Type to search

Breaking News मुख्य बातम्या सार्वमत

नेवाशात राष्ट्रवादीचा गडाखांना पाठींबा

Share

अहमदनगर (प्रतिनिधी)- सध्या राजकीय गटांगळ्या खाणार्‍या राष्ट्रवादीवर नेवासे विधानसभा मतदारसंघातही बाका प्रसंग ओढावला आहे. या मतदारसंघातून एकही उमेदवार लढत देण्यासाठी धजावत नसल्याने अखेर पक्षाला माघार घ्यावी लागली आहे. मतदारसंघात भाजपाला पाठींबा देणे शक्य नसल्याने राष्ट्रवादीने क्रांतीकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार शंकरराव गडाख यांच्यामागे ताकद लावण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र याबाबत अद्याप राष्ट्रवादीने अधिकृत माहिती जारी केलेली नाही. दरम्यान, या घडामोडींचा विद्यमान आ.बाळासाहेब मुरकुटे गटाला चांगलाच राजकीय दणका बसणार आहे.
या मतदारसंघातून विठ्ठलराव लंघे आणि पांडुरंग अभंग यांच्या नावाची संभाव्य उमेदवार म्हणून चर्चा होती. लंघे यांनी मतदारसंघाचे दौरेही केले होते. मात्र गुरूवारी रात्री अचानक राजकारणाने वळण घेतले. मतदारसंघातून लढण्यास कोणताही उमेदवार मानसिकदृष्ट्या सक्षम नसल्याचे समोर आल्यानंतर राष्ट्रवादीकडून अधिकृतरित्या शंकरराव गडाख यांच्याशी संपर्क साधला गेला, असे समजते. त्यानंतर पक्षाने गडाख यांना पाठींबा देवून या मतदारसंघातून मान सोडवून घेतली आहे, अशी चर्चा आहे. यापूर्वी श्रीगोंदा मतदारसंघात पक्षाची किरकिरी झाली आहे.
दरम्यान, नेवासे मतदारसंघाची लढत पुन्हा एकदा एकास-एक या वळणावर पोहचली आहे. यावेळी गडाख गटाने विजयासाठी जोर लावला आहे. तर विद्यमान आमदारांना आपलीच ‘कामगिरी’ अडचणीची ठरू लागली आहे. पक्षातील अनेक निष्ठावंतांनी बंडाचा पावित्रा घेतलेला असताना राष्ट्रवादीची ताकद प्रामाणिकपणे गडाखांच्या पाठीशी गेल्यास काय होणार, अशी काळजी त्यांच्या गोटात पसरली आहे.
दरम्यान, या विषयावर राष्ट्रवादीचे स्थानिक नेते माजी आ.चंद्रशेखर घुले पाटील यांची भुमिका अद्याप स्पष्ट होणे बाकी आहे. गडाखांना राष्ट्रवादीच्या पाठींब्याची बातमी फुटल्यानंतर घुले समर्थकांनी कोणतीही प्रतिक्रीया देणे टाळले आहे. 2004मध्ये घुले गटाच्या छुप्या मदतीमुळेच तत्कालीन राष्ट्रवादीचे उमेदवार शंकरराव गडाख यांचा पराभव करण्यात मुरकुटेंना यश आले होते. मात्र आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. त्यामुळे पुढील दोन आठवड्यात नेवासे मतदारसंघाचे राजकारण कसे बदलणार, याची उत्सुकता वाढली आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!