कर्मचार्‍यांचे ‘ते’ ४४ लाख अधांतरीच!

आयकर विभाग कारवाईच्या तयारीत असल्याने धाबे दणाणले

0
इगतपुरी | दि. १४ प्रतिनिधी – इगतपुरी तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या शेकडो कर्मचार्‍यांची ४४ लाखांवरील आयकराची रक्कम एनडीसीसी बँकेने अद्याप आयकर खात्याला भरली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे संबंधित सर्व अधिकारी आणि कर्मचार्‍यांना घाम फुटला आहे. प्रामाणिकपणाने काम करणार्‍या कर्मचार्‍यांना वेळेत आयकर भरूनही कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याने कर्मचारी हवालदिल झाले आहेत.

दरम्यान, लाखो रुपयांचा आयकर थकला असल्याने आयकर खात्याने या प्रकरणी संबंधित सर्व कर्मचार्‍यांवर कारवाईची तयारी सुरू केल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे. निवृत्तीवेतनधारक, वयोवृद्ध पैसे नसल्याने अंथरुणाला खिळले आहेत. अनेकांच्या कुटुंबात लग्नकार्यासाठी हक्काचा पैसा काढता येत नसल्याने अश्रू पुसायला कोणी नाही. जिल्हा परिषद प्रशासनाने या सर्व कोंडीतून सुटका करण्यासाठी शासनाला विनंती करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
जिल्हा बँकेचे धनादेश जिल्हाभरात कुठेच आणि कोणत्याच बँकेत वटत नसल्याच्या आणि इतर तत्सम तक्रारींबाबत जिल्हा बँकेचा सध्या बोलबाला झाला आहे. यासंदर्भात विविध ठिकाणी मोर्चे, आंदोलने, शाखा कुलूप लावून बंद करणे, कर्मचार्‍यांना कोंडणे, खातेदाराने पैसे मिळत नाही म्हणून स्वतःहून कोंडून घेणे असे प्रकार घडत आहेत. हे फक्त खातेदारांसाठी मर्यादित असले तरी अनेक सरकारी कारभार जिल्हा बँकेमार्फत चालतात. तालुका स्तरावरील अनेक खात्यांचे कारभारसुद्धा यामार्फतच होतात.
सर्वसामान्य खातेदारांना झालेला त्रास चव्हाट्यावर आला पण सरकारी खातेदारांचीही मोठी गोची झाली आहे. पंचायत समितीअंतर्गत कार्यरत असणार्‍या कर्मचार्‍यांचे डिसेंबर २०१६, जानेवारी, फेब्रुवारी २०१७ या तीन महिन्यातील वेतनातून चालू आर्थिक वर्षातील बसलेल्या आयकराची एकूण रक्कम ४३ लाख ४६ हजार २२१ रुपये आयकर विभागाकडे भरणा तथा जमा करण्यासाठी जिल्हा बँकेच्या इगतपुरी शाखेत मार्चमध्ये विहित धनादेशाद्वारे वर्ग करण्यात आले होते. परंतु अद्यापपर्यंत ती रक्कम आयकर विभागाकडे वर्ग झाली नसल्याचा प्रकार निदर्शनास आल्याने कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले आहे.
यासह तालुक्यातील सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांचा निवृत्तीवेतनाचा गेल्या दोन महिन्यांपासून प्रश्‍न निर्माण झाला आहे. ज्यांचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते आहे त्यांनाच निवृत्तीवेतनाचा लाभ मिळत असल्याचे सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे. एनडीसीसी बँकेत खाते असणार्‍या सेवानिवृत्त कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत जिल्हा बँकेच्या इगतपुरी शाखेत वेळोवेळी भेट घेऊन व सूचना करूनही उपयोग होत नाही.

जिल्हा परिषदेकडून प्राप्त होणारे ८५० प्राथमिक शिक्षकांचेही वेतन होत नसल्याने याप्रश्‍नी तालुक्यात तोडगा काढण्यात आला असला तरी पेन्शनधारकांचा प्रश्‍न कायम राहिला आहे. या प्रकरणी अनेक तक्रारीही कायम असल्या तरी रोजच तक्रारींचा ओघ सुरू असल्याने जिल्हा बँकेत असलेले खातेच बंद करण्याचा विचार पेन्शनधारक करीत आहेत.

राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडावे
बँकेच्या प्रशासकीय आणि अंतर्गत कारभारामुळे विविध समस्या उद्भवत आहेत. बँकेचा कारभार हळूहळू सुरळीत होईल. मात्र सेवानिवृत्त कर्मचार्‍यांनी निवृत्तीवेतनासाठी तात्काळ राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडून नवीन खाते नंबर व पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत या कार्यालयात जमा करावी.
– शिवाजी अहिरे, गटशिक्षणाधिकारी, इगतपुरी

LEAVE A REPLY

*