Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

नेवासा : भेंड्यातील नागेबाबा मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी लांबविली

Share

भेंडा (वार्ताहर) – नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक गावात काल मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून भेंडा गावचे ग्रामदैवत श्री संत नागेबाबा मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी उचलून नेली आहे तर बसस्थानक चौकातील पंडित सराफ हे सोने-चांदी विक्रीचे दुकान फोडण्यात आले आहे.

सोमवारी दि. 18 नोव्हेंबर पहाटे 3 वाजता पुजारी अशोक परशराम गव्हाणे हे मंदिरात साफसफाईसाठी आल्याने मंदिराचा पूर्वेकडील मुख्य दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. आत मंदिरात पाहिले असता मंदिरातील दानपेटी गायब झाली असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी लगेच ही घटना मंदिर विश्वस्त व गावकर्‍यांच्या निदर्शनास आणून दिली.

मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज वरून काल रविवार दि. 17 रोजी रात्री 1:13 मिनिटांनी 6 चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केल्याचे आणि सुमारे 15 ते 20 मिनिटे मंदिरात असल्याचे स्पष्ट होत आहे. यावेळेस चोरट्यांनी मंदिरातच दानपेटी फोडण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र ती न फुटल्याने दानपेटीच उचलून नेली आहे. यासाठी चारचाकी वाहनाचा वापर केला असावा असा अंदाज आहे. चोरट्यांनी आपले चेहरे पूर्णतः झाकून घेतलेले असल्याने ओळख पटणे जिकरीचे होणार आहे.

या चोरीत चोरट्यांनी 35 हजार रुपये किमतीची दानपेटी व आतील पैसे-ऐवज 60 ते 65 हजार रुपये असे अंदाजे एक लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. मागील महिन्यात दानपेटी उघडून आतील जमा रक्कम बँकेत जमा करण्यात आली होती. त्यामुळे मोठी रक्कम चोरी होण्यापासून वाचली.

सराफ दुकान फोडी…
तर दुसर्‍या घटनेत रात्री पावणे दोनचे सुमारास भेंडा बसस्थानक चौकातील नागेबाबा मंदिर रस्त्यावर असलेले सागर पंडित यांचे पंडित सराफ या सोने-चांदी विक्रीचे दुकानाचे शटर उचकटून दुकानात चोरी करण्यात आली आहे. या चोरीत 87 हजार 500 रुपये किमतीची चाळाची 2.5 किलो चांदी व 22 हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या नथा (6 ग्राम), 3 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 1 लाख 9 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.

याबाबत सागर विष्णू पंडित रा. फुलारी वस्ती, भेंडा यांच्या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रणजित डेरे करीत आहेत.

दरम्यान माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, पोलीस उपअधीक्षक मंदार जवळे, नेवासा पोलीस ठाण्याचे निरीक्षक रणजित डेरे व सोनई ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मंदिर दानपेटी चोरी सह भेंडा गावातील इतर चोर्‍यांचा लवकरात लवकर छडा लावू अशी ग्वाही उपअधीक्षक मंदार जवळे यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिली आहे.

नागेबाबा मंदिरात दुसर्‍यांदा दानपेटीची चोरी
या पूर्वीही 4 ऑगस्ट 2016 रोजी श्री संत नागेबाबा मंदिराच्या मुख्य प्रवेशव्दाराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी उचलून नेली होती. सीसीटीव्ही कॅमेरा मशीन (डीव्हीआर) व रोख रक्कम असा 89 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली होती. या घटनेत रिकामी दानपेटी गावातच आढळून आली होती. या घटनेचा गेल्या चार वर्षात अजूनही पोलिसांना तपास लागलेला नाही.

तपास न लागल्यास आंदोलन
चार वर्षांपूर्वी नागेबाबा मंदिरात झालेल्या चोरीचा अद्यापही तपास लागलेला नसतानाच दुसर्‍यांदा ही चोरी झाली आहे. मंदिरात आणि गावातील दुकान फोडीच्या घटना वारंवार घडत आहेत. मात्र पोलिसांना अद्याप एकही चोरीचा तपास लागलेला नाही. मंदिर दानपेटी चोरीचा 2 दिवसात तपास न लागल्यास पोलिसांच्या निषेधार्थ भेंडा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस व माजी सरपंच गणेश गव्हाणे यांनी दिला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!