माहेरी दिलेल्या परीक्षेने ‘नेटकरी’ खुशीत!

नाशिकरोडच्या दोन्ही केंद्रांवर ‘नेट’ परीक्षा सुरळीत

0
नाशिकरोड | का.प्र.- प्राध्यापक होण्यासाठी आवश्यक असणार्‍या नेट परीक्षेसाठी नाशिक केंद्राला मंजुरी मिळाल्यानंतर काल नाशिकमधील नऊ केंद्रांवर पहिली ‘नेट’ परीक्षा उत्साहात झाली. एरवी या परीक्षेसाठी जळगाव, पुणे, औरंगाबाद, मुंबईला जावे लागत होते.

आता वेळ, पैसा व श्रम वाचल्याने विद्यार्थी खुशीत होते. विशेष म्हणजे नेहमीसारखी दगदग, थकावट, ताण नसल्याने नेटकर्‍यांनी पेपरही जोमात लिहिला. देशातील सुमारे नव्वद मोठ्या शहरांसह नाशिकला नेटचे केंद्र होण्यासाठी खा. हेमंत गोडसे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून काल नाशिकरोड विभागातील आयएसपी नेहरूनगर व देवळाली येथील केंद्रीय विद्यालयातील दोन्ही केंद्रांवर ‘दै. देशदूत’ने विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता विद्यार्थ्यांमध्ये वेगळाच उत्साह व आनंद दिसून आला.

रोजगाराची संधी
उत्साहाने व मन एकाग्र करुन तसेच कोणताही ताण नसल्याने विद्यार्थ्यांनी नेटची परीक्षा उत्तम प्रकारे दिली. पेपर चांगला गेल्याचे विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरून दिसून आले. नाशिकला नेट केंद्र झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या रोजगार संधी वाढल्या आहेत. नेटच्याच समकक्ष असलेली सेट परीक्षेचे केंद्र नाशिकमध्ये आहे. बहुतांशी हेच विद्यार्थी नेट परीक्षा देतात. नाशिकला केंद्र झाल्यामुळे अनेकांना सेटबरोबरच नेट परीक्षाही देता आली.

कडक शिस्त
नेट परीक्षेत गैरप्रकार होऊ नयेत म्हणून युजीसी व स्थानिक प्रशासनाने कडक नियमावली व शिस्त अंगीकारली होती. परीक्षार्थींना मोबाईल, घड्याळ, पाण्याची बाटली व जेवणाचा डबासुद्धा परीक्षा हॉलमध्ये घेऊन जाण्यास सक्त मनाई होती. कॉपीचे प्रकार होऊ नये यासाठी कडक व्यवस्था करण्यात आली होती.

 

वेळे आधीच विद्यार्थी हजर..

युजीसीच्या नियमानुसार नेट परीक्षा केंद्रावर अर्धातास अगोदर हजर राहावे लागते. त्यामुळे सकाळी नऊची परीक्षेची वेळ असल्याने अर्धा तास आधीच हजर रहावे लागत असे. परगावी इतक्या सकाळी चार-सहा तास प्रवास करून परीक्षेला वेळेत पोहचेल की नाही याची शक्यता नसते. अनेक विद्यार्थी रात्री मुक्कामी जात असत. पण त्यांची मुक्कामाची योग्य व्यवस्था नसल्याने प्लॅटफॉर्म फुटपाथवर झोपावे लागत असे. मानसिकता बिघडल्याने विद्यार्थी अपेक्षेप्रमाणे पेपरही लिहू शकत नव्हते. बहुतांशी विद्यार्थी अर्ज भरुनही केवळ परीक्षेला जाण्यासाठी पैसे नसल्याने किंवा जाण्याचीही योग्य सुविधा नसल्याने परीक्षाच देत नव्हते. काल येथील दोन्ही सेंटरवर परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी वेळेपूर्वीच हजर होते. तसेच त्यांचा चेहर्‍यावर वेगळाच उत्साह दिसून आला.

सदर निर्णय स्वागतार्ह आहे. खरे तर याबाबत आधीच मंजुरी मिळणे अपेक्षित होते. शैक्षणिक सुदृढतेसाठी नाशिकमध्ये सर्व सोयीसुविधा असूनही व्यवस्थेचा दुजाभाव अनाकलनीय होता. पुण्यानंतर नाशिक हेच शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येत आहे. नेट परीक्षेच्या समकक्ष असलेली सेट परीक्षा केंद्र नाशिकला आहे. सेटचे विद्यार्थी नेटसाठीही पात्र असतात. आता नाशिकमध्ये विद्यापीठाचे उपकेंद्र होणे गरजेचे असून लोकप्रतिनिधींनी त्या दृष्टीने पाठपुरावा करणे आवश्यक आहे. –प्रा.डॉ. मिलिंद वाघ

LEAVE A REPLY

*