निरीक्षकांसमोरच नेते, कार्यकर्त्यांकडून उणीदुणी : जामखेड तालुका राष्ट्रवादी अध्यक्षपदाचा तिढा कायम

0
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जामखेड-कर्जत विधानसभा मतदारसंघाचे पक्षनिरीक्षक किशोर मासाळ जामखेड येथे आढावा बैठकीत बोलताना.
जामखेड (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरू असलेल्या अंतर्गत वादावर पडदा टाकण्यासाठी आलेल्या पक्ष निरीक्षकांसमोरच नेते आणि कार्यकर्त्यांनी एक मेकांची उणीदुणी काढत पुन्हा एकदा गटबाजीचे प्रदर्शन घडवले. यामुळे काही काळ शासकीय विश्रामगृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जामखेड राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्षपद गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त आहे.
या पदासाठी अनेक मातब्बर नेते इच्छुक आहेत. पण एका नावावर एकमत होत नसल्याने तालुकाध्यक्षपदाचा तिढा कायम आहे. पक्षाचे निरीक्षक किशोर मासाळ यांनी जामखेड दौरा करत नेते व कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. आढावा बैठक दिवसभर चालली. आढावा बैठकीत तालुक्यातील नेत्यांनी गटबाजीचे प्रदर्शन घडवत मासाळ यांच्यासमोर लॉबिंग करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.
दरम्यान तालुका अध्यक्षपदाचा तिढा जटिल बनल्याने कोअर कमिटीचे भूत तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या मानगुटीवर बसवण्याची खेळी खेळत मासाळ यांनी इच्छुकांना पुन्हा एकदा गॅसवर ठेवले. पक्षाच्या आढावा बैठकीत ठोस निर्णय न घेता फक्त कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्याचा फार्स केला गेला असल्याची चर्चा आता राष्ट्रवादीच्या वर्तुळात रंगू लागली आहे.
दरम्यान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात लक्ष घालत मतदारसंघाच्या राजकीय बांधणीसाठी सावध पावले टाकण्याची रणनीती आखली आहे. आता कोणी कितीही उड्या मारू द्या अजितदादा योग्य वेळी तालुकाध्यक्षपदाची निवड करतील अशी माहिती समोर येत आहे. तालुकाध्यक्ष मीच होणार असे ठणकावून सांगणार्‍या नेत्यांना गॅसवर ठेवून राष्ट्रवादी बेरजेच्या राजकारणात यशस्वी होईल का? याबाबत आता वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

तालुकास्तरीय कोअर कमिटी स्थापन –
दरम्यान पक्षाचे निरीक्षक किशोर मासाळ यांनी आढावा बैठकीत कार्यकर्त्यांची मते जाणून घेतल्यानंतर पक्षासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी तालुकास्तरावर एक कोअर कमिटी स्थापन केली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय वारे, शहाजी राळेभात, सुरेश भोसले, प्रा. संजय वराट, भगवान गिते, उमर कुरेशी यांचा समावेश आहे. ही कमिटी यापुढे पक्ष प्रवेश, वरिष्ठ नेत्यांशी संपर्क, तालुका पातळीवरील निर्णय, निवडणूक निर्णय, पदाधिकारी नियुक्ती आदी बाबतीत निर्णय घेईल, असे पक्षनिरीक्षक किशोर मासाळ यांनी सांगितले.

तालुकाध्यक्षपदाचा तिढा महिनाभरात सोडविणार – किशोर मासाळ
राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदाचा तिढा जिल्हाध्यक्ष व ज्येष्ठ पदाधिकार्‍यांची बैठक घेऊन महिनाभरात सोडविण्यात येईल. दरम्यान जामखेड तालुक्यातील पदाधिकार्‍यात जे अंतर्गत वाद आहेत ते मिटवण्यासाठी अजित पवार यांनी मला जामखेडला पाठविले होते. आढावा बैठकीचा वस्तुनिष्ठ अहवाल अजितदादांना सादर करून पुढील दिशा ठरवली जाईल, असे पक्षनिरीक्षक किशोर मासाळ यांनी सांगितले.

अजित पवारांकडून हिरवा कंदील कधी?
तालुकाध्यक्ष निवडीचा तिढा सुटण्यासाठी अजित पवारांकडून हिरवा कंदील मिळण्याच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. यामुळे जामखेड राष्ट्रवादीत राजकीय अस्वस्थतेचे अन गटबाजीचे वातावरण अधिक गडद झाले आहे. दरम्यान दिवसा राष्ट्रवादीबरोबर व रात्री भाजपच्या दावणीला जाणार्‍या त्या नेत्यांचे काय होणार? असाही सवाल आता राष्ट्रवादीच्या वर्तुळात रंगू लागला आहे.

LEAVE A REPLY

*