Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच क्रीडा नाशिक मुख्य बातम्या

मुंबई मॅरेथॉनमध्ये नाशिककरांचा ‘हटके रोल’

Share

नाशिक । दिनेश सोनवणे

टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये यंदा 46 हजार 414 धावपटूंनी नोंदणी केली होती. त्यातील 8 हजार 414 मुख्य मॅरेथॉन तर 15 हजार 457 धावपटू अर्धमॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. नियमित वेगवेगळ्या स्पर्धा जिंकून आणणार्‍या नाशिककरांचा यंदाच्या मुंबई मॅरेथॉनमध्ये वेगळी भूमिका बघायला मिळाली. कुणी नवख्या रनर्सला पेसर बनून मार्गदर्शन केले तर कुणी रनर्सला पाणी देण्यापासून लहानमोठ्या दुखापतींची काळजी घेतली. स्पर्धेच्या शेवटाला धावून आलेल्या रनर्सचे दुखणे कमी करण्यासाठी अ‍ॅक्युप्रेशर प्रणालीने एका समूहाने योगदान दिले.

आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन प्रशिक्षक अनिरुद्ध अथणी यांनी नवख्या धावपटूंना मार्गदर्शन करण्यासाठी मैदानावरील धावत्या प्रशिक्षकाची भूमिका पार पाडली. तर नाशिकच्या धावपटूंच्या 12 सदस्यांच्या एका समूहाने एक रनर म्हणून दुसर्‍या रनरची काळजी घेत ‘एड हेल्थ स्टेशन’मध्ये स्वयंसेवकाचे काम करत रनर्सची काळजी घेतली. तिसर्‍या पाच व्यक्तींच्या समूहाने अ‍ॅक्युप्रेशर प्रणालीने धावून येणार्‍या स्पर्धकांचे दुखणे कमी करण्यासाठी प्रयत्न केले.

अन् बजावली स्वयंसेवकाची भूमिका

नाशिकमधील अ‍ॅक्टिव्ह एनआरजी या रनर्सच्या 12 जणांच्या समूहाने यंदाच्या टाटा मुंबई मॅरथॉनमध्ये स्वयंसेवकाची भूमिका बजावली. या समूहास आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन प्रशिक्षक अनिरुद्ध अथणी हे मार्गदर्शन करतात. यंदा एड हेल्थ स्टेशनद्वारे धावपटूंसाठी मदत करण्याची जबाबदारी पार पाडली. एका पाण्याच्या कंपनीच्या पाण्याच्या बाटल्या रनर्ससाठी वेळोवेळी दिल्या. तसेच नाशिकमध्ये आम्ही दर महिन्याला ‘लास्ट ऑफ द मंथ रन’ (एलफ्रॉम) रन असतो. तेव्हा या एड स्टेशनचे प्रशिक्षण आम्ही घेत असतो. स्पर्धेनंतर इतर रनर्सकडून कौतुक होते. आयोजकांची सपोर्ट सिस्टम चांगली असली की, काम करायला अधिक मजा येते.

– राजेश्‍वरी बालाजीवाले, सदस्या, अ‍ॅक्टिव्ह एनआरजी, नाशिक

पेसर असतो मैदानावरचा प्रशिक्षक

मोठमोठ्या धावण्याच्या स्पर्धांमध्ये पेसरची नियुक्ती केली जाते. ज्या स्पर्धकांनी दक्षिण आफ्रिकेत 90किलोमीटर धावण्याची स्पर्धा पूर्ण केलेली असते, त्यांची मॅरेथॉन स्पर्धेत पेसर म्हणून नियुक्ती केली जाते. नवख्या धावपटूंना स्पर्धा पूर्ण करण्यासाठी पेसर मदत करत असतात. वेगवेगळ्या वेळेसाठी वेगवेगळ्या पेसरची नियुक्ती केली जाते. पाठीमागे हिरवा झेंडा अडकवून पेसर धावपटूला लागणार्‍या वेळेबाबत संकेत देत 

असतो.

यात कुठे कमी धावायचे, कुठे वेग वाढवायचा तसेच किती वेळाने पाणी प्यायचे, याबाबत पेसर मार्गदर्शन करत असतो. हैदराबाद, मुंबई, गोवा, ठाणे, पुणे याठिकाणी मी पेसर म्हणून भूमिका बजावली आहे. दोन वर्षांपूवी दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड रन ही 90 किमीचा स्पर्धा जिंकली तेव्हापासून पेसरची भूमिका आणि खेळाडूंना मार्गदर्शन करत असतो.

अनिरुद्ध अथणी, आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन धावपटू व प्रशिक्षक

अ‍ॅक्युप्रेशरने दुखणे काही क्षणात कमी होते

मॅरेथॉन स्पर्धेसाठी नाशिकहून पाच जण गेलो होतो. यात विजय टन्ना, मिलिंद खरे, निवृत्ती राने, हेमचंद्र बसे यांचा समावेश होता. मुंबईच्या आशियान हार्ट हॉस्पिटच्या टीमसोबत आम्ही हे काम केले. खेळाडू धावून आल्यानंतर अक्षरशः मैदानावर कोसळतात. तेव्हा त्यांच्या वेदना कमी करण्यासाठी अ‍ॅक्युप्रेशर प्रणालीचा उपयोग करून काही क्षणात त्यांना चालते-फिरते करतो. काही खेळाडू फिजिओथेरपी घेतात.

तरीही वेदना कमी होत नसल्यास त्यांना अ‍ॅक्युप्रेशरची गरज भासते. मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत साडेतीन ते चार हजार धावपटूंनी अ‍ॅक्युप्रेशरचा लाभ घेतला. या प्रणालीत कुठलेही औषध लागत नाही. फक्त हाताच्या बोटांच्या मायक्रोपॉईंटस्ने वेदना कमी करता येतात. विशेष म्हणजे, पाठदुखी, कंबरदुखी या प्रणालीद्वारे कमी केली जाते. नाशिकमधून अनेक पालख्या जातात तेव्हाही आम्ही भाविकांचे दुखणे अ‍ॅक्युप्रेशरने कमी करतो.

दरवर्षी गुजरातमधील आशापुरी देवीच्या यात्रेला आम्ही जातो. येथे 500ते 600 किमी चालून भाविक येतात तिथेही आम्ही नि:शुल्क ट्रिटमेंट देतो. शहरातील महात्मानगर आणि एसटी कॉलनीत दररोज सायंकाळी 5 ते 7 ट्रिटमेंट चालते. 25-30 रुग्ण नियमित इथे येतात.

– उदय एखंडे (अ‍ॅक्युप्रेशर तज्ञ)

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!