नेवासा एमआयडीसीत परदेशी कंपन्यांसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घालणार : आ. मुरकुटे

0

भाजप नोकरी महोत्सवात 27 कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून दोन हजार युवकांच्या मुलाखती

नेवासा (तालुका प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बेरोजगार युवकाच्या हाताला काम व प्रत्येकाच्या कुटुंबाला आधार देण्याची जबाबदारी माझी असून नेवासा एमआयडीसी मध्ये परदेशी कंपन्या येण्यासाठी व त्यांना प्राधान्य देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घालणार असल्याचे प्रतिपादन आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केले.
भाजपच्यावतीने रविवार दि. 8 ऑक्टोबर रोजी नेवासा फाटा येथे आयोजित नोकरी महोत्सवत आ. मुरकुटे बोलत होते. यावेळी 27 कंपन्यांच्या प्रतिनिधींनी हजेरी लावून यात सुमारे दोन हजार युवकांनी मुलाखती दिल्या.
नेवासाफाटा येथील यश मंगल कार्यालयात हा मेळावा झाला.
अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड होते. तालुकाध्यक्ष ज्ञानेश्‍वर पेचे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. नोकरी महोत्सवाच्या माध्यमातून प्रत्येक हाताला काम देण्यासाठी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी आयोजित केलेला नोकरी महोत्सव उपक्रम राज्यासाठी आदर्शवत असल्याचे सांगितले.
आ. बाळासाहेब मुरकुटे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यासाठी हितावह निर्णय घेतले आहेत, तर पंतप्रधान मोदींनी देखील मुद्रा लोन, बेटी बचाव-बेटी पढाव, मागासवर्गीयांसाठी गॅस वितरण योजना राबविल्या तर नोटाबंदी सारखे निर्णय घेऊन विश्‍वात देशाची प्रतिमा उंचाविण्याचे मोठे काम केले असल्याचे सांगितले.
कर्जमाफीचा लाभ सर्वांना मिळणार असल्याने कोणीही हतबल होऊ नये. तसेच नेवासा तालुक्यात जास्तीतजास्त निधी देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मोठे योगदान दिले असल्याचे सांगितले.नोकरी महोत्सवासारखा उपक्रम तालुक्याच्या दृष्टीने ऐतिहासिक क्षण असल्याचे सांगत आमदार बाळासाहेब मुरकुटे म्हणाले, रिकाम्या हाताला काम व प्रत्येक कुटुंबाच्या प्रगतीसाठी हातभार लावण्याचा आपला प्रयत्न रहाणार असून जातपात राजकारण विरहित हा महोत्सव असल्याचे स्पष्ट केले.
खडकाफाटा येथील रामदेव बाबांचा प्रकल्प देखील तीन महिन्यांत चालू होणार असल्याने नोकरीच्या संधी तेथेही उपलब्ध होतील. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून ज्यांनी जॉब कार्डद्वारे नोंदणी केली आहे ते या परिवाराशी जोडले असून या सर्वांना नोकरी देण्याची जबाबदारी मी स्वीकारतो अशी ग्वाही दिली.
प्रा. भानुदास बेरड यांनी अध्यक्षीय मनोगतात आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या उपक्रमाचे कौतुक केल.े असा लोकहितासह प्रत्येक घटकाचा विचार करणारा आमदार मी पाहिला नाही असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
यावेळी कंपनीच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे, पंचायत समितीचे सदस्य अजित मुरकुटे, भानसहिवर्‍याचे सरपंच देविदास साळुंके, दत्तात्रय बर्डे, नामदेव खंडागळे,
जॉब फेअरचे श्रीराम सातपुते, रहाणे, गॅलेक्सी कंपनीचे पीयूष कोटेजा, शेती तज्ञ एकनाथराव भगत, अंकुश काळे, सचिन पारखे, नगरसेवक सुनील वाघ, नगरसेवक रणजित सोनवणे, दिनेश व्यवहारे, डॉ. सचिन सांगळे, भारत डोकडे, निरंजन डहाळे, मनोज साखरे यांच्यासह युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन भाजपचे सरचिटणीस अशोक टेकणे यांनी केले. पंचायत समिती सदस्य अजित मुरकुटे यांनी आभार मानले.

  शेवगाव-पाथर्डीचे माजी आमदार राजीव राजळे यांचे निधन झाल्यामुळे नोकरी मेळाव्याचा शुभारंभ दीपप्रज्वलन न करता सत्कार टाळून त्यांना प्रथम श्रद्धांजली वाहून करण्यात आला.

LEAVE A REPLY

*