शेवगाव : ताजनापूर उपसा जलसिंचन योजनेत बदल करू नये

0

राष्ट्रवादी काँग्रेसचा चापडगाव येथे रास्ता रोको; तीव्र आंदोलनाचा इशारा

शेवगाव (तालुका प्रतिनिधी) – शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकर्‍यांना वरदान ठरणार्‍या ताजनापूर उपसा जलसिंचन टप्पा क्रमांक 2 योजनेच्या मूळ आराखड्यामध्ये बदल न करता जशी आहे तशीच ती पूर्ण करावी. या योजनेच्या माध्यमातून लाभधारक शेतकर्‍यांना सूक्ष्म सिंचनाद्वारे मिळणार्‍या पाण्याचे स्वप्न उद्ध्वस्त करू नये, अशी मागणी करत शेवगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तालुक्यातील चापडगाव येथे सुमारे दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी ताजनापूर योजनेच्या सहायक अभियंता धनश्री हरिश्चंद्रे यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारून लेखी आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

आंदोलनात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीपराव लांडे, बाजार समितीचे सभापती संजय कोळगे, उपसभापती रतन मगर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कल्याण नेमाणे, पंचायत समितीचे उपसभापती शिवाजी नेमाणे, पंचायत समिती सदस्य कृष्णा पायघन, खरेदी विक्रीचे अध्यक्ष एकनाथ कसाळ, रामनाथ राजपुरे, राजेंद्र ढमढेरे, मोहनराव देशमुख, ताहेर पटेल, हनुमान पातकळ, बाळासाहेब विघ्ने, कृष्णा ढोरकुले, नाना मडके, ज्ञानेश्वर कातकडे, रामराव वाघ, रंगनाथ बटुळे यांच्यासह पदाधिकारी व मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.

तालुक्याच्या पूर्व भागातील 20 गावांतील सुमारे सात हजार हेक्टर शेतजमीन ओलिताखाली आणू शकणार्‍या ताजनापूर उपसा जलसिंचन टप्पा क्रमांक 2 च्या योजनेत शासन यंत्रणा मूळ आराखडय्यात बदल करत असल्याची तक्रार शेतकरी करीत आहेत. या योजनेतून जायकवाडी जलाशयातील पाणी सूक्ष्म सिंचनद्वारे शेतीला देण्याचा मूळ आराखडा मंजूर झालेला आहे.

मात्र या शासनाने गेल्या 3 वर्षापासून प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी निधी तर दिलाच नाही, मात्र प्रकल्पाच्या मूळ आराखड्यातच फेरबदल करुन सदर प्रकल्प खिळखिळा करण्याचा प्रयत्न चालू केल्याची भावना शेतकर्‍यांची झाली आहे. मूळ आराखड्यात बदल करू नये यासाठी हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. फेरबदल केला गेला तर, राष्ट्रवादी काँग्रेस पुढील काळात अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन करील, असा इशारा आंदोलकांनी शासन यंत्रणेला दिला आहे.

LEAVE A REPLY

*