र्यसंपन्न कार्यकर्ता म्हणून अभंग यांची ओळख आहे.

शेतकरी ते राजकारणी असा प्रवास करताना अभ्यासपूर्वक वाटचाल केली. वयाची 75 वर्षे पूर्ण करत असताना 29 जुलै रोजी शरद पवार यांच्याहस्ते अभंग यांच्या शेतमळा ते विधानसभा या आत्मचरित्राचे प्रकाशन व अमृत महोत्सवी सत्कार होत आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजनात नरेंद्र घुले व चंद्रशेखर घुले या घुले बंधूंचा मोठा पुढाकार आहे. अमृतमहोत्सवी सत्कार समितीचे अध्यक्षपद राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्याकडे आहे. शरद पवाराच्या उपस्थितीत दिमाखदार सोहळा करून निष्ठावान असलेल्या ज्येष्ठ नेत्याचा गौरव करण्याचा निर्धार घुले बंधूंनी केलेला आहे.

भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखाना कार्यस्थळावर कार्यक्रम होणार असून त्याचे नियोजन सुरू आहे. जिल्हाभरातून विविध स्तरातील कार्यकर्ते व जनता उपस्थित राहणार असल्याने त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे.जिल्ह्यातील सर्व महाराज मंडळी, सर्व पक्षांचे आजी माजी आमदार, खासदार, मंत्री यांनाही निमंत्रित करण्यात येणार आहे.

गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून श्रीक्षेत्र देवगड येथे महंत भास्करगिरी महाराज यांच्या व आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजश्री घुले, विठ्ठलराव लंघे यांच्या उपस्थितीत निमंत्रण पत्रिकेचे वाटप सुरू करण्यात आले आहे.
शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये होणार्‍या अभंग महोत्सवामुळे नेवासा तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.

अभंग यांना मानणारा तालुक्यात सहकार, राजकीय, अध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील, सर्व जाती धर्मातील एक वेगळा वर्ग आहे.त्यामुळे कार्यक्रमाच्या माध्यमातून तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार का? याचेच वेध सर्वांना लागून आहेत.

LEAVE A REPLY

*