युवक राष्ट्रवादीकडून मनपाच्या सहा विभागांमध्ये रक्तदान शिबीर

नाशिक । प्रतिनिधी

लाँकडाऊनमुळे शिबिरे बंद आहेत. यामुळे सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासू लागला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शहरातील ६ विभागात सुरक्षित अंतर ठेवत रक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर ठेऊन व स्वच्छतेची पुरेपूर काळजी घेत हे रक्तदान शिबिर आयोजित केले असल्याचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी सांगितले.

राज्यात रक्ताचा तुटवडा होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे रक्तदान करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले होते.

त्याला प्रतिसाद देत नाशिक शहर युवक राष्ट्रवादीने सर्व विभागात सुरक्षित अंतर ठेवत जास्त गर्दी न करता स्वच्छता करत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.

रक्तदात्यांची काळजी घेत व संपूर्ण आजाराची विचारपूस करत योग्य चाचणी करून त्यांचे रक्त संकलित करण्यात येणार आहे. राज्यात दररोज साधारणतः पाच हजार रुग्णांना रक्ताची आवश्यकता असते.

विविध शस्त्रक्रिया व आजारांच्या उपचाराकरिता रक्ताची आवश्यकता भासते. कोरोना विषाणू मुळे रक्तदाते कमी झाले असून नियमित चालणाऱ्या रक्तदान शिबिरांना फटका बसला आहे. मोठमोठे उद्योजक आपल्या कंपनीमध्ये सेवक वर्गात रक्तदान शिबिराचे आयोजन करत असतात.परंतु, करोनामुळे सर्व उद्योगधंदे बंद असल्याने सेवक वर्गही रक्तदान करत नाही.

उन्हाळ्यात होणाऱ्या अनेक रक्तदान शिबिराचे आयोजनही करोनामुळे करण्यात आलेले नसल्याने रक्ताचा मोठा तुटवडा भासत आहे. हा तुटवडा कमी करण्यासाठीच या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये व सुरक्षित अंतर राहावे,याकरिता शहरातील सर्व विभागात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आहे. यातील पंचवटी विभागाचे शिबिर रविवारी रुद्रा फार्म येथे पार पडले असून यात ३० रक्ताच्या बाटल्या संकलीत करण्यात आल्या आहेत. आता उर्वरीत ५ विभागात अशीच शिबिरे होणार असल्याचे अंबादास खैरे यांनी सांगितले.