एमबीबीएस, बीडीएससाठी आता एकच ‘नीट’

एमबीबीएस, बीडीएससाठी आता एकच ‘नीट’

3 मे रोजी परीक्षा

नाशिक । प्रतिनिधी

वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय (एमबीबीएस/बीडीएस) अभ्यासक्रमासाठी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश (नीट) परीक्षा दि. 3 मे रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेच्या आधारे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स), जवाहरलाल पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण-संशोधन संस्थेसह (जेआयपीएमईआर) देशभरातील सर्व वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्व वैद्यकीय अभ्यासकम्रांसाठी प्रवेश दिला जाणार आहे. विशेष म्हणजे या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना एकच परीक्षा द्यावी लागणार आहे.

वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना वेगवेगळी परीक्षा द्यावी लागणार नाही, असे राष्ट्रीय परीक्षा संस्थेने जाहीर केले आहे. ‘आतापर्यंत देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमासाठी एम्स, जेआयपीएमईआर आणि अन्य महाविद्यालयात प्रवेशसाठी वेगवेगळ्या परीक्षांचे आयोजन केले जात होते.

केंद्र सरकारने अलीकडेच मेडीकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या जागी नॅशनल मेडीकल कमिशन स्थापन केले आहे. त्याअंतर्गत आयुर्वेदिक, होमियोपॅथिक, अ‍ॅलोपॅथी, युनानी वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी एकाच परीक्षा घेतली जाणार असून त्याच आधारे प्रवेश दिले जातील. लेखी परीक्षा व्हावी, ही आरोग्य मंत्रालयाची शिफारस एनटीएने मान्य केली आहे. राज्यांच्या मागणीची दखल घेऊन यावेळी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.

इंग्रजी आणि अन्य दहा प्रादेशिक भाषेत नीट परीक्षा घेण्यात येणार आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजी विषयासह बारावी उत्तीर्ण विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतात. यासाठी किमान वयोमर्यादा 17 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 25 वर्षांपर्यंत आहे. परीक्षा शुल्क 1500 रुपये असून आर्थिक दुर्बल घटक आणि इतर मागासवर्गीय (नॉन क्रिमीलेअर) विद्यार्थ्यांसाठी 1400 रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. तर इतर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क 800 रुपये आहे.

नीट परीक्षेचे वेळापत्रक

परीक्षेची तारीख- 3 मे 2020 (वेळ- दुपारी 2 ते सायं. 5 पर्यंत),
निकालाची तारीख- 4 जून 2020 ,
परीक्षेचा अवधी- तीन तास (180 मिनिटे),
ऑनलाईन परीक्षा अर्ज सादर (फोटो, स्वाक्षरीसह अपलोड करण्यासह) करण्याची मुदत- 2 डिसेंबर ते 31 डिसेंबरच्या रात्री 11.50 पर्यंत,
ऑनलाईन शुल्क भरण्याची मुदत- 2 डिसेंबर ते 1 जानेवारी 2020 (रात्री 11. 50 पर्यंत).

अर्ज प्रक्रिया सुरू

एमबीबीएएस, बीडीएस अभ्यासक्रमांसाठी 3 मे रोजी घेण्यात येणार्‍या राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेसाठी (नीट) अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवार दि. 2 पासून सुरू असून 31 डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येतील.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com