द्वारका कोेंडी सोडविण्यासाठी ‘यु टर्न’ची शक्कल

0
नाशिक । संपुर्ण शहरासाठी डोकेदुखी ठरलेल्या नाशिक – पुणे व मुंबई – आग्रा महामार्गावरील द्वारका सर्कल येथील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. वाहतूक पोलीस शाखेने पुन्हा नवा प्रायोग राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

महामार्गावर ‘यु-टर्न’ घेऊन नाशिक व पुणे बाजूस वाहने सोडण्याचा नवा प्रयोग सोमवार (दि.9) पासून होणार असल्याची माहिती वाहतुक पोलीस विभागाचे उपआयुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली आहे.

सोमवारी व मंगळवारी प्रायोगिक तत्वावर याची अंमलबजावणी केली जाणार असून या मार्गावरून जाणार्‍या नागरीकांनी सहकार्य करण्याचे आवाहन कोकाटे यांनी केले आहे. शहरातील वाहतुक कोंडी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. परंतु सर्वाधिक वाहतूक कोंडीची समस्या द्वारका सर्कल याठिकाणी उद्भवते.

या ठिकाणी उड्डणपूल तसेच पादचार्‍यांसाठी भुयारी मार्ग काढूनही येथील वाहतु कोंडी कमी होण्याऐवजी वाढतच आहे. याठिकाणची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतुक पोलीसांसह महामार्ग प्राधिकरण, शहरातील खासदार, आमदार यांच्यासह अनेक सेवाभावी संस्था प्रयत्न करत आहेत.

परंतु अनेक प्रयत्न केल्यानंतरही कोंडीची समस्या सुटू शकलेली नाही. नाशिककडून पुण्याकडे व नाशिकमधून मुंबई-धुळ्याकडे जा-ये करणार्‍या वाहनांसह स्थानिक वाहनांमुळे याठिकाणी वाहतूक कोंडीची भीषण समस्या निर्माण होते. त्यातच या मार्गावरील फेरीवाले व अतिक्रमणाचीही भर पडत आहे.

पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल यांच्या आदेशानुसार ही समस्या सोडविण्यासाठी वाहतूक पोलीसांनी पर्यायी यु-टर्न मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पुणे तसेच नाशिकच्या दिशेने येणारी वाहने सर्कलला गोलाकार फिरणार नाहीत तसेच क्रॉसही करणार नाही. ही वाहने आग्रा – मुंबई उड्डाणपुलाखाली दोन्ही दिशेने पुढे नेहून युटर्नचा वापर करून मार्गस्थ होणार आहेत.

तसेच धुळे व मुंबईच्या दिशेने येऊन उड्डाणपूलावरून द्वारका येथे खाली उतरणारी वाहने याचा वाहनांबरोबर पुढे जाऊन युटर्न घेऊन नाशिक तसेच पुण्याच्या दिशेने मार्गस्थ करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार असल्याचा दावा वाहतुक विभागाने केला आहे.

यासंदर्भात वाहतूक शाखेचे उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार, येत्या सोमवारी व मंगळवारी या दोन्ही दिवशी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेदरम्यान या पर्यायी युटर्ननुसार प्रायोगिक तत्त्वावर वाहतूकीची अंमलबजावणी केली जाणार आहे. नागरीकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*