Thursday, April 25, 2024
Homeनगरराष्ट्रवादीची पावले सत्तेच्या दिशेने!

राष्ट्रवादीची पावले सत्तेच्या दिशेने!

जिल्हा परिषद : सदस्यांशी संवाद मोहिम

नगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेत राज्यातील सत्तेप्रमाणे महाविकास आघाडीची सत्ता आणण्याच्या दिशेने राष्ट्रवादीने पावले टाकली आहेत. पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्यांची शनिवारी नगरमध्ये जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी बैठक घेतली. अध्यक्षपदासाठी इच्छुक असणार्‍यांना पक्षाकडे अर्ज करण्यास देखील यावेळी सुचविण्यात आले.
शनिवारी राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्यांची पक्ष कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पक्षाचे निरिक्षक तथा आ.दिलीप वळसे पाटील मार्गदर्शन करणार होते. मात्र आ.वळसे पाटील यांना येण्यास उशिर झाल्याने जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी बैठकीचे नेतृत्व केले. यावेळी जिल्हा परिषदेतील सत्तासुत्र, याच सोबत मित्र पक्षाचे संंख्याबळ, पक्षातून गेलेले जुन्या सदस्यांचे काय करायचे, याबाबत प्राथमिक चर्चा झाली.
विद्यमान परिस्थितीत जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी सर्वाधिक सदस्य असणारा पक्ष ठरणार आहे. यामुळे अध्यक्षपदासाठी इच्छुक असणार्‍यांनी पक्षाकडे तशी लेखी स्वरूपात इच्छा व्यक्त करण्याच्या सुचना देण्यात आल्या. जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीसाठी नव्याने गट नोेंदणी करावी की अन्य पर्यायांचा वापर करावा, याबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

- Advertisement -

कोण-कोण?
या बैठकीला जिल्हा परिषद उपाध्यक्षा राजश्रीताई घुले, सभापती उमेश परहर, सदस्य माधवराव लामखडे, रमेश देशमुख, सुधाकर दंडवते, विमलताई आगवन, सोनाली साबळे, संगिता दुसिंग, सोनाली रोहमारे, रामभाऊ साबळे आदी उपस्थित होते. तर तेजश्री लंघे, कोमल वाखारे, सुप्रिया झावरे, सभापती कैलास वाकचौरे, धनराज गाडे, नंदा गाडे, गुलाबराव तनपुरे, सुवर्णाताई जगताप आदी सदस्य गैरहजर होते.

युवक व महिला राष्ट्रवादी नाराज
बैठकीसाठी युवक राष्ट्रवादी आणि महिला राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते. पक्षाच्या अन्य कार्यक्रमांत युवक आणि महिला पदाधिकार्‍यांवर जबाबदारी देण्यात येते. मात्र, सत्ता स्थापनेच्या संदर्भात असणार्‍या महत्वाच्या बैठकांना या दोन्ही आघाडीच्या पदाधिकार्‍यांना टाळण्यात येत असल्याने या पदाधिकार्‍यांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

अधिवेशनानंतर…
सोमवारपासून राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनानंतर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि सेनेचे नेते निवांत होणार आहे. यामुळे त्यानंतर खर्‍याअर्थाने जिल्हा परिषदेच्या मोर्चेबांधणीला सुरूवात होणार आहे. गत आवठड्यात या तिनही पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी प्राथमिक बैठक झाली आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने अद्याप अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर केलेला नाही. तो देखील पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या