Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

एनआरसीच्या आधारे नागरिकत्व सुनिश्चित केले जाईल : शहा

Share

नवी दिल्ली । धर्माच्या आधारे एनआरसीमध्ये भेदभाव होण्याची शक्यता फेटाळत एनआरसीच्या आधारे नागरिकत्व सुनिश्चित केले जाईल आणि ते संपूर्ण देशात लागू करण्यात येईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.

राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या (एनआरसी) मुद्यावरून विरोधकांकडून होणार्‍या आरोपांना राज्यसभेत उत्तर देताना शहा म्हणाले, कोणत्याही धर्माच्या नागरिकांना यामुळे घाबरण्याचे कारण नाही. देशातील सर्वच नागरिकांना एनआरसी यादीत स्थान देण्यासाठीची ही एक प्रक्रिया आहे. ‘एनआरसी’मध्ये धर्माच्या आधारे भेदभाव केला जाणार नाही. अन्य धर्माच्या लोकांना यादीत स्थान दिले जाणार नाही, अशी कोणतीही तरतूद एनआरसीमध्ये नाही.

सर्व नागरिक, मग त्यांचा धर्म कोणताही असो, त्यांना या यादीत स्थान दिले जाऊ शकते. एनआरसी ही स्वतंत्र प्रक्रिया आहे आणि नागरिकत्व सुधारणा विधेयक ही वेगळी प्रक्रिया आहे, असे अमित शहा यांनी स्पष्ट केले. देशातील सर्व नागरिकांना एनआरसी यादीत स्थान मिळावे यासाठी ते संपूर्ण देशात लागू केले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

अमित शहा यांनी एनआरसीसंदर्भात कोलकातामध्ये केलेल्या वक्तव्याचा हवाला देत काँग्रेसचे खासदार सय्यद नासीर हुसैन यांनी राज्यसभेत प्रश्न उपस्थित केला होता. ‘तुम्ही कोलकातामध्ये मुस्लीम धर्माचा उल्लेख न करता अन्य पाच ते सहा धर्मांचा उल्लेख केला होता. अवैधपणे का होईना पण या धर्माच्या लोकांना नागरिकत्व मिळेल, असे तुम्ही म्हणाला होतात. त्यामुळे मुस्लिमांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. नागरिकत्व सुधारणा विधेयक आणि एनआरसी ही प्रक्रिया वेगवेगळी आहे, हे मलासुद्धा ठाऊक आहे,’ असे हुसैन म्हणाले.

शरणार्थींसाठी सुधारणा विधेयक
हिंदू, बुद्ध, शीख, जैन, ईसाई, पारसी आदी धर्मातील शरणार्थींना नागरिकत्व मिळणार आहे. त्यांच्यासाठी नागरिकत्व सुधारणा विधेयक आहे. ज्यांच्याशी पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानमध्ये धर्माच्या नावाखाली भेदभाव केला गेला अशा शरणार्थींसाठी नागरिकत्व सुधारणा विधेयक आहे, अशी माहिती अमित शहा यांनी दिली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!