पेट्रोलपंप लूट प्रकरणी एकाला अटक

तीन दिवसांची कोठडी; गुन्हे शाखा-२ ची कामगिरी

0
नाशिक | दि. १३ प्रतिनिधी  – सातपूरच्या कामगारनगर येथील रिलायन्स पेट्रोलपंपावर काम करणार्‍या कर्मचार्‍याला मारहाण करून त्याच्या खिशातील १९ हजार रुपये बळजबरीने लुटून नेणार्‍या मुख्य संशयिताला गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने अटक केली. त्यास आज न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या संशयिताने आपल्या तीन साथीदारांसह हा गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाले असून गुन्ह्यात वापरलेली एका ज्युपिटर मोपेडदेखील पोलिसांनी जप्त केली आहे.

मधुकर नंदू खोपे (२२, रा. संत कबीरनगर झोपडपट्टी, गंगापूररोड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. ९ मार्च रोजी रात्री १ वाजता कामगारनगर येथील रिलायन्स पेट्रोलपंपावर कर्मचारी असलेल्या २३ वर्षीय अर्जुन एकनाथ ताकतोडे हा नाईट ड्युटीसाठी असताना एक ऍक्टिव्हा मोटारसायकल ढकलत चौघे संशयित पंपावर आले होते.

त्यांनी पेट्रोल टाकण्याच्या बहाण्याने जवळ जाऊन आमच्या गाडीत पेट्रोल भरले नाही, असे म्हणून पेट्रोलपंप कर्मचारी अर्जुन याच्याशी वाद घालत त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. त्याला मारहाण करीत असताना दोघा संशयितांनी अर्जुनच्या खिशातील पेट्रोलपंपाची १९ हजार ५०० रुपयांची रक्कम खिसा फाडून बळजबरीने लुटून नेली.

यानंतर काही वेळातच चौघे संशयित घटनास्थळावरून पसार झाले होते. घटनेचे गांभीर्य पाहता वरिष्ठ अधिकार्‍यांनी सातपूर पोलिसांसह या प्रकरणाचा तपास युनिट-२ च्या पथकाला करण्यास सांगितले होते. युनिट-२ चे पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे,

पोलीस नाईक देवकिसन गायकर, पोलीस शिपाई योगेश सानप, बाळा नांद्रे, जयंत शिंदे, मधुकर साबळे यांनी पेट्रोलपंपावरील सीसीटीव्ही फुटेज व संशयितांच्या मोपेड नंबरवरून त्यांचा शोध सुरू केला. अखेर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी संशयितांची नावे निष्पन्न करून संशयित खोपे त्याच्या घरातून सापळा रचून ताब्यात घेत अटक केली.

LEAVE A REPLY

*