कृषी क्षेत्राचा विकास साधण्याची गरज : ई. वायुनंदन

कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचे उद्घाटन; शेतकर्‍यांना जमीन आरोग्य पत्रिकांचे वाटप

0
सातपूर । शेतकर्‍यांचे प्रश्न, समस्या वेळोवेळी समजावून घेतानाच एकमेकांच्या प्रत्यक्ष संवादातून शेतकर्‍यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण काम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कृषी विज्ञान केंद्र करीत आहे. शिक्षणाबरोबरच शेतकर्‍यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचेही शिक्षण देणारे हे एकमेव विद्यापीठ असून कृषी क्षेत्राचा विकास व्यापक पद्धतीने साधण्यासाठी प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. त्यात यश आल्यास देश समृद्ध होईल, असा विश्वास कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी व्यक्त केला.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत आज जागतिक मृदा दिनानिमित्त कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र आघाव, जिल्हा परिषदेचे जिल्हा विकास अधिकारी हेमंत काळे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख रावसाहेब पाटील, कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे उपस्थित होते.
यावेळी नाशिक जिल्ह्यातील शेतकर्‍यांना जमीन आरोग्य पत्रिकांचे वाटपही कुलगुरूंच्या हस्ते करण्यात आले. कुलगुरू ई. वायुनंदन म्हणाले, अशा प्रकारच्या कृषी महोत्सवातून शेतकरी आणि तज्ञ यांच्यातील चर्चा, संवाद आणि प्रात्यक्षिकांतून शेतकर्‍यांचा विकास साधण्यास मदत होईल.

सेंद्रीय खत वापर वाढवावा : दिवसेंदिवस रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत असून सेंद्रीय खतांचा वापर वाढवण्यावर भर देण्याची आवश्यकता महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक डॉ. हरिहर कौसडीकर यांनी बोलून दाखवली. ‘मृदा परीक्षण व जमीन आरोग्य पत्रिका : काळाची गरज’ या विषयावर डॉ. कौसडीकर यांनी मार्गदर्शन केले. मृदा तपासणी करून आवश्यकतेनुसारच शेतकर्‍यांनी खतांचे व्यवस्थापन करावे.

त्यामुळे उत्पादन खर्चात बचत होऊन जमिनीचे आरोग्यही सांभाळले जाईल, असे त्यांनी सांगितले. सेंद्रीय व रासायनिक खतांचे संतुलन साधण्याची गरज त्यांनी यावेळी बोलून दाखवली. यावेळी त्यांनी ध्वनिचित्रफितीद्वारे शेतकर्‍यांना जमीन आरोग्य सांभाळण्यासाठी आवश्यक गोष्टींची माहिती दिली.

कार्यक्रमासाठी कृषी विभागातील अधिकारी, शेतकरी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक केंद्राचे प्रमुख रावसाहेब पाटील यांनी केले. केंद्राचे विस्तार शास्रज्ञ डॉ. नितीन ठोके यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. प्रकाश कदम यांनी आभार मानले. यावेळी कृषी विज्ञान केंद्राच्या क्षेत्रावर अवलंब केलेल्या विविध आधुनिक तंत्रज्ञान व उपक्रमांना भेटीचे आयोजन करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

*