Type to search

Featured सार्वमत

जगताप पितापुत्रांची पवारांच्या बैठकीला दांडी

Share

किरण काळेंनी मांडली नगरची परिस्थिती

अहमदनगर (प्रतिनिधी) – आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीला नगर शहराचे आमदार संग्राम जगताप व आमदार अरुणकाका जगताप या दोघांसह नगरसेवक व कार्यकर्त्यांनी पाठ फिरविल्याने विविधांगी चर्चा सुरू झाली आहे. विधानसभेसाठी इच्छूक असलेले किरण काळे यांनी नगरची राजकीय परिस्थिती शरद पवार यांच्यासमोर मांडली.

माजी आमदार दादाभाऊ कळमकर, माजी महापौर अभिषेक हेदेखील या बैठकीला उपस्थित होते. पण बापलेक आमदार जगताप तसेच पक्षाचे त्यांचे समर्थक पदाधिकारी, कार्यकर्ते बैठकीला अनुपस्थित होते. बैठकीत मात्र त्यांच्या अनुपस्थितीसंदर्भात कुठलीही चर्चा झाली नसल्याचे सूत्रांकडून समजले. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल शुक्रवारी मुंबईत बैठक झाली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, छगन भुजबळ, जिल्ह्याचे प्रभारी दिलीप वळसे पाटील, जिल्हाध्यक्ष फाळके यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. पाच महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आमदारकीच्या निवडणूक पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी, धोरण ठरवण्यासाठी मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले नगरचे आमदार संग्राम जगताप व आमदार अरुणकाका जगताप यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, 18 नगरसेवकांनीही बैठकीला दांडी मारल्यामुळे उलट सुलट चर्चा सुरु आहे.
आढावा बैठकीत नगर जिल्ह्यातील शिर्डी, संगमनेर व श्रीरामपूर या तीन जागा वगळता उर्वरित सर्व 9 जागा राष्ट्रवादी काँग्रेसने लढवाव्यात, अशी मागणी करणारा अहवाल जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी बैठकीत पवार यांच्याकडे दिला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!