नाशिक जिल्हा बँकेकडे 21 कोटींचे जुने चलन पडून

0
नाशिक |  नोटबंदी होवून वर्ष पूर्ण होत आलेले असले तरी अद्यापही नाशिक जिल्हा बँकेच्या मागील शुक्लकाष्ठ संपण्याची चिन्हे दिसत नाही. बँकेकडे अद्यापही जुन्या पाचशे व हजारांच्या 21 कोटींच्या नोटा पडून आहेत. या नोटा नोटबंदीपूर्वीच्या असल्याने त्या स्वीकारण्यास रिझर्व्ह बँकेने नकार दिला आहे. त्यामुळे आता बँकेने थेट न्यायालयात धाव घेतली आहे.

नोटबंदी झाल्यानंतर त्याचा परिणाम जिल्हा बँकेच्या कारभारावर झाला. बँकेकडे येणारे चलन तसेच उपलब्ध चलन याचा ताळमेळ न बसल्याने रिझर्व्ह बँकेने सर्वच सहकारी बँकांवर निर्बंध आणले. जुने चलन पडून असल्याने तसेच नवीन चलन उपलब्ध न झाल्यामुळे नागरिकांना नोटा बदलून देण्यास तसेच व्यवहार करण्यास जिल्हा बँक असमर्थ ठरली.

त्यामुळे सहा ते आठ महिन्यांपर्यंत बँकेचा खोळंबला. अखेर ऑक्टोबर महिन्यापर्यंत नोटा बदलून मिळाल्यानंतर हा व्यवहार सुरळीत होण्यास काही प्रमाणात मदत झाली. बँकेने या आठ ते नउ महिन्यांच्या कालावधीत सुमारे 319 कोटी रूपयांचे चलन बदलून घेतले.

परंतु रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांनुसार काही रक्कम ही सुरक्षा ठेव म्हणून शासनाकडे जमा करावी लागत असल्यानेे बँकेने त्यातील 268 कोटी हे जमा केले. या रकमेनंतर शासनाकडे बँकेची 950 कोटी रूपयांची सुरक्षा ठेव जमा झालेली आहे. परंतु दुसरया बाजूला शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर कर्ज घेतलेले शेतकरी कर्ज भरत नसल्याने मोठया प्रमाणावर अडचणी येवू लागल्या.

कर्जमाफीसाठी शासनाकडून बँकेला आतापावेतो केवळ 3 कोटी 79 लाख रूपये मिळालेले असले तरी अद्याप यादीच हातात ते पैसे शेतकरयांना वाटप करता येत नसल्याची खंत अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी मांडली. दिड लाखांच्या आतील शेतकरयांना ही रक्कम वाटप करावयाची असून त्यासाठी जिल्हा बँक यादीची प्रतिक्षा करत आहे.

दरम्यान, सध्या तरी बँकेला चलन बदलून मिळाल्यामुळे काही प्रमाणात का होईना कारभार सुरळीत झालेला आहे. परंतु अद्यापही या कारभाराने हवा तेव्हढा वेग धरलेला नाही. 1 नोव्हेंबर 2017 पूर्वीच्या 21 कोटी रूपयांच्या नोटा बदलून देण्यास रिझर्व्ह बँकेने नकार दिल्यामुळे आता न्यायालयात निकाल लागल्यानंतर त्यावर विचार होणार आहे. त्यामुळे अद्यापही बॅकेला 21 कोटी रूपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.

LEAVE A REPLY

*