जिल्हा बँकेला वेगळा न्याय का?

शिवसेना पक्षप्रमुखांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

0
नाशिक | दि. १९ प्रतिनिधी – नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला टाळे लावण्याच्या विचारात असलेल्या शासनाला चलनबंदी दरम्यान राष्ट्रीयकृत बँकांतून अनेक कोटी रक्कम बाहेर गेल्याचे दिसत नाही का, जिल्हा बँकेवर कारवाईची तयारी करताना राष्ट्रीयकृत बँकांवर सरकारने काय कारवाई केली, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना केला.

शिवसेनेच्या कृषी अधिवेशनात शिवसेना पक्षप्रमुखांनी थेट मुख्यमंत्र्यांना सवाल केल्याने, वारंवार भेटीचे आश्‍वासन मिळूनही मुख्यमंंत्र्यांंची भेट आतापर्यंत झाली नसलेल्या जिल्हा बँक पदाधिकार्‍यांना यावेळी दिलासा मिळाला. उद्धव ठाकरे म्हणाले की, जिल्हा बँकेतूनच थेट काळा पैसा पांढरा केल्याचा कोणताही प्रकार समोर आलेला नाही.

तर उलट राष्ट्रीयकृत बँकांतून कोट्यवधींचा पैसा हा काळ्याचा पांढरा झाल्याचे चलनबंदी दरम्यान वारंवार दिसून आलेले होते. अशा राष्ट्रीयकृत बँकांवर शासनाने काय कारवाई केली. जिल्हा बँकांनाच टाळे टोकण्याचे शासन ठरवून बसले की काय, असे ठाकरे यांनी म्हटले.

यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे, उपाध्यक्ष सुहास कांदे आदी समोर बसलेले असल्याने, त्यांनाही शिवसेना पक्षप्रमुखाचे हे बोल आश्‍वासक वाटले. जिल्हा बँकेला पीककर्ज वाटपासाठी भांडवल नसल्याने आणि वसुली अत्यल्प असल्याने सध्या जिल्हा बँकेचे सर्व व्यवहार ठप्प झालेले आहे.

जिल्हा बँकेचे कामकाजही त्यामुळे प्रभावित झालेले आहे. वसुली नसल्याने आणि पीककर्ज अजूनही खरीप हंगामासाठी वाटप झालेले नसल्याने, शासनाने शिखर बँक अथवा नाबार्डकडून रक्कम मिळवून द्यावी, यासाठी जिल्हा बँकेच्या अध्यक्षांसह काही पदाधिकार्‍यांनी पालकमंत्री महाजन यांच्या मध्यस्थीने मुख्यमंत्री भेटीचा प्रयत्न गेल्या १५ दिवसांपासून चालवला आहे.

पण, अद्यापही मुख्यमंत्र्यांची भेट जिल्हा बँक पदाधिकार्‍यांना झालेली नसल्याने, बँकेला पीककर्जासाठी अजून काही हालचाल करता आलेली नाही. त्यामुळे शेतकरी आंदोलनाचा सामना करावा लागलेला आहे. तसेच इतर खातेदारांच्या आंदोलनाचा फटका जिल्हा बँकेला सहन करावा लागलेला आहे.

पण अधिवेशनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच जिल्हा बँकेच्या स्थितीबाबत थेट मुख्यमंत्र्यांना सवाल केल्याने जिल्हा बँकेच्या पदाधिकार्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

LEAVE A REPLY

*