नवतंत्रज्ञान समजून घेतल्यास एकरी दीडशे टन उस उत्पादन शक्य

0

कृषिभूषण माने : प्रवरानगरला ऊस उत्पादन परिसंवाद

लोणी (प्रतिनिधी)- उत्पादकता वाढीसाठी जमिनीतील सेंद्रिय कर्ब आवश्यक घटक आहे. भरपूर रासायनिक खते वापरुन उत्पादन मिळते हा गैरसमज दूर झाला पाहिजे. ऊस उत्पादकांनी नवंतत्रज्ञान समजून घेतले तर एकरी शंभर ते दीडशे टनाचे उत्पादन शक्य आहे असे प्रतिपादन आष्टा जि. सांगली येथील कृषिभूषण शेतकरी संजीव माने यांनी केले.

प्रवरानगर येथील डॉ.धनंजयराव गाडगीळ सभागृहात पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना, कृषिविज्ञान केंद्र बाभळेश्वर आणि बायर क्राप सायन्स पुणे यांच्या वतीने आयोजित ऊस उत्पादन तंत्रज्ञान परिसंवादात संजीव माने बोलत होते.

अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे होत्या. कार्यक्रमास माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, उपाध्यक्ष पोपटराव लाटे, गणेशचे अध्यक्ष मुकुंदराव सदाफळ, प्रवरा बॅकेचे अध्यक्ष बाळासाहेब भवर, नंदकिशोर राठी, कार्यकारी संचाालक ए. आर. ताबे, कृषिविज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संभाजी नालकर, बायर क्रॉप सायन्सचे संदीप पाटील, विद्याधर बढे, विकास बढे आदी उपस्थित होते.

संजीव माने यांनी ऊस उत्पादकांनी एकरी 150 टनाचे उत्पादन घेताना जमिनीची सुपीकता, योग्य लागवड अंतर, रासायनिक खतांच्या योग्य मात्रा, पाण्याचे योग्य नियोजन आणि योग्यवेळी पीकसंरक्षण या पंचसूत्रीचा अवलंब, सेद्रीय कर्ब वाढीसाठी शेणखताच्या वापरावर भर आदींवर सविस्तर मार्गदर्शन केले.

यावर्षी ऊस उत्पादन आणि ऊस लागवडीला मोठी संधी आहे. याचा लाभ ऊस उत्पादकांनी घेऊन मोठ्या प्रमाणात लागवड करण्याचे आवाहन सौ. शालीनीताई विखे पाटील यांनी करतानाच नव्या तंत्रज्ञानाचा आणि सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून उत्पादकता आणि खर्चात बचत करावी असे सांगितले.

डॉ.संभाजी नालकर यांनी विकास प्रकल्पाची सविस्तर माहिती देऊन ना. राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शाखाली प्रशिक्षण, मेळावे, पीक प्रात्याक्षिके, मोबाईल अ‍ॅप के.व्ही.के. प्रवरा रेडीओद्वारे तत्रज्ञान उपलब्ध केले जाणार असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन करून सुनील बोरुडे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

*