Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या राजकीय सार्वमत

शरद पवारांच्या मागे आहे कोण?

Share

आज नगर दौरा : चित्र स्पष्ट होण्याची शक्यता

अहमदनगर (प्रतिनिधी) – सत्ता असताना चंगळ करणारे अनेक सोडून गेल्याने मोडकळीस आलेले राष्ट्रवादीचे घर सावरण्यासाठी राज्यभर राजकीय भटकंती करणारे ज्येष्ठ नेते शरद पवार शनिवारी नगर येथे आहेत. जिल्ह्यात काहींनी पक्षांतर केले तर काही करण्याच्या बेतात आहेत. त्यामुळे पवारांच्या पाठीशी कोण, याचे चित्र या दौर्‍यात काही प्रमाणात स्पष्ट होणार आहे. 

सहकाराचा गड असलेल्या नगर जिल्ह्यावर एकेकाळी शरद पवारांची कमांड होती. अनेक नेते सत्तेची फळे चाखण्यासाठी बारामतीला निष्ठा वाहत असत. 2014 मध्ये मोदी सत्तेच्या उगमानंतर चित्र झपाट्याने बदलले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर तर राष्ट्रवादीला जबर गळती लागली. अनेक वर्षे पवारांसोबतराहून फळे चाखल्यानंतर आता रस संपल्याचे लक्षात येताच अनेकजण अस्तीत्वाच्या भितीने भाजपात डेरेदाखल झाले. अकोल्याचे वैभव पिचड त्यातील एक. या पिचड परिवाराला पवारांनी काय-काय दिले, याची मोजदादा आजही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करत बसले आहेत. नगरचे संग्राम जगताप आणि श्रीगोंद्याचे राहुल जगताप असे दोन आमदार पक्षाकडे आहेत. पण ते स्वत:च गोंधळलेले आहेत. जावू का नको, या प्रश्‍नाने त्यांना पछाडले आहे. त्यामुळे उद्या ते आमदारकीच्या निवडणुकीत उतरले तरी राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढतील, याची शाश्‍वती कार्यकर्त्यांनाच नाही. ज्यांना पक्षाकडून उमेदवारी मिळणार, अशी काही मंडळीने आता आपल्या संपर्क साहित्यावरून राष्ट्रवादीचे घड्यात आणि शरद पवारांची छबी हटविली आहे. ज्यांनी सोडून जावे, अशी पक्षाचीच इच्छा असताना चिटकून बसलेलेही पक्ष सोडण्याच्या बेतात आहेत.

अशा स्थितीत पवारांसोबत कोण, हा प्रश्‍न कळीचा ठरला आहे. त्यापैकी ज्यांना अन्य पर्यायच नाही, अशांचा पहिला गट आहे. मतदारसंघात युतीच्या आमदारांनी पाय रोवल्याने राष्ट्रवादीशिवाय पर्याय नाही, असे काही यंदा निवडणूक लढवू नये, अशा विचाराप्रत आले आहेत. राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात अजित पवारांच्या उगमानंतर ज्यांचे पंख छाटले गेेले, तेही सध्या पवारांची साथ करताना दिसतात. तिसरे हाताच्या बोटावर मोजण्याइतके काही निष्ठावंतही आहेत. यांच्यापैकी कोण-कोण पवारांसोबत दिसणार, याकडे खुद्द राष्ट्रवादीचेच लक्ष आहे.
……….
ना ढोल ना बाजा!
सत्तेच्या काळात शरद पवारांचा नगर दौरा येथील नेत्यांसाठी राजकीय दिवाळीचा सणच असायचा. आता मात्र पवारांचा दौरा असूनही राष्ट्रवादीतील मरगळ दूर झालेली नाही. यापूर्वी पवारांच्या दौर्‍यात बैठकीसाठी कार्यकर्त्यांना आग्रहाचे निमंत्रण देणार्‍यांनी यावेळी केवळ औपचारिकता पूर्ण केली. यायचे तर या, असाच त्यांचा कार्यकर्त्यांना अप्रत्यक्ष संदेश आहे.
………
उमेदवार मिळणार का?
सध्या शरद पवार दौर्‍याच्या निमित्ताने उमेदवार्‍याही जाहीर करत आहेत. नगर जिल्ह्यात कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवार यांच्याशिवाय पक्षाकडून उमेदवारीचे एकही निश्‍चित नाव दिसत नाही. विद्यमान आमदार दुसरीकडे चाचपणी करत असल्याची चर्चा आहे. ज्यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत होते, तेही युतीत काही जमतं का म्हणून गळ टाकून बसले आहेत. त्यामुळे वेळ आलीच तर राष्ट्रवादीकडे लढण्यासाठी उमेदवार असतील की नाही, यावरूनही शंका व्यक्त केली जाते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!