निवृत्तीनंतर ‘ते’ करतायत समाजकार्यासाठी देशाटन; आतापर्यंत २३ राज्यातून २३ हजार किमी प्रवास

0
नाशिक दि. १४ प्रतिनिधी | रस्त्यावरील अपघातात हजारो नागरिकांचे दररोज मृत्यू होतात. मृत्यू टाळण्यासाठी  वाहतूक सुरक्षेबाबत जनजागृती गरजेची आहे. म्हणून वाहतूक सुरक्षेचे धडे देत दिल्लीतील ज्येष्ठ पत्रकार शरत शर्मा सध्या देशाटन करत आहेत. नेपाळ, भूतानसह २३ राज्यांची भ्रमंती करून आज शर्मा नाशिकमध्ये आले. २३ हजार किमीचा प्रवास केल्यानंतर त्यांना आलेले अनुभव त्यांनी देशदूत डिजिटलसोबत शेअर केले.

शर्मा यांचे वडील भारतीय चलार्थ मुद्रणालय येथे नोकरीला असल्यामुळे त्यांचा जन्म नाशिकमध्येच झाला. त्यामुळे त्यांना त्यांच्या जन्मगाव नाशिकबद्दल मोठी आत्मीयता आहे. दिल्लीत स्थायिक झालेल्या शर्मा यांनी अनेक अनुभवांचे कथन केले. ते म्हणाले, दररोज मी दोनशे ते अडीचशे किमीचा प्रवास करतो.

प्रवासात निसर्गरम्य ठिकाणी छायाचित्रे मी माझ्या कॅमेऱ्यात कैद करतो. तेथील लोकांशी चर्चा केल्यानंतर अनेकांकडून वेगवेगळ्या गोष्टी माहिती होतात. अनेकजण मदतीसाठी विचारतात; तेव्हाच भारत विविधतेने नटलेला जरी असेल तरी माणुसकी, कर्तव्याची जाणीव आणि एकात्मतेचे खरे दर्शन होते असे ते म्हणतात.

केरळमध्ये महापुराने काहूर माजले होते. त्यांची मावसबहिण तिथेच राहते. ते त्यांच्याकडे थांबले होते. त्यांनी पुरातून कशी सुटका करून घेतली याबाबतचा अनुभव सांगितला. ते म्हणाले, माझी बहिण जिथे राहत होती, तिथून मी नदीकडे फेरफटका मारण्यासाठी गेलो.

नदीचे पाणी हळूहळू वाढत होते. मी बहिणीला आणि दाजींना सांगितले की, इथून आपण निघायला पाहिजे. पाण्याची पातळी वाढते आहे, धोका पत्करण्यापेक्षा निघालेलं बरं. तेव्हा त्यांनी आम्ही ४० वर्षांपासून राहतो असे काहीही याठिकाणी  होणार नाही असे सुनावले.

त्यानंतर मी पुन्हा त्या परिसरात गेलो. आता पाणी मात्र प्रचंड वाढले होते, त्यांना मी पुन्हा एकदा परिस्थितीबाबत सांगितले. त्यानंतर त्यांनीही मानले, काही वेळेतच आम्ही तिथून निघून सुरक्षित स्थळी पोहोचलो. पोहोचण्यासाठी तीन ते चार तासांचा कालावधी लागला. त्यानंतर जेव्हा बहिणीच्या गावाहून बातम्या आल्या की, हा परिसर संपूर्ण पाण्याखाली गेला असून घरात पाच फुटांपेक्षा अधिक पाणी आहे. तेव्हा या महाभयानक संकटातून योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याने काय फायदा झाला याची जाणीव झाली.

शर्मा यांनी केलेल्या देशाटनावर पुस्तक लिहिणार आहेत. वेगवेगळे अनुभव या माध्यमातून मांडणार आहेत. विशेष म्हणजे, शर्मा यांना कुणीही पैसा पुरवलेला नाही. संपादक म्हणून निवृत्त झाल्यानंतर ते स्वत: मोटारसायकल घेऊन निवृत्तीत मिळालेल्या पैशांतून आपला खर्च करत आहेत. दिवसाला चार ते साडेचार हजार रुपयांचा खर्च होतो असे ते सांगतात. या संपूर्ण भ्रमंतीला जवळपास १० ते १२ लाख खर्च अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.

वाहतूक जनजागृती हाच अजेंडा 

रस्त्यावरून जाताना हेल्मेट वापरणे, वाहतुकीचे नियम पाळणे, वाहनांची देखभाल वेळेवर करणे याबाबत जनजागृती करत आहे. रस्त्यावर हजारो लोकांना प्राण गमवावा लागतो. अपघात कमी करण्यासाठी वाहनांच्या गतीची मर्यादा पाळली जावी. महागड्या गाड्या घेऊन रस्त्यावर भरधाव वेगाने वाहने चालवणे म्हणजे स्वतःच स्वत:च्या हाताने मृत्युपत्र लिहून देण्यासारखे आहे.

शरत शर्मा, माजी संपादक टाईम्स ऑफ इंडिया, नवी दिल्ली.

LEAVE A REPLY

*